FMCG Price Hike | तुमच्या खिशासाठी महत्त्वाचे...तेल, साबण आणि टूथपेस्टसह महागणार दैनंदिन वापरातील वस्तू

FMCG Price : तेल, साबण, टुथपेस्टपासून एफएमसीजी श्रेणीतील सर्वच वस्तूंच्या (FMCG products) किंमतीमध्ये वाढ होण्याची चिन्हे आहेत. या दैनंदिन वापरातील वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या बहुतांश एफएमसीजी कंपन्यांनी डिसेंबरमध्येच आपल्या उत्पादनांच्या किंमतीत वाढ (FMCG products price hike)केली होती. एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्यांकडून किंमतीत वाढ केल्याचा थेट फटका सर्वसामान्य माणसाच्या खिशावर पडणार आहे.

FMCG Price Hike Soon
एफएमसीजी कंपन्यांकडून होणार वस्तूंच्या किंमतीत वाढ 
थोडं पण कामाचं
  • एफएमसीजी कंपन्यांकडून दैनंदिन वापरातील वस्तूंच्या किंमतीत होणार वाढ
  • कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे वस्तूंचे भाव वाढणार
  • तेल, साबण आणि टूथपेस्टसह रोजच्या वापरातील वस्तू महागल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका

FMCG Price Hike Soon : नवी दिल्ली : तुमच्या दैनंदिन वापरातील वस्तूंच्या किंमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. तेल, साबण, टुथपेस्टपासून एफएमसीजी श्रेणीतील सर्वच वस्तूंच्या (FMCG products) किंमतीमध्ये वाढ होण्याची चिन्हे आहेत. या दैनंदिन वापरातील वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या बहुतांश एफएमसीजी कंपन्यांनी डिसेंबरमध्येच आपल्या उत्पादनांच्या किंमतीत वाढ (FMCG products price hike)केली होती. एका अहवालानुसार बिस्किटांचे उत्पादन करणारी पार्ले जी ही कंपनी आपल्या उत्पादनांच्या किंमतीत १० ते १२ टक्के वाढ करणार आहे. याच प्रकारे साबण, शॅम्पू, तेल, पर्सनल केअर इत्यादी वस्तूंच्या किंमतीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. (Big news for common man, FMCG companies to hike prices of products soon)

विविध कंपन्यांकडून भाववाढ

पार्ले जी प्रमाणेच केविन केअर ही पर्सनल केअर उत्पादने बनवणारी कंपनीदेखील आपल्या उत्पादनांच्या किंमतीत ५ टक्क्यांपर्यत वाढ करू शकते. साबण आणि इतर पर्सनल केअर बनवणारी गोदरेज कन्झ्युमरदेखील आपल्या उत्पादनांच्या किंमतीत वाढ करणार असून कंपनीने डिसेंबरमध्येच सांगितले होते की जानेवारी ते मार्च या तिमाहीमध्ये कंपनी आपल्या उत्पादनांच्या किंमतीत ९ ते १० टक्के वाढ करणार आहे. एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्यांकडून किंमतीत वाढ केल्याचा थेट फटका सर्वसामान्य माणसाच्या खिशावर पडणार आहे. 

का वाढणार आहेत किंमत?

एफएमसीजी कंपन्या दैनंदिन वापरातील ज्या वस्तूंचे उत्पादन करतात त्यांचे उत्पादन करण्यासाठी लागणारा कच्चा माल सातत्याने महाग होतो आहे. खाद्यतेल, गहू, तांदूळ, साखर यासारख्या वस्तूंच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे बिस्किट आणि नमकीन उत्पादनाचा खर्च वाढला आहे. इतरही उत्पादनांच्या बाबतीतदेखील कच्चा माल महागल्यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे.

  1. याशिवाय कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे पेट्रोलियम उत्पादने आणि प्लास्टिकच्या किंमतीत वाढ झाली आहे. पॅकेजिंग मटेरियलच्या किंमतीतदेखील वाढ होते आहे. दैनंदिन वापरातील वस्तूंच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल महाग झाला आहे. या सर्व बाबींमुळे कंपन्यांच्या उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होते आहे आणि त्यामुळे एफएमसीजी कंपन्या आपल्या मालाच्या किंमतीत वाढ करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
  2. एफएमसीजी कंपन्यांकडून सर्वच वस्तूंच्या किंवा उत्पादनांच्या किंमतीत एकाच वेळी वाढ केली जाण्याची मात्र शक्यता नाही. कंपन्या सर्वच उत्पादनांच्या किंमतीत एकाचवेळी वाढ करत नाहीत. टप्प्याटप्प्याने सर्व उत्पादनांच्या किंमतीत वाढ कंपन्यांकडून केली जाणार आहे.
  3. कंपन्या आधी डिस्काउंट बंद करतात आणि त्यानंतर उत्पादनांच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला जातो. त्याचबरोबर असेही दिसून येते की जेव्हा हा उत्पादन खर्च कमी होतो तेव्हा कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किंमतीत कपात करत नाहीत मात्र त्याजागी डिस्काउंट देण्यास सुरूवात करतात. आगामी काळात एफएमसीजी कंपन्या काय करतात याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्य माणसाला यामुळे आणखी अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी