अनिल अंबानी संकटात, मुकेश अंबानींची भरभराट

Anil Ambani facing crisis and Mukesh Ambani JIO get 12 FDI अनिल अंबानी जेलमध्ये जाण्याची शक्यता असताना त्यांचे ज्येष्ठ बंधू मुकेश अंबानी यांची भरभराट झाली आहे.

jio hq
जिओ कंपनीचे नवी मुंबईतील मुख्यालय 

थोडं पण कामाचं

 • अनिल अंबानी संकटात, मुकेश अंबानींची भरभराट
 • जिओने एप्रिल ते जुलै दरम्यान १२ विदेशी गुंतवणूकदारांना २५.०९ टक्के मालकी हक्क विकले
 • थेट विदेशी गुंतवणुकीच्या स्वरुपात जिओने १,१७,५८८.४५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवली

मुंबईः अनिल अंबानी (Anil Ambani) जेलमध्ये जाण्याची शक्यता असताना त्यांचे ज्येष्ठ बंधू मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची भरभराट झाली आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समुहातील रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड कंपनीने एप्रिल ते जुलै दरम्यान १२ विदेशी गुंतवणूकदारांना २५.०९ टक्के मालकी हक्क विकून १,१७,५८८.४५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवली आहे. अमेरिकेतील इंटेल कॅपिटल कंपनीने जिओचे ०.३९ टक्के मालकी हक्क १,८९४.५ कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. इंटेल कॅपिटल  ही कॉम्प्युटरसाठी चिप तयार करणाऱ्या इंटेलची उपकंपनी आहे. 

लॉकडाऊन काळात जिओ कंपनीची भरभराट

कोरोना संकटामुळे देशात २२ मार्चला एक दिवसाचा जनता कर्फ्यू जाहीर झाला. नंतर २५ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. आता अनलॉक सुरू असले लॉकडाऊन पूर्णपणे संपलेले नाही. पण या कोरोना संकटाच्या काळात जिओ कंपनीत विदेशी गुंतवणूकदारांनी अब्जावधी डॉलरची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीमुळे जिओ ही भारतातील सर्वात मोठी इंटरनेट आणि टेलिकम्युनिकेशन सेवा देणारी कंपनी झाली आहे. लॉकडाऊन काळात अनेक कंपन्या आर्थिक अडचणीत सापडल्या असताना जिओची भरभराट झाली.

जिओ कंपनीची उत्तुंग भरारी

जिओची स्थापना २०१५ मध्ये झाली. सध्या ही कंपनी 4जी तंत्रज्ञानाद्वारे देशात इंटरनेट, टेलिकम्युनिकेशन आणि मनोरंजन या सेवा देत आहे. थेट विदेशी गुंतवणुकीमुळे जिओ   कंपनीला आंतरराष्ट्रीय पातळीवर विस्तार करण्यासाठी तयारी करण्याची संधी मिळाली आहे. जिओचे सर्व गुंतवणूकदार हे तंत्रज्ञान आणि पायाभूत सेवा या क्षेत्रांमध्ये मोठी गुंतवणूक करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. या गुंतवणूकदारांच्या अनुभवाचा तसेच त्यांच्या तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन जिओ पुढील काही वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी भरारी मारू शकेल, असा विश्वास रिलायन्स समुहाला वाटत आहे. 

जिओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी झालेले बारा थेट विदेशी गुंतवणुकीचे करार (२०२०)

 1. २२ एप्रिल - फेसबुक  - ४३ हजार ५७४ कोटींच्या गुंतवणुकीद्वारे ९.९९ टक्के मालकी हक्कांची खरेदी
 2. ३ मे  - सिल्व्हर लेक इक्विटी फर्म - ५,६५५.७५ कोटींच्या गुंतवणुकीतून १.१५ टक्के मालकी हक्कांची खरेदी
 3. ६ जून - सिल्व्हर लेक इक्विटी फर्म - ४,५४६.८० कोटींची गुंतवणूक करुन आणखी ०.९३ टक्के मालकी हक्कांची खरेदी
 4. ८ मे - व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स - ११,३६७ कोटींच्या गुंतवणुकीतून २.३२ टक्के मालकी हक्कांची खरेदी
 5. १७ मे - जनरल अटलांटिक - ६,५९८.३८ कोटींची गुंतवणूक करुन १.३४ टक्के मालकी हक्कांची खरेदी
 6. २२ मे - केकेआर - ११,३६७ कोटींच्या गुंतवणुकीतून २.३२ टक्के मालकी हक्कांची खरेदी
 7. ५ जून - मुबादला इन्व्हेस्‍टमेंट - ९,०९३.६० कोटींच्या गुंतवणुकीतून १.८५ टक्के मालकी हक्कांची खरेदी
 8. ७ जून - अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी - ५,६८३.५० कोटींच्या गुंतवणुकीतून १.१६ टक्के मालकी हक्कांची खरेदी
 9. १३ जून - टीपीजी - ४,५४६.८० कोटींची गुंतवणूक करुन ०.९३ टक्के मालकी हक्कांची खरेदी
 10. १३ जून - एल कॅटर्टन (L Catterton) - १,८९४.५० कोटींची गुंतवणूक करुन ०.३९ टक्के मालकी हक्कांची खरेदी
 11. १९ जून - पीआयएफने २.३२ टक्के मालकी हक्क खरेदीसाठी मोजले  ११,३६७ कोटी रूपये
 12. ३ जुलै - इंटेल कॅपिटल कंपनीने जिओचे ०.३९ टक्के मालकी हक्क १,८९४.५ कोटी रुपयांना विकत घेतले

अनिल अंबानी संकटात

मुकेश अंबानी यांची भरभराट सुरू असताना अनिल अंबानी संकटात सापडले आहेत. लंडनचे उद्योगपती अशी स्वतःची नोंद करवून घेणाऱ्या अनिल अंबानी यांना लंडनच्या एका कोर्टाने नोटीस बजावली आहे. जगभरातील स्वतःच्या मालकीच्या संपत्तीची माहिती, इन्कम टॅक्स रिटर्न (आयकर विवरणपत्र), मागील २४ महिन्यांतील सर्व बँक खात्यांमधील आर्थिक व्यवहारांची नोंदी, स्वतःच्या मालकीच्या प्रत्येक घराचे मागील २४ महिन्यांतील वीज व पाण्याचे बिल तसेच घरभाडे भरल्याच्या पावत्या आणि सर्व क्रेडिट कार्डांची बिले २० जुलैपर्यंत सादर करा, असा आदेश कोर्टाने बजावला आहे. अनिल अंबानी यांच्या सध्याच्या सांपत्तिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी कोर्टाने ही नोटीस बजावली आहे. 

चीनच्या ३ बँकांकडून अनिल अंबानी यांनी लंडनचे उद्योगपती म्हणून ७,१७० लाख डॉलरचे कर्ज उचलले होते. या  कर्जाची परतफेड करण्यात अपयशी ठरल्यामुळे अनिल अंबानी यांच्या विरोधात कोर्टाने कारवाई सुरू केली आहे. 'सत्यकथन करा आणि कर्जाची परतफेड करण्याची तजवीज करा नाही तर जेलमध्ये जाण्याची तयारी करा'; असा स्पष्ट इशारा कोर्टाने अनिल अंबानी यांना दिला आहे. एकेकाळी अब्जाधीशांच्या यादीत मानाने मिरवणारे अनिल अंबानी आता पार रसातळाला पोहोचले आहेत. मुंबईत स्टेट बँकेनेही अनिल अंबानी यांच्याकडे १२०० कोटी रुपयांच्या कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावला आहे. भारताच्या कंपनी कायदा लवादाने कर्ज वसुली प्रकरणी आदेश राखून ठेवला असताना लंडनच्या कोर्टाचा आदेश आला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी