देशांतर्गत विमानसेवा २५ मे पासून सुरू होणार, नियमावली जाहीर

काम-धंदा
Updated May 21, 2020 | 18:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

देशांतर्गत नागरी विमान वाहतूक (डोमेस्टिक पॅसेंजर फ्लाईट) सेवा सोमवार, २५ मे पासून सुरू केली जाणार आहे. या विमान वाहतुकीसाठी प्रवासी, कंपन्या आणि विमानतळ प्रशासन यांच्यासाठी मार्गदर्शक नियमावली जाहीर करण्यात आली

guidelines for domestic flight operations
नागरी विमान वाहतुकीसाठी नियमावली जाहीर 

थोडं पण कामाचं

 • देशांतर्गत विमानसेवा २५ मे पासून सुरू होणार
 • विमानतळावरील कर्मचारी, विमान कंपन्यांचे कर्मचारी आणि प्रवासी यांच्यासाठी नियमावली जाहीर

नवी दिल्ली: देशांतर्गत नागरी विमान वाहतूक (डोमेस्टिक पॅसेंजर फ्लाईट) सेवा सोमवार, २५ मे पासून सुरू केली जाणार आहे. या विमान वाहतुकीसाठी प्रवासी, कंपन्या आणि विमानतळ प्रशासन यांच्यासाठी मार्गदर्शक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. 

कोरोनाचा प्रार्दुभाव थोपवण्यासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक २५ मार्चपासून बंद करण्यात आली होती. लॉकडाऊन काळात फक्त मालवाहक विमानांची वाहतूक आणि विदेशात अडकलेल्यांच्या सुटकेसाठी विशेष विमानांची वाहतूक सुरू होती. आता लॉकडाऊन शिथील करताना केंद्र सरकारने आधी देशांतर्गत नागरी विमान वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक कधी सुरू होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

देशांतर्गत विमानसेवेला परवानगी मिळाल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने देशातील सर्व विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत कोरोना संकट टाळण्यासाठी सुरक्षित विमान प्रवासाचे नवे नियम निश्चित करण्यात आले आहेत. हे नियम २५ मे पासून सुरू होत असलेल्या विमान प्रवासासाठी लागू होणार आहेत. 

नियमावली

 1. विमानांच्या तिकिटांसाठी ऑनलाईन पद्धतीने बुकिंग होणार
 2. नियोजीत उड्डाणाच्या जास्तीत जास्त ४ तास आधी प्रवाशांना विमानतळावर प्रवेश मिळणार
 3. प्रवाशांना त्यांच्या नियोजीत उड्डाणाच्या किमान २ तास आधी विमानतळावर येण्याचे बंधन
 4. विमानतळावरील कर्मचारी, विमान कंपन्यांचे कर्मचारी आणि प्रवासी यांना विमानतळ परिसरात वावरताना तसेच विमानातून प्रवास करताना ग्लोव्ह्ज आणि मास्क वापरण्याचे तसेच सोशल डिस्टंस राखण्याचे बंधन
 5. विमानतळावरील कर्मचारी, विमान कंपन्यांचे कर्मचारी आणि प्रवासी यांचे चप्पल, बूट निर्जंतुक करण्यासाठी विशेष व्यवस्था
 6. विमानतळ परिसरात प्रवेश करताना प्रत्येकाच्या शरीराचे तापमान तपासले जाणार, संशय आल्यास कोरोना चाचणी घेतली जाणार
 7. कोरोनाबाधीत प्रवाशांना विमान प्रवासाला बंदी
 8. १४ पेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक प्रवाशाच्या स्मार्टफोनमध्ये आरोग्य सेतू अॅप अॅक्टिव्ह असण्याचे बंधन
 9. प्रवाशांना विमानतळावर येण्यासाठी किंवा विमानतळावरुन जाण्यासाठी नोंदणीकृत असलेल्या कॅब अथवा खासगी वाहनाचा वापर करता येणार, वाहन कुठून आले आणि कुठे जाणार याच्या नोंदी होणार, गाडी क्रमांक आणि चालकाची माहितीही नोंदवली जाणार
 10. प्रवाशांनी शक्यतो पाठीवर घेता येतील अशा सॅक अथवा चाकांच्या बॅग वापराव्या आणि ट्रॉलीचा कमीत कमी वापर करावा
 11. सर्व बॅगांवर निर्जंतुकीकरणासाठी औषध फवारणी केली जाणार
 12. विमानतळावर सर्व एंट्री-एक्झिटच्या ठिकाणी सोशल डिस्टंससाठी मार्किंग केले जाणार
 13. दिव्यांग प्रवाशांना पीपीई किट घातलेले कर्मचारीच मदत करणार

१ जूनपासून २०० विशेष रेल्वे सुरू होणार

देशात १ जूनपासून २०० विशेष रेल्वे गाड्या सुरू होणार आहेत. या गाड्यांसाठी २१ मे पासून फक्त ऑनलाईन पद्धतीने तिकिटांची विक्री सुरू आहे. रेल्वे प्रवाशांनाही विशेष नियमावलीचे पालन करत प्रवास करण्याचे बंधन आहे. देशांतर्गत रेल्वे आणि विमानांची वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरळीत होत असल्यामुळे लवकरच लॉकडाऊनचे नियम आणखी शिथील केले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, नागरिकांना घराबाहेर पडणे टाळा, बाहेर पडताना मास्क आणि ग्लोव्ह्ज वापरा तसेच गर्दी टाळा आणि सोशल डिस्टंस राखा; असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी