Succes Story : दगड फोडणारे युवक झाले परदेशात योग प्रशिक्षक 

काम-धंदा
Updated Jun 11, 2019 | 16:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

अहमदनगरमध्ये शेतात दगड फोडण्याचं काम करणारे युवक आता चीन, व्हिएतनाम आणि इतर देशांत योग प्रशिक्षक म्ह्णून सध्या कार्यरत आहेत. मोक्ष योग संस्थेचे संस्थापक देवा म्हालू यांच्या प्रयत्नातून हे साध्य झाले आहे.

yoga
अहमदनगरमध्ये शेतात दगडं फोडणारे तरूण झाले परदेशात योग प्रशिक्षक 

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे ७० युवक सध्या परदेशात योग प्रशिक्षक म्ह्णून कार्यरत आहेत. या युवकांनी मोक्ष योग संस्थेमध्ये प्रशिक्षण पूर्ण केले आहे. राज्याच्या इतर भागातून आलेले पण  मोक्ष योग संस्थेमध्ये प्रशिक्षण घेतलेले सुमारे १०० युवक युवती आज परदेशात योग प्रशिक्षक म्ह्णून कार्यरत आहेत. 

अहमदनगर हा पर्जन्यछायेचा जिल्हा ओळखला जातो. त्यामुळे शेतजमीन असून पण त्यातून फारसे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे रोजगारासाठी  जमिनीत दगड फोडण्याची कामं आजही अनेक तरुण करत आहेत. पण यातून फारशी कमाई होत नव्हती. अनेक तरुण रोजगाराचे इतर पर्याय शोधत असताना मोक्ष योगा संस्थेचे देवा म्हालू यांच्या ध्यानात ही समस्या आली. देवा म्हालू हे गेली २० वर्ष योग प्रशिक्षक म्ह्णून काम करत आहेत. तसंच मोक्ष योग संस्थेच्या भारतात आणि परदेशात शाखा आहेत.

देवा म्हालू यांनी या युवकांशी संवाद साधायला सुरवात केली. योग प्रशिक्षणाचे फायदे पण त्यांना समजावून सांगितले. या मुलांना योग प्रशिक्षणासाठी तयार केलं. यासाठी संगमनेरमध्ये मोक्ष योग संस्थेची स्थापना केली आणि त्यामाध्यमातून या युवकांना प्रशिक्षण देण्यास सुरवात केली. गेल्या तीन वर्षांपासून देवा याठिकाणी योग प्रशिक्षणाचे धडे युवकांना देत आहेत. ग्रामीण भागातून आलेल्या या तरुणांना सुरवातीला योगाचे धडे घेणे अवघड गेले. पण देवा यांनी त्याचे महत्त्व त्यांना पटवून दिले आणि त्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले. योग प्रशिक्षकाची पदविका त्यांना देण्यात आली. पहिल्या तुकडीमध्ये ३५ युवकांना हे प्रशिक्षण देण्यात आले आणि या ३५ युवकांना चीनमध्ये योग प्रशिक्षक म्ह्णून लगेच कामंही मिळाले. 

योग प्रशिक्षणाबरोबर चिनी भाषेचे जुजबी ज्ञानही या युवकांना दिले जात आहे. त्यामुळे इंग्रजी भाषा उत्तम येत नसली तरी चिनी भाषा थोडीफार येते त्यामुळे परदेशात काम करण्याचा न्यूनगंड या युवकांमध्ये येत नाही. सध्या योग प्रशिक्षक म्ह्णून परदेशात काम करणाऱ्या अनेक तरुण नगर जिल्ह्याच्या बाहेर पण गेले नव्हते. ते आज थेट परदेशात प्रशिक्षक म्ह्णून गेले आहेत. 

आज शिक्षण घेऊन पण रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीमध्ये देवा म्हालू यांनी योग प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगाराचा नवीन पर्याय उपल्बध करून दिला आहे. सरकार तर योगाच्या प्रचारासाठी अनेक प्रयत्न करत आहे. पण नागरिकांचा सहभाग पण त्यामध्ये महत्त्वाचा आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी