Bank employees preparing to go on strike in January 2023 : युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स अर्थात यूएफबीयू (United Forum of Bank Unions - UFBU) जानेवारी महिन्यात संपावर जाण्याच्या तयारीत आहे. हा संप झाला तर बँकांशी संबंधित कामकाज किमान 4 दिवस कोलमडण्याची शक्यता आहे.
यूएफबीयूच्या पदाधिकाऱ्यांची गुरुवार 12 जानेवारी 2023 रोजी मुंबईत बैठक झाली. या बैठकीत 30 आणि 31 जानेवारी 2023 रोजी संप करण्याच्या मुद्यावर चर्चा झाली. ऑल इंडिया बँक एम्पॉइज असोसिएशनचे (All India Bank Employees Association - AIBEA) राष्ट्रीय सरचिटणीस सी. एच. वेंकटचलम यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
बँक कर्मचाऱ्यांसाठी कामकाजाचा आठवडा फक्त 5 दिवसांचा असावा आणि दर शनिवार-रविवार सुटी असावी ही यूएफबीयूची एक महत्त्वाची मागणी आहे. या व्यतिरिक्त पगारवाढ, पेन्शनवाढ या पण मागण्या आहेत. राष्ट्रीय पेन्शन व्यवस्था (National Pension System - NPS) रद्द करावी. नव्या बँक कर्मचाऱ्यांच्या भरतीची मागणी पण संघटनेने केली आहे. पण संघटनेच्या मागण्यांना भारतीय बँकांच्या संघटनेकडून (Indian Banks' Association - IBA) उत्तर आलेले नाही. यामुळे मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी 30 आणि 31 जानेवारी 2023 रोजी यूएफबीयू संप करणार असल्याचे सी. एच. वेंकटचलम म्हणाले.
बँकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर संप मागे घेतला जाईल. पण सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर संप अटळ असल्याचे सी. एच. वेंकटचलम यांनी सांगितले.
ठरल्याप्रमाणे 30 आणि 31 जानेवारी 2023 रोजी संप झाला तर बँकांशी संबंधित कामकाज किमान 4 दिवस कोलमडण्याची शक्यता आहे. कारण सध्या बँकांना दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुटी असते तसेच दर आठवड्याच्या रविवारी सुटी असते. जानेवारी 2023चा चौथा शनिवार 28 जानेवारी 2023 रोजी आहे तर रविवार 29 जानेवारी 2023 रोजी आहे. यामुळे बँकांशी संबंधित कामकाज 28 जानेवारी ते 31 जानेवारी 2023 असे सलग 4 दिवस कोलमडण्याची शक्यता आहे.
बँका सुरू असो वा बंद नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, एटीएम, मोबाईल वॉलेट, यूपीआय या सेवा सुरू राहणार आहेत. यामुळे बँकांचे बहुसंख्य आर्थिक व्यवहार विना अडथळा सुरू राहतील. पण ज्यांना बँकेत जाऊन एखादे काम करायचे आहे त्यांनी बँका कोणकोणत्या दिवशी बंद आहेत ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे. यामुळे त्यांना बँकेत नेमके कोणत्या दिवशी जायचे याचे नियोजन करणे सोपे होईल. । काम-धंदा । बँक