भारत सरकारला टाटा करत 'Air India' पुन्हा 'टाटा' समूहाकडे, एअर इंडियाचे राउंड तिकिट, टाटा...भारत सरकार...टाटा

१९३२साली उद्योगमहर्षी जेहांगिर रतनजी दादाभॉय टाटा म्हणजेच जेआरडी टाटा यांनी एअर इंडियाची सुरूवात केली होती. एअर इंडियाच्या ऐतिहासिक लिलाव प्रक्रियेत अखेर टाटा समूहाने (Tata Group) बाजी मारली आहे.

Tata group wins the bid for Air India
पुन्हा एकदा टाटा समूहाकडेच एअर इंडियाची मालकी 
थोडं पण कामाचं
  • एअर इंडियाच्या ऐतिहासिक लिलाव प्रक्रियेत अखेर १८,००० कोटींच्या बोलीसह टाटा समूहाची बाजी
  • एअर इंडिया पुन्हा टाटा समूहाच्या अधिपत्याखाली
  • डिसेंबरअखेर टाटा एअर इंडियाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया होणार पूर्ण

नवी दिल्ली: एअर इंडियाच्या ऐतिहासिक लिलाव प्रक्रियेत अखेर टाटा समूहाने (Tata Group)बाजी मारली आहे. एअर इंडियाची (Air India) मालकी आता टाटा सन्सकडेच असणार आहे. अनेक दशकांनंतर पुन्हा एकदा एअर इंडिया टाटांच्याच पंखाखाली पुढील वाटचाल करणार आहे. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन सचिव तुहीन कांता यांनी यासंदर्भातील घोषणा आज केली आहे. टाटा सन्सने एअर इंडियासाठी १८,००० कोटी रुपयांची बोली लावली होती. तर स्पाइसजेटच्या अजय सिंग यांनी एअर इंडियासाठी १५,१०० कोटी रुपयांची बोली लावली होती. या ऐतिहासिक लिलाव प्रक्रियेत टाटा समूहाने जास्त बोली लावत एअर इंडियाच्या अधिग्रहणात यश मिळवले आहे. एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे जाण्याची प्रक्रिया यावर्षीच डिसेंबरअखेर पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. (Air India: Tata group wins the bid for Air India by beating the SpiceJet) 

टाटा समूहाची सर्वात मोठी बोली

केंद्र सरकारने तोट्यातील एअर इंडियाच्या खासगीकरणासाठी लिलाव प्रक्रिया सुरू केली होती. त्यानंतर जगभरातून यासाठी बोली प्रस्ताव मागवण्यात आले होते. या सर्व प्रक्रियेत अंतिम दोन प्रस्ताव विचाराधीन होते. एक टाटा समहूाचा तर दुसरा स्पाइसजेटच्या अजय सिंगांचा. यात टाटा सन्सने १८,००० कोटी रुपयांची बोली एअर इंडियासाठी लावली होती तर स्पाइसजेटने १५,१०० कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला होता. त्यामुळे ही लिलाव प्रक्रिया टाटा सन्सने जिंकली आहे. मागील अनेक वर्षांपासून एअर इंडियाच्या खासगीकरणासाठी प्रयत्नशील असणाऱ्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. 

रतन टाटांनी केले एअर इंडियाचे स्वागत

टाटा समूहाने एअर इंडियासाठीची बोली जिंकल्यानंतर रतन टाटांनी एअर इंडियाचे स्वागत केले आहे. 'वेलकम बॅक, एअर इंडिया' असे म्हणत रतन टाटांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. त्याचबरोबर सरकारने काही क्षेत्रे खासगी गुंतवणुकीसाठी खुली केल्याबद्दल आभारदेखील मानले आहेत.

एअर इंडियाचा व्यवसाय

कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या एअर इंडियाकडे १२७ विमाने आहेत तर भारतातील एकूण आंतरराष्ट्रीय उड्डाणांपैकी ५०.६४ टक्के व्यवसाय एअर इंडियाकडे आहे. सध्या एअर इंडिया जगभरातील ४२ ठिकाणांना आपली सेवा पुरवते. केंद्र सरकार एअर इंडियामधील आपला संपूर्ण हिस्सा विकते आहे. टाटा समूहाकडे याआधीच एअरएशिया या विमानसेवा कंपनीचा ८४ टक्के हिस्सा आणि विस्तारा एअरलाइन्सचा ५१ टक्के मालकी हिस्सा आहे. त्यामुळे देशाच्या विमानसेवा क्षेत्राच्या अवकाशावर पुन्हा एकदा टाटा समूह भरारी घेणार आहे.

एअर इंडियाची स्थापना जेआरडी टाटांकडून

एअर इंडिया आणि टाटा समूहाचे नाते १९३२ सालापासूनचे आहे. १९३२साली उद्योगमहर्षी जेहांगिर रतनजी दादाभॉय टाटा म्हणजेच जेआरडी टाटा यांनी एअर इंडियाची सुरूवात केली होती. ही भारतातील पहिली विमानसेवा कंपनी होती. १९३८ मध्ये एअर इंडियाने परदेशात सेवा देण्यात सुरूवात केली होती. त्यावेळेस या कंपनीचे नाव टाटा एअर सर्व्हिसेस असे होते. नंतर ते टाटा एअरलाइन्स असे करण्यात आले होते. टाटा एअरलाइन्सने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश रॉयल एअर फोर्ससाठी सध्याच्या म्यानमारमधील काही मदत कार्यातदेखील सहभाग घेतला होता. दुसऱ्या महायुद्धानंतर कंपनीचे नाव एअर इंडिया असे करण्यात आले होते. त्यानंतर भारत सरकारने यात रस घेत कंपनीची मालकी घेतली होती. त्यावेळेस भारत सरकारने एअर इंडियामधील ४९ टक्के हिस्सेदारी विकत घेतली होती. एअर कॉर्पोरेशन्स अॅक्ट १९५३ अंतर्गत केंद्र सरकारने एअर इंडियाची संपूर्ण मालकी ताब्यात घेत टाटा सन्सकडून कंपनीचे नियंत्रण स्वत:कडे एअर इंडियाचे राष्ट्रीयीकरण केले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी