मेहनतीचं फळ... बस कंडक्टर पास झाला UPSC मुख्य परीक्षा!

काम-धंदा
रोहित गोळे
Updated Jan 30, 2020 | 13:13 IST

IAS (UPSC) Success Story: बंगळुरुमधील एका कंडक्टरने कठोर मेहनतीच्या जोरावर एक मोठं यश मिळवलं आहे. त्याने यूपीएससी मुख्य परीक्षा पास केली आहे.  

after 8 hours of work 5 hours of study bus conductor passed upsc  mains exam
मेहनतीचं फळ... बस कंडक्टर पास झाला UPSC मुख्य परीक्षा!  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • बस कंडक्टर आयएएस अधिकारी होण्यापासून फक्त एक पाऊल दूर
  • बस कंडक्टरची कठोर मेहनत, यूपीएससीची मुख्य परीक्षा झाला पास
  • यूपीएससी मुलाखतीनंतर येणार अंतिम निकाल

बंगळुरु: IAS (UPSC) Success Story: मेहनत करणाऱ्यांची कधीही हार होत नाही हे  पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. बीएमटीसीच्या कंडक्टर मधु एनसी याने केलेली अथक मेहनत आता फळाला आली आहे. कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यातील मधु एनसी हा बंगळुरू महानगर परिवहन महामंडळात (बीएमटीसी) कंडक्टर म्हणून काम करत आहेत. वयाच्या १९व्या वर्षीच त्याने ही नोकरी करण्यास सुरुवात केली होती. मात्र, अलीकडेच मधूने  केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली नागरी सेवा (मेन्स) मुख्य परीक्षा पास केली आहे. आपलं दररोजचं काम सांभाळून मधून अभ्यासही करायचा. अखेर त्याच्या या मेहनतीला यश मिळालं आहे. 

आम्हाला पुरेशा सोयी-सुविधा नाहीत, म्हणून अभ्यास होत नाही असं म्हणणाऱ्या लोकांना २९ वर्षीय मधूने मेहनतीच्या जोरावर काय साध्य करता येतं हे दाखवून दिलं आहे.  २९ वर्षीय मधू हा दररोजच्या ८ तासाच्या नोकरीनंतर पाच तास  अभ्यासासाठी काढायचा. कोणत्याही कोचिंगशिवाय स्वत: तयारी करून तो मुख्य परीक्षेत यशस्वी झाला आहे. आता २५ मार्च रोजी त्यांची मुलाखत होणार आहे. ज्यानंतर यूपीएससीचा मुख्य निकाल जाहीर केला जाईल.  

एक भाऊ, वहिनी आणि आई-वडील असा मधूचा  परिवार आहे. हे सर्व जण सध्या त्याला या मुलाखतीत यश मिळावं यासाठी प्रार्थना करीत आहेत.

मधुला बंगळुरू महानगर परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक आयएएस सी शिखा यांच्यासारखंच आयएएस अधिकारी व्हायचं आहे. यूपीएससी परीक्षेसाठी तो सी शिखा यांची मदत घेत आहे. मधूला त्यांच्यापासून बरीच प्रेरणा घेतो. मुख्य परीक्षेआधी सी शिखा या मधूला प्रत्येक आठवड्यात दोन तास शिकवत असे.

मुख्य परीक्षेसाठी मधूने राज्यशास्त्र (पॉलिटिकल सायन्स), आंतरराष्ट्रीय संबंध, नीतीशास्त्र आणि भाषा या विषयांची निवड केली होती. राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे विषय त्याने मुख्य परीक्षेत वैकल्पिक विषय म्हणून निवडले होते. 

दरम्यान, मधूचा इथवरचा प्रवास हा फार सोपा नव्हता. २०१४ मध्ये मधूने कर्नाटक प्रशासकीय सेवा परीक्षा दिली होती. मात्र, त्याला यश आलं नव्हतं. त्यानंतर २०१८ साली त्याने यूपीएएसी परीक्षाही दिली होती. पण त्यात तो अपयशी ठरला होता. मात्र, या अपयशाने अजिबात खचून न जाता त्याने मेहनत सुरुच ठेवली. अखेर यंदा त्याने यूपीएससीची मुख्य परीक्षा पास केली आहे. मात्र, आता यूपीएससीच्या पॅनलकडून घेतली जाणारी मुलाखत पास होण्याचं आव्हान त्याच्यासमोर असणार आहे. मात्र, मधू ही मुलाखत देखील यशस्वीरित्या पास होईल याबाबत सगळ्यांनाच आशा आहे. त्याला यथायोग्य यश मिळावं यासाठी टाइम्स नाऊ मराठीकडून देखील शुभेच्छा.   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी