आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ही माहिती असणं आवश्यक!

काम-धंदा
Updated May 06, 2019 | 17:49 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Aadhar Updation: आपल्याला आधार कार्ड अपडेट करायचंय. आधार कार्डमधील जन्मतारीख, नाव, लिंग काहीही अपडेट करायचं असेल तर काही विशेष माहिती असणं आपल्यासाठी गरजेचं आहे. जाणून घ्या ही महत्त्वाची माहिती...

Aadhar Card
आधार कार्ड अपडेट करण्याबाबत महत्त्वाची माहिती  |  फोटो सौजन्य: Representative Image

नवी दिल्ली: ‘आधार कार्ड’ हे देशातील सर्वात महत्त्वाचं ओळखपत्र आता बनलेलं आहे. आधार कार्ड ओळखपत्र, वयाचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा म्हणून संपूर्ण देशात मान्य आहे आणि तसे ते वापरलेही जाते. आधार कार्डसाठी बनवण्यात आलेल्या ६ व्या दुरुस्ती नियमावली, २०१८ नुसार, आधार कार्डमध्ये आपण आपली जन्मतारीख एकदाच अपडेट करू शकतो. आपलं नाव दोनदा बदलू शकतो. पण आपलं लिंग मात्र एकदाच बदलता येतं.

जर नाव, जन्मतारीख किंवा लिंग निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिकवेळा अपडेट करायचं असेल तर आपल्याला एक्सेप्शनल हॅन्डलिंग प्रोसेससाठी जावं लागतं. यासाठी आपल्याला यूआयडीएआयच्या प्रादेशिक कार्यालयात जाण्याची आवश्यकता असते. आधार नोंदणीच्या वेळी नोंदवलेल्या तारखेपासून जास्तीत जास्त किंवा कमीतकमी तीन वर्षांच्या आत जन्मतारीख बदलवण्याची तरतूद आहे.

यूआयडीएआयनुसार, ज्या रहिवाशांनी जन्मतारखेसाठी निर्धारित दस्तऐवज सादर केले आहेत त्यांच्या जन्मतारखेसमोर सत्यापित म्हणजेच व्हेरिफाय अशी नोंद केली जाते. जर रहिवाशांनी जन्मतारखेचे कोणतेही दस्तावेज दिले नसतील तर त्यांच्या जन्मतारखेसमोर डिक्लेअर्ड म्हणजेच घोषित किंवा एप्रॉक्झिमेटली म्हणजे अंदाजानुसार अशी नोंद केली जाते. मात्र, कोणालाही आधारवर आपल्या जन्मतारिख अद्ययावत करायची असेल तर, त्यांना त्यांची जन्मतारिख सिद्ध करण्यासाठी त्याच्याशी निगडीत कागदपत्रं सादर करणे आवश्यक आहे.

हे अद्ययावत नियम आपल्याला माहित असणं आवश्यक

आधार कार्ड धारकाला आपल्या जन्मतारखेत जर घोषित किंवा एप्रॉक्झिमेटली पासून व्हेरिफाईड असा बदल करायचा असेल तर तो आयुष्यात एकदाच करता येतो. यासाठी आपल्याला योग्य प्रमाणपत्र कागदपत्रं देणं आवश्यक आहे.

जर कोणत्या रहिवाशानं जन्मतारखेत बदल करण्याची विनंती केली आणि जर ती आधीपासूनच व्हेरिफाईड असेल तर तशी जन्मतारीख पुन्हा बदलता येवू शकत नाही. जर असा बदल आपल्याला करायचा असेल तर तो फक्त एक्सेप्शनल केस म्हणून होईल, तो ही UIDAI च्या रिजनल ऑफिसमध्ये गेल्यावर आपल्याला असा बदल करता येईल.

एक्सेप्शनल आधार बदल प्रक्रिया कशी असते पाहा

जर एखाद्या आधार कार्ड धारकानं दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक वेळा आपलं आधार कार्ड अपडेट केलं असेल तर ते नंतर कोणत्याही आधार कार्ड सेंटरमध्ये अपडेट होऊ शकत नाही. UIDAI च्या सर्व रजिस्ट्रार्समध्ये हे निर्बंध लागू केलेले आहेत.

जर एखादी एक्सेप्शनल केस असेल तर आधार कार्ड धारकाला आपल्या आधार कार्डमध्ये काही बदल करून घ्यायचे असतील तर त्यानं आपल्या रिक्वेस्ट सोबत URN स्लिपची कॉपी, आधार कार्ड डिटेल्स आणि त्याच्याशी निगडित कागदपत्र help@uidai.gov.in वर मेल पाठवावेत किंवा १९४७ या नंबरवर कॉल करावा.

 

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी