बॅंकिंग : सेव्हिंग्स खात्यावर बंधन बॅंक देतेय ७ टक्के व्याज, या बॅंकांमध्ये खाते उघडण्यात फायदा

काम-धंदा
Updated Apr 18, 2021 | 15:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

जर तुम्हाला तुमचे सेव्हिंग्स अकाउंट सुरू करायचे असेल तर कोणत्या बॅंकेत बचत खाते उघडल्याचे फायदेशीर ठरेल, कोणती बॅंक बचत खात्यावर किती व्याज देते आहे हे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे.

Which bank is giving highest interest rate
बंधन बॅंक देते आहे बचत खात्यावर ७ टक्के व्याज 

थोडं पण कामाचं

  • बचत खाते सुरू करण्यापूर्वी जाणून घ्या व्याजदर
  • कोणत्या बॅंका देतायेत जास्त व्याज
  • ७ टक्क्यांपर्यत व्याज देणारी बॅंक

नवी दिल्ली : जर तुम्हाला तुमचे सेव्हिंग्स अकाउंट सुरू करायचे असेल तर कोणत्या बॅंकेत बचत खाते उघडल्याचे फायदेशीर ठरेल, कोणती बॅंक बचत खात्यावर किती व्याज देते आहे हे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. परंतु बऱ्याचवेळा नागरिक कोणतीही माहिती न घेता कोणत्याही बॅंकेत खाते उघडतात. त्यामुळे नंतर त्यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येते. काही बॅंका बचत खात्यावर ७ टक्क्यांपर्यत व्याज देत आहेत. अशाच एका बॅंकेबद्दल जाणून घेऊया, जी बचत खात्यावर चांगल्या व्याजदराची ऑफर देते आहे.

विविध बॅंका पुढीलप्रमाणे बचत खात्यावर व्याज देत आहेत

बॅंक                                              व्याजदर


बंधन बॅंक                                      ३ ते ७.१५  टक्के 
आरबीएल बॅंक                              ४.७५ ते ६.५० टक्के
इंडसइंड बॅंक                                ४ ते ६ टक्के
आयडीएफसी बॅंक                         ३.५० ते ६ टक्के
यस बॅंक                                        ४ ते ५.५० टक्के
पोस्ट ऑफिस                                ४   टक्के
युनियन बॅंक ऑफ इंडिया               ३ ते ४   टक्के
पंजाब नॅशनल बॅंक                         ३ ते ३.५०  टक्के
बॅंक ऑफ इंडिया                           २.९०  टक्के
स्टेट बॅंक ऑफ इंडिया                    २.७०  टक्के


 
बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजावर द्यावा लागतो कर


इन्कम टॅक्स अॅक्टच्या सेक्शन ८०टीटीए अंतर्गत बॅंक, पोस्ट ऑफिस किंवा को-ऑपरेटिव्ह सोसायटीमधील बचत खात्यातील रकमेवर मिळणाऱ्या व्याजातील वार्षिक १०,००० रुपयांपर्यतचे व्याज हे करमुक्त आहे. याचा लाभ ६० वर्षांपेक्षा कमी वयोगटातील नागरिक किंवा संयुक्त हिंदू कुटुंबास मिळतो. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सवलत ५०,००० रुपयांपर्यत आहे. यापेक्षा जास्त उत्पन्नावर टीडीएस कापला जातो.

जर तुमचे प्राप्तिकराच्या स्लॅबमध्ये येत नसेल तर काय करावे


जर तुमचे बचत खाते, मुदतठेवी किंवा आरडी याद्वारे मिळणारे वार्षिक व्याज १०,००० रुपयांपेक्षा अधिक आहे मात्र एकूण उत्पन्न (व्याजासह) प्राप्तिकराच्या स्लॅबमध्ये येत नसेल तर बॅंक तुमच्या खात्यातून टीडीएस कापत नही. यासाठी ज्येष्ठ नागरिकांना बॅंकेत फॉर्म १५एच आणि इतरांना फॉर्म १५जी भरावा लागतो. फॉर्म १५ जी किंवा फॉर्म १५एच खातेधारकाने स्वत:च दिलेली माहिती असते. यामध्ये खातेधारक आपले उत्पन्न प्राप्तिकराच्या करमर्यादेपेक्षा कमी असल्याचे जाहीर करतो. जी व्यक्ती असा फॉर्म भरते त्या व्यक्तीला प्राप्तिकर भरावा लागत नाही.

जागरूक रहा

विविध बॅंका बचत खाते, मुदतठेवी यावर वेगेवेगळे व्याज देत असतात. शिवाय अनेक बॅंकांच्या गुंतवणुकीच्या विविध योजना असतात. बॅंकेत पैसे ठेवताना आणि कोणत्याही बॅंकेत खाते उघडताना त्या बॅंकेतील व्याजदर आणि विविध ऑफरची माहिती घेणे आवश्यक असते. शिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठीही विविध योजना असतात. सध्या बॅंकांचे व्याजदर कमी झालेले आहेत. त्यामुळे बचत खाते उघडण्यापूर्वी आणि मुदतठेवींमध्ये पैसे गुंतवण्याआधी विविध बॅंकांचे व्याजदर आणि त्यांच्या विविध ऑफरची माहिती करून घ्या, त्या सर्वांची योग्य ती तुलना करून मगच तुमचा निर्णय घ्या. यामुळे उपलब्ध पर्यायांमधून योग्य पर्यायाची निवड तुम्ही करू शकाल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी