आदित्य पुरींनी जगदीशनकडे दिली HDFC बँकेची जबाबदारी

HDFC Bank एचडीएफसी बँकेचे २५ वर्ष नेतृत्व केल्यानंतर आदित्य पुरी सोमवारी २६ ऑक्टोबर रोजी पदमुक्त झाले. बँकेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून शशिधर जगदीशन यांनी जबाबदारी स्वीकारली.

Aditya Puri
आदित्य पुरी 

थोडं पण कामाचं

  • आदित्य पुरींनी जगदीशनकडे दिली HDFC बँकेची जबाबदारी
  • एचडीएफसी बँकेचे नेतृत्व आदित्य पुरी यांनी २५ वर्षांपूर्वी स्वीकारले
  • १ लाख २० हजार जणांना नोकरी देणारी विश्वासार्ह खासगी बँक

मुंबईः एचडीएफसी बँक (HDFC Bank) ही देशातील एक प्रथितयश खासगी बँक आहे. या बँकेचे सलग २५ वर्ष नेतृत्व केल्यानंतर आदित्य पुरी (Aditya Puri) सोमवारी २६ ऑक्टोबर रोजी पदमुक्त झाले. बँकेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer - CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक (Managing Director - MD) म्हणून शशिधर जगदीशन (Sashidhar Jagdishan) यांनी जबाबदारी स्वीकारली. आदित्य पुरी यांनी कार्यभार शशिधर जगदीशन यांच्याकडे दिला. (Aditya Puri hands over charge, Jagdishan takes over as HDFC Bank MD & CEO)

एचडीएफसी बँकेचे कॉर्पोरेट ऑफिस (Corporate Headquarter) मुंबईत (Mumbai) आहेत. या ऑफिसमध्ये शेवटच्या दिवसापर्यंत आदित्य पुरी कार्यरत होते. त्यांनी संध्याकाळी साडेपाच वाजता रितसर सर्व सहकाऱ्यांचा निरोप घेतला आणि पदभार शशिधर जगदीशन यांना सोपवला. संध्याकाळी उशिरा एचडीएफसी बँकेने शशिधर जगदीशन यांनी सीईओ आणि एमडी पदांचा पदभार स्वीकारल्याची माहिती शेअर बाजाराला दिली.

एचडीएफसी बँकेचे नेतृत्व आदित्य पुरी यांनी २५ वर्षांपूर्वी स्वीकारले. सलग २५ वर्ष अविश्रांत मेहनत करुन त्यांनी एचडीएफसी बँकेला देशातील एक प्रतिष्ठीत खासगी बँक म्हणून नावारुपाला आणले. एक ब्रँड विकसित केला. तब्बल १ लाख २० हजार जणांना नोकरी देणारी विश्वासार्ह खासगी बँक अशी एचडीएफसी बँकेची आणखी एक ओळख तयार झाली. देशातील एक आघाडीची खासगी बँक अशी एचडीएफसीची ओळख झाली.

आदित्य पुरी यांच्या निवृत्तीचा कार्यक्रम २५ दिवसांपासून दररोज टप्प्याटप्प्याने सुरू आहे. सोमवारी या कार्यक्रमाचा औपचारिक समारोप झाला. समारोपाच्या कार्यक्रमासाठी आदित्य पुरी आणि शशिधर जगदीशन लोअर परळ (Lower Parel) येथील कमला मिल कंपाउंड (Kamala Mills Compound) परिसरातल्या एचडीएफसी बँकेच्या मुख्यालयात उपस्थित होते. निवडक अधिकारी बँकेच्या मुख्यालयात समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. अनेकांनी हा सोहळा लाइव्ह व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बघितला. निरोप समारंभ एक लाखांपेक्षा जास्त नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला. 

सोमवारी झालेल्या कार्यक्रमात मनोरंजनाचीही व्यवस्था होती. प्रसिद्ध गायक शंकर महादेवन (Shankar Mahadevan) यांनी आदित्य पुरी यांना आवडणारी बॉलिवूडची (Bollywood) जुनी गाणी गाऊन सर्वांचे मनोरंजन केले. पुरी यांच्या सन्मानासाठी तयार केलेल्या एका कवितेचे वाचन करण्यात आले. तसेच पुरी यांच्या कार्यशैलीला समर्पित एक गाणे गाऊन सादर करण्यात आले. शशिधर जगदीशन यांचे भाषण झाले. निरोप समारंभाला आदित्य पुरी यांनी छान भाषण करुन उत्तर दिले. आदित्य पुरी यांच्या सन्मानार्थ एचडीएफसी बँकेच्या बँक हाऊसमध्ये दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. 

आदित्य पुरी निवृत्त होत असल्याची जाणीव ठेवून आयसीआयसीआय बँकेच्या (ICICI Bank) अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट करण्यात आले. आयसीआयसीआय बँकेने आदित्य पुरी यांच्या बँकिंग क्षेत्रातील योगदानाची दखल घेतली. ट्वीटमध्ये आयसीआयसीआय बँक भारतीय बँकिंग उद्योगातील योगदानासाठी आदित्य पुरी यांची आभारी राहील असे नमूद होते. आदित्य पुरी आपल्या प्रदीर्घ कार्यकाळात अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले. आम्ही आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतो; असेही आयसीआयसीआय बँकेच्या अधिकृत हँडलवरुन ट्वीट करण्यात आले. एचडीएफसी प्रमाणेच आयसीआयसीआय ही बँकही भारतातील एक आघाडीची खासगी बँक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी