अदानी समूह झाला १०० अब्ज डॉलरचा, इतके बाजारमूल्य गाठणारा देशातील तिसरा समूह

काम-धंदा
Updated Apr 07, 2021 | 16:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

अदानी समूहाच्या सहा नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य मंगळवारी शेअर बाजार बंद झाला त्यावेळेस ७.८४ लाख कोटी रुपयांपर्यवर (१०६.८ अब्ज डॉलर) पोचले होते.

Adani group crosses $100 Bn M-cap
अदानी समूहाने ओलांडला १०० अब्ज डॉलरचा टप्पा 

थोडं पण कामाचं

  • अदानी उद्योगसमूहाने १०० अब्ज डॉलर बाजारमूल्याचा टप्पा ओलांडला
  • याआधी टाटा समूह आणि रिलायन्स समूहाने १०० अब्ज डॉलर बाजारमूल्याचा टप्पा ओलांडला आहे
  • खाणउद्योग, सागरी बंदर, उर्जाक्षेत्र, विमानतळ, डेटा सेंटर, सिटी गॅस आणि संरक्षण क्षेत्रात विस्तारणारा मोठा उद्योग समूह

मुंबई : अब्जाधीश गौतम अदानींच्या अदानी उद्योगसमूहाने १०० अब्ज डॉलर बाजारमूल्याचा टप्पा ओलांडला आहे. सागरी बंदरांपासून ते ऊर्जा क्षेत्रापर्यत कार्यरत असणारा अदानी समूह १०० अब्ज डॉलरचे बाजारमूल्य गाठणारा देशातील तिसरा उद्योगसमूह ठरला आहे. याआधी टाटा समूह आणि रिलायन्स समूहाने १०० अब्ज डॉलर बाजारमूल्याचा टप्पा ओलांडला आहे. १९८०च्या दशकात कमोडिटी ट्रेडरच्या कामाने सुरूवात करणाऱ्या गौतम अदानी यांनी दोन दशकांच्या कालावधीत खाणउद्योग, सागरी बंदर, उर्जाक्षेत्र, विमानतळ, डेटा सेंटर, सिटी गॅस आणि संरक्षण क्षेत्रात विस्तारणारा मोठा उद्योग समूह उभा केला आहे.

अदानी समूहाची गरुडझेप


मागील दोन वर्षात अदानी समूहाने सात विमानतळं आणि देशातील एक चतुर्थांश हवाई प्रवासी इतका व्यवसाय आपल्या पंखाखाली आणला आहे. त्याशिवाय अपांरपारिक ऊर्जा क्षेत्रातदेखील घोडदौड केली आहे. श्रीलंका येथे सागरी बंदर उभारण्याचे सहकंत्राट मिळवले आहे. त्याव्यतिरिक्त भारतात बंदरे विकत घेतली आहेत. मागील काही आठवड्यात अदानी समूहाने गंगावरम बंदरात हिस्सा विकत घेतला आहे, गुजरातमध्ये एक विद्युत केंद्र उभारले आहे, मुंबईच्या किनारपट्टीत नैसर्गिक वायूचे साठे शोधले आहेत, सौरऊर्जा प्रकल्पांचे अधिग्रहण केले आहे, एस्सेल इन्फ्राप्रोजेक्ट्सच्या वीज वितरण प्रकल्पाला विकत घेतले आहे आणि भारतात १ गीगावॅटचे डेटा सेंटर उभारण्यासंदर्भातील करार केला आहे.

अदानी पोर्ट्सकडे देशातील सागरी बंदरांपैकी ३० टक्के व्यवसायाची मालकी आहे. याशिवाय फ्रान्सची ऊर्जा क्षेत्रातील आघाडीची कंपनी टोटलबरोबर अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रात आणि सिटी गॅस वितरण क्षेत्रात अदानी समूहाची भागीदारी आहे. २०२५ पर्यत २५ गीगावॅट्सची क्षमता अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रात गाठण्याचे अदानी ग्रीनचे उद्दिष्ट आहे.

अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत वाढ


मंगळवारी शेअर बाजार बंद झाला तेव्हा अदानी एंटरप्राईझेस आपल्या उच्चांकीवर बंद झाला. अदानी एंटरप्राईझेस १,२२५.५५ रुपये प्रति शेअरच्या पातळीवर व्यवहार करत होता. तर अदानी टोटल गॅस सुद्धा विक्रमी पातळीवर म्हणजे १,२४८ रुपये प्रति शेअरच्या पातळीवर बंद झाला. अदानी ट्रान्समिशन ५ टक्क्यांनी वधारला होता. बाजार बंद होताना अदानी ट्रान्समिशन १,१०९.९० रुपये प्रति शेअरच्या पातळीवर होता. याशिवाय अदानी पोर्ट्स (८३७.४५ रुपये प्रति शेअर), अदानी पॉवर (९८.४० रुपये प्रति शेअर), अदानी ग्रीन एनर्जी (१,१९४.५५ रुपये प्रति शेअर) या अदानी समूहाच्या सर्वच कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

समूहाचा विस्तार


अदानी समूहाच्या पाच कंपन्यांचे बाजारमूल्य एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, तर अदानी पॉवरचे बाजारमूल्य ३७,९५२.२८ कोटी रुपये इतके आहे.
मागील काही वर्षात सागरी बंदरे, ऊर्जा क्षेत्र, वीज वितरण क्षेत्र, विमानतळांचे व्यवस्थापन, डेटा सेंटरची उभारणी अशा अनेक पायाभूत क्षेत्रांमध्ये अदानी समूहातील कंपन्यांनी मोठी झेप घेतली आहे. समूहातील कंपन्यांनी आपल्या व्यवसायात मोठा विस्तार केला आहे. काही प्रकल्प कंपनीनेच उभारले आहेत, तर काही प्रकल्पांचे समूहाने अधिग्रहण केले आहे. त्यामुळे आता टाटा समूह, रिलायन्स समूहापाठोपाठ अदानी समूहाचा विस्तार झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी