नागरिकांसाठी दिलासा देणारी सर्वात मोठी बातमी

काम-धंदा
Updated Sep 23, 2019 | 22:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

येत्या २६ सप्टेंबर आणि २७ सप्टेंबर रोजी बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेण्यात आला आहे. अर्थ सचिवांसोबत झालेल्या बैठकीनंतर बँक कर्मचारी संघटनेने हा संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

bank strike deferred finance secretary india business news
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

 • राष्ट्रीय बँक कर्मचाऱ्यांचा नियोजित संप मागे
 • नागरिकांची होणार गैरसोय टळली
 • बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेतल्याने नागरिकांना दिलासा

नवी दिल्ली: येत्या २६ सप्टेंबर पासून बँक कर्मचाऱ्यांनी दोन दिवसीय संपाची हाक दिली होती. मात्र, अर्थ सचिवांसोबत बँक कर्मचारी संघटनेच्या नेत्यांच्या झालेल्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे आता २६ सप्टेंबर आणि २७ सप्टेंबर रोजी बँका सुरुच राहणार आहेत. 

केंद्र सरकारने देशातील १० बँकांचे विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात सार्वजनिक क्षेत्रातील बँक अधिकाऱ्यांच्या चार संघटनांनी ही संपाची हाक दिली होती. बँक कर्मचाऱ्यांनी भलेही दोन दिवसीय संपाची हाक दिली होती मात्र या संपामुळे चार दिवस बँका बंद राहणार होत्या. कारण, २६ सप्टेंबर रोजी गुरुवार, २७ सप्टेंबर रोजी शुक्रवार, २८ सप्टेंबर रोजी चौथा शनिवार आणि २९ सप्टेंबर रोजी रविवार असल्याने चार दिवस बँकांचे कामकाज बंद राहिले असते. मात्र आता संप मागे घेतल्याने नागरिकांना एक मोठा दिलासा मिळाला आहे.

ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फेजरेशन (AIBOC), ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन (AIBOA), इंडियन नॅशनल बँख ऑफिसर्स काँग्रेस (INBOC) आणि नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स (NOBO) या बँक संघटनांनी संपाची हाक दिली होती.

काय आहेत बँक कर्मचारी संघटनांच्या मागण्या?

 1. बँकांच्या विलिनीकरणाला विरोध 
 2. रोकड रकमेच्या व्यवहारासाठीचा असलेला वेळ कमी करावा 
 3. पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी
 4. आरबीआयच्या नियमानुसार निवृत्ती वेतन द्यावे 
 5. वेतनात बदल करावे 
 6. बँकांमध्ये नोकर भरती करावी 
 7. ग्राहकांसाठी असलेल्या सेवा शुल्कात कपात करणअयाची मागणी 
 8. एनपीएस रद्द करण्याची मागणी

केंद्र सरकारने १० बँकांचे विलिनीकर करुन चार मोठ्या बँका बनवण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचे पंजाब नॅशनल बँकेत विलिनीकरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सिंडिकेट बँकेचे कॅनरा बॅंकेत विलिनीकरण, अलाहाबाद बँकेचे इंडियन बँकेत विलिनीकरण तर आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचे युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलिनीकरण करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी