Gautam Adani | अदानी समूहाचा जबरदस्त प्लॅन, देणार टाटा आणि अंबानींना टक्कर, ट्रॅव्हल व्यवसायात एन्ट्री

Adani Group | ऑनलाइन ट्रॅव्हल सेवा पुरवणारी कंपनी असलेल्या क्लिअरट्रिप प्रा लि. (Cleartrip)मध्ये अदानी समूहाने हिस्सेदारी विकत घेण्याची घोषणा केली आहे. अदानी समूहाने यात मोठी रक्कम गुंतवली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे.

Adani Group
अदानी समूहाची घोडदौड 
थोडं पण कामाचं
  • अदानी समूह आता ट्रॅव्हल व्यवसायात उतरतो आहे
  • क्रिलअरट्रिपमध्ये अदानी समूहाची गुंतवणूक
  • सुपरअॅप आणि विमानतळाच्या व्यवस्थापनात होणार उपयोग

Gautam Adani | नवी दिल्ली: गौतम अदानी (Gautam Adani)यांचा अदानी समूह जोरदार घोडदौड करतो आहे. अदानी समूह (Adani Group)आता ट्रॅव्हल व्यवसायात शिरतो आहे. ऑनलाइन ट्रॅव्हल सेवा पुरवणारी कंपनी असलेल्या क्लिअरट्रिप प्रा लि. (Cleartrip)मध्ये अदानी समूहाने हिस्सेदारी विकत घेण्याची घोषणा केली आहे. गौतम अदानी हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. अदानी समूहाने अद्याप क्लिअरट्रिपमधील आपल्या नेमक्या गुंतवणुकीची माहिती दिलेली नाही. मात्र अदानी समूहाने यात मोठी रक्कम गुंतवली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे. क्लिअरट्रिप या डिजिटल ट्रॅव्हल कंपनीत देशातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी असलेल्या फ्लिपकार्ट समूहाचादेखील (Flipkart Group) हिस्सा आहे. कोरोना काळात (Covid-19 pandemic) विविध निर्बंधांमुळे पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला होता. मात्र आता परिस्थिती निवळत असल्याने पर्यटन व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरूवात होईल. (Gautam Adani: Adani group to acquire stake in Cleartrip, focuses on travel sector)

अदानी समूहाचा फायदा

अदानी समूहाने सांगितले की 'ग्राहकांना अधिक सक्षम सेवा पुरवण्यासाठी क्लिअरट्रिपमध्ये ही हिस्सेदारी विकत घेण्यात आली आहे. आम्ही क्लिअरट्रिपमध्ये गुंतवणूक करत आहोत. हा एक ऑनलाइन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म आहे. यात ई-कॉमर्स कंपनी असलेल्या फ्लिपकार्टसमूहाचादेखील हिस्सा आहे.' हा व्यवहार नोव्हेंबर महिन्यात पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. क्लिअरट्रिपमध्ये हिस्सेदारी विकत घेतल्यामुळे अदानी समूहाला सुपरअॅप आणि विमानतळाच्या व्यवस्थापन व्यवसायात त्याचा उपयोग होणार आहे. अदानी समूहाचा विमानतळ व्यवस्थापनात देशातील सर्वात मोठा हिस्सा आहे. देशातील प्रवाशांची संख्या कोरोना आधीच्या पातळीवर आल्याचे अदानी समूहाचे म्हणणे आहे. या गुंतवणुकीमुळे अदानी समूह आणि फ्लिपकार्ट यांच्यातील भागीदारी वाढवण्यास मदत होणार आहे.

अदानी समूह आणि फ्लिपकार्ट समूह

अदानी समूहाने म्हटले आहे की क्लिअरट्रिप हा सुपरअॅपचाच एक भाग असणार आहे. फ्लिपकार्ट ऑनलाइन सर्व्हिसेस प्रा.ने अदानी समूहाशी एप्रिल महिन्यात एक करार केला होता. हा करार देशातील सर्वात मोठे वेअरहाउस बनवण्यासंदर्भातील होता. अदानी लॉजिस्टिक्स लि. ही अदानी समूहाचीच एक कंपनी मुंबईत ५,३४,००० चौ. फूटांचे एक फुलफिलमेंट सेंटर बनवते आहे. या सेंटरचा आकार ११ फुटबॉल मैदानांएवढा आहे. हे सेंटर अदानी समूह भाडेतत्त्वाने वापरण्यासाठी फ्लिपकार्टला देणार आहे. गौतम अदानी यांचा अदानी समूह विविध क्षेत्रात जबरदस्त विस्तार करत घोडदौड करतो आहे. गौतम अदानी यांच्या संपत्ती मागील वर्षभरात १२१ टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली आहे.

अंबानी आणि टाटा समूहाला देणार टक्कर

देशातील दोन सर्वात मोठे उद्योग समूह असलेल्या टाटा समूह (Tata Group) आणि मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स समूहाशी स्पर्धा करण्यासाठी गौतम अदानींना या नव्या व्यवहाराचा फायदा होणार आहे. टाटा समूह आणि रिलायन्स समूह ऑल इन वन ई-कॉमर्स अॅप बनवत आहेत. टाटा समूह आपल्या कन्झ्युमर उत्पादने आणि सेवांसाठी एक सुपरअॅप बनते आहे. तर रिलायन्सने जलै महिन्यात लोकल सर्च इंजिन असलेल्या जस्ट डायल लि. मध्ये मोठा आणि निर्णायक हिस्सा विकत घेण्याची घोषणा केली होती.

पोर्ट्स, एअरपोर्ट्स, ऊर्जा, गॅस वितरण, पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केल्यानंतर आता अदानी समूह पेट्रोकेमिकल्स, ट्रॅव्हल्स यासारख्या क्षेत्रांमध्येही मोठा विस्तार करण्याच्या मार्गावर आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी