मुंबईः रिझर्व बॅंक ऑफ इंडियाचे नियम धाब्यावर बसवून मणिपूरचे छोेटे व्यापारी, स्थानिक नागरिक १० रुपयांचं नाणं स्वीकारण्यास नकार देत आहेत. जर तुम्हीही मणिपूरमध्ये प्रवास करत असाल, किराणा दुकानातून सामान घेत असाल आणि तुमच्या खिशात नवीन १० रुपयांच नाणं असेल तर आपल्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या स्पष्टोक्तीनंतरही मणिपूरच्या बाजारपेठेत व्यापारी, नागरिक, १० रूपयाचं नाणं स्वीकारण्यास नकार देत आहेत. स्थानिकांपैकी काही लोकांना १० रूपयाचं नाणं चलनात असल्याचं माहित असूनही स्थानिक व्यापारी, दुकानदार हे १० रूपयाच्या नाण्याच्या वैधतेबद्दल साशंक आहे.
सरकारी शाळेचे शिक्षक मांग्लेंबी यांना याबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, ‘किराणा दुकानदार नाणं स्वीकारत नाहीत, कारण स्थानिक बॅंकामध्येही १० रूपयांची नाणी स्वीकारली जात नाही.’
तसेच स्थानिक भाजी विक्रेता पीशाक यांना नाणी का स्वीकारत नाही? असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की, ‘त्यांना यामागची खरी कारणं माहित नाही, पण सहकाऱ्यांनी त्यांना नाणं न स्वीकारण्याचा सल्ला दिला आहे.’
याविषयी आरबीआय इंफाळ शाखेचे महाव्यवस्थापक नेमकं काय म्हणाले?
आरबीआय इंफाळ शाखेचे महाव्यवस्थापक यांनी याविषयी आपली प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “लोकांमधील गैरसमज दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, १० रूपयांची नाणी १४ वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बाजारात उपलब्ध आहेत. ही सगळी नाणी अधिकृत असून आपण नाण्यांचा स्वीकार करण्यास कसलाही संकोच करू नये.”
पुढे ते म्हणाले, ‘नोटबंदीच्या अडीच वर्षानंतरही लोक १० रूपयांची नाणी अवैध मानत आहेत.’ तसेच त्यांना मणिपूरच्या बॅंक १० रूपयांची नाणी स्वीकारत नसल्याचे सांगितले असता याबाबत ते म्हणाले की, 'आरबीआयकडे यासंदर्भात तक्रार केली असेल तर योग्य ती कारवाई केली जाईल.'
राष्ट्रीय अभिलेखागारच्या १२५ व्या स्थापना आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्ताने नवी ५ आणि १० ची नाणी चलनात आणली गेली होती. तसेच नवी नाणी चलनात आली तरी जुनी नाणी चलनात राहणार असल्याचेही सांगण्यात आले होते.
देशात सध्या १० रूपयाच्या नाण्याच्या वैधतेसंबधी नागरिकात भ्रम आहे. काही जणांच्या मते १० रूपयाची नाणी बनावट आहेत. ज्या नाण्यात १० आकडा खालच्या बाजूस आहे ते नाणे वैध आहे. असे सांगितलं जात आहे. मात्र रिझर्व्ह बॅंकेने सध्या चलनात असलेली १० रूपयाची सर्व नाणी वैध असल्याचा खुलासा याआधीही केला आहे.