ITR Benefits : इन्कम टॅक्स भरण्याचे चार मोठे फायदे, हे वाचून आजच कराल फाईल

आयकर भरणं कसं टाळता येईल, याचा विचार अनेकजण करत असतात. मात्र प्रत्यक्षात आयकर भरण्याचे अनेक फायदे होतात.

ITR Benefits
इन्कम टॅक्स भरण्याचे चार मोठे फायदे  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • इन्कम टॅक्स भरण्याचे अनेक फायदे
  • कर्ज मिळण्यासाठी ITR अत्यावश्यक
  • विम्यासाठीही विचारतात आयकर परताव्याचे तपशील

ITR Benefits: प्रत्येक भारतीय नागरिकाला आयकर भरणं बंधनकारक असतं. इन्कम टॅक्स भरण्यासाठी सरकारने एक अंतिम मुदत जाहीर केलेली असते. त्या मुदतीपूर्वी सर्वांनी टॅक्स फाईल करणं गरजेचं असतं. सरकारकडून जाहीर करण्यात आलेली 31 जुलैची मुदत आता जवळ आली असून टॅक्स भरण्यासाठी सर्वांची गडबड सुरू झाली आहे. मात्र शेवटचा दिवस येईपर्यंत वाट न पाहता लवकरात लवकर इन्कम टॅक्स फाईल कराल, असे काही फायदे आज आम्ही सांगत आहोत. इन्कम टॅक्स म्हणजे काहीतरी देणं आहे असं वाटल्यामुळे या प्रक्रियेकडे अनेकजण एक ‘मजबुरी’ म्हणून पाहतात. मात्र त्याचे फायदे समजले, तर इन्कम टॅक्सकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोनच बदलून जाईल. 

31 जुलैची मुदत

तुम्ही जर कुठल्याही माध्यमातून उत्पन्न कमावत असाल, तर तुम्ही आयकर भरण्यास पात्र आहात. नोकरी असो की व्यवसाय यापैकी काहीही करत असाल तरीही तुम्हाला इन्कम टॅक्स भरणं गरजेचं आहे. हा टॅक्स भरण्यासाठी केंद्र सरकारनं 31 जुलैची अंतिम मुदत जाहीर केली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षासाठीचा टॅक्स फाईल करू शकतात. जर मुदत उलटून गेल्यावर तुम्ही टॅक्स भरणार असाल, तर मात्र त्यासाठी सरकारकडून दंड आकारला जाऊ शकतो.

अधिक वाचा - Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या 'या' स्कीममध्ये गुंतवा 50 रुपये आणि मॅच्युरिटीला मिळवा 50 लाख

ITR भरणं फायद्याचं

टॅक्स वाचवण्यासाठी लोक कुठला ना कुठला बहाणा शोधून ते टाळण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र टॅक्स भरल्यामुळे अनेक फायदे होतात. वास्तविक, इन्कम टॅक्स फाईल न केल्याचं अनेकदा मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. सध्या घरबसल्या ऑनलाईन सुविधेचा उपयोग करून तुम्ही इन्कम टॅक्स भरू शकता. जाणून घेऊया टॅक्स भरण्याचे फायदे.

  1. कर्जासाठी होते मदत - तुम्हाला कर्ज हवं असेल, तर सर्वप्रथम बँका किंवा वित्तीय संस्था तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे, हे पाहतात. त्यानुसार तुमची कर्ज मिळण्याची क्षमता निश्चित करण्यात येते. अशा वेळी तुम्ही फाईल केलेला इन्कम टॅक्स तुमच्या मदतीला येऊ शकतो. कारण हाच तुमच्या उत्पन्नाचा पुरावा असतो. अनेक संस्था अशा आहेत, ज्या केवळ इन्कम टॅक्स रिटर्नमधील तपशीलांच्या आधारेच कर्ज देतात. 
  2. उद्योगवाढीसाठी फायदेशीर - जर तुमचा उद्योग असेल, तर इन्कम टॅक्स भरणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. ज्या कंपन्यांनी गेल्या तीन वर्षांपासून नियमित इन्कम टॅक्स भरला आहे, अशाच कंपन्यांकडून उत्पादनं खरेदी करण्याचे आणि इतर व्यवहार करण्याचे निर्णय मोठ्या कंपन्या घेत असतात. 
  3. मालमत्तेची खरेदी-विक्री - आयटीआरमुळे तुम्हाला एखादी मालमत्ता विकत घेणं किंवा विकणं सोपं जातं. बँकेत मोठी रक्कम जमा कऱणं किंवा म्युचुअल फंडात पैसा गुंतवणं यासारख्या बाबींसाठीही आयटीआरचा फायदा होतो. आयकर विभागाकडून नोटीस येण्याचा धोका यामुळे टळतो.
  4. विम्यासाठी उपयुक्त - जर तुम्हाला 1 कोटीपेक्षा मोठं विम्याचं संरक्षण हवं असेल, तर इन्कम टॅक्स रिटर्नची मोठी मदत त्यासाठी होऊ शकते. हेल्थ इन्शुरन्ससाठी अनेक कंपन्या तुमचा आयटीआर मागतात. त्या आधारे अंतिम निर्णय घेण्यात येतो.

अधिक वाचा - Bank Mergers : लवकरच 4-5 मोठ्या बँकांचे विलीनीकरण...सरकारी बॅंकांच्या विलीनीकरणाची योजना

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी