Air India to pay royalty : नवी दिल्ली : एअर इंडियाला (Air India) टाटा समूहाने (Tata Group) विकत घेतली आहे. त्यामुळे आता एअर इंडियाचे व्यवस्थापन टाटांच्या ताफ्यातील इतर कंपन्यांप्रमाणेच होणार आहे. एअर इंडियामागे आता टाटा या ब्रॅंडचे (Tata Brand) नाव लागणार आहे. त्यामुळेच आगामी काळात टाटा सन्सला ब्रँड रॉयल्टी (Brand Royalty) द्यावी लागण्याची शक्यता आहे. म्हणजे एअर इंडिया ही टाटा समूहाची कंपनी बनली आहे, पण आता अशी माहिती समोर येते आहे की टाटा ब्रँड वापरण्यासाठी एअर इंडियाला टाटा सन्सला (Tata Sons) रॉयल्टी द्यावी लागू शकते. जर एअर इंडिया टाटा समूहाने विकत घेतली आहे तर एअर इंडियाला स्वतःच्या मूळ कंपनीला रॉयल्टी का द्यावी लागेल? याबद्दल समजून घेऊया. (Air India need to give royalty to Tata Sons, see why?)
एअर इंडिया आता टाटा समूहाचीच कंपनी झाल्यावर तिने टाटा समूहाला रॉयल्टी काय द्यायची ? यामागचे कारण म्हणजे टाटा सन्सने एअर इंडियाच्या खरेदीसाठी, त्यांच्याच टेल्स प्रायव्हेट लिमिटेड या एका उपकंपनी मार्फत बोली लावली होती. म्हणजेच एअर इंडिया तांत्रिकदृष्ट्या टेल्सच्या हातात आली आहे. आता रॉयल्टीचा मुद्दा पाहूया. एअर इंडिया पूर्णपणे टेल्सच्या हातात आल्यानंतर, जेव्हा नवीन एअरलाइन्स ऑपरेशन सुरू करेल तेव्हा ती टाटा ब्रँड नाव वापरतील. आता टाटा सन्स ही टाटा समूहाची होल्डिंग कंपनी आहे. टाटा ब्रँड वापरण्याच्या बदल्यात या नवीन एअरलाइनने म्हणजेच एअर इंडियाने टाटा सन्सला तांत्रिकदृष्ट्या त्याचे पैसे दिले पाहिजेत.
टाटा समूहाकडे एअर इंडिया हस्तांतरित करण्याची औपचारिकता या महिन्याच्या अखेरीस पूर्ण होईल. या औपचारिकतांमध्ये, ब्रँड रॉयल्टी भरण्याच्या पद्धतीचाही उल्लेख आहे, परंतु, इथून आणखी एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की, विस्तारा आणि एअर एशियामध्ये टाटा समूहाची हिस्सेदारी आहे, मग या कंपन्यादेखील टाटा सन्सला रॉयल्टी देतात का? तर याचे उत्तर नाही असे आहे. त्यामागील कारण म्हणजे विस्तारा आणि एअरएशिया टाटा ब्रँड वापरत नसल्यामुळे त्यांना रॉयल्टी देण्याची आवश्यकता नाही. पण आणखी एक प्रश्न उद्भवतो की टाटा सन्स ब्रँड वापरण्यासाठी स्वतःच्या कंपन्यांकडून रॉयल्टी का घेते? टाटा समूहाच्या टाटा ब्रँड इक्विटी अँड बिझनेस प्रमोशन (TBEBP) योजनेमध्ये याचे उत्तर आहे. या योजनेअंतर्गत टाटा सन्स समूह कंपन्यांकडून रॉयल्टी घेते.
टाटा समूहाला एअर इंडियाला विकत घेतल्यानंतर जगभरातील अनेक विमानतळांवर स्लॉटचा फायदा मिळाला आहे. याशिवाय १३० पेक्षा विमानांचा ताफा मिळाला आहे. एअर इंडियाचे हजारो कर्मचारी, पायलटदेखील मिळाले आहेत. या सर्व जमेच्या बाजू आहेत. मात्र एअर इंडियामुळे टाटांना काही तोटाही आहे. अनेक वर्षांपासून तोट्यात असलेल्या एअर इंडियाची प्रतिमा अतिशय वाईट झाली आहे. ही कंपनी वेळेवर सेवा देत नाही. कंपनीची सेवा वाईट आहे, असे मत तयार झाले आहे. त्यातच सध्या भारतातील विमानसेवा व्यवसायाची ५७ टक्के बाजारपेठ इंडिगोकडे आहे. त्यामुळे एअर इंडियाची प्रतिमा सुधारत इतर कंपन्यांशी स्पर्धा करत बाजारपेठेत स्थान मिळवण्यासाठी टाटांना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. २०१२ मध्ये २७,००० कर्मचारी असलेल्या एअर इंडियामध्ये आता १३,५०० कर्मचारी राहिले आहेत.