Bill Gates | बिल गेट्सना मिळाले वाढदिवसाचे गिफ्ट, अॅपलला मागे टाकत मायक्रोसॉफ्ट बनली जगातील सर्वात मोठी कंपनी

Bill Gates Birthday | मायक्रोसॉफ्टच्या शेअरच्या किंमतीत आलेल्या तेजीमुळे मायक्रोसॉफ्टचे बाजारमूल्य किंवा समभाग भांडवल वाढले आहे. त्यामुळे अॅपलला (Apple)मागे टाकत मायक्रोसॉफ्ट जगातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेली कंपनी बनली आहे.

Bill Gates & Microsoft
बिल गेट्स आणि मायक्रोसॉफ्ट 
थोडं पण कामाचं
  • जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणाऱ्या बिल गेट्स यांचा आज वाढदिवस
  • अॅपलला मागे टाकत मायक्रोसॉफ्ट बनली जगातील सर्वात मोठी कंपनी
  • मायक्रोसॉफ्टच्या शेअरच्या किंमतीत आलेल्या जबरदस्त तेजीमुळे कंपनीचे समभाग भांडवल वाढले

Bill Gates | न्यूयॉर्क : मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जाणारे बिल गेट्स (Microsoft co-founder Bill Gates) यांचा आज वाढदिवस आहे. बिल गेट्स (Bill Gates Birthday)आज ६६ वर्षांचे झाले. जगातील चौथ्या क्रमांकाच्या या श्रीमंत व्यक्तीला वाढदिवशीच एक झक्कास भेट मिळाली आहे. बिल गेट्सची कंपनी असलेली मायक्रोसॉफ्ट (Microsoft Market Cap)जगातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. मायक्रोसॉफ्टच्या शेअरच्या किंमतीत आलेल्या तेजीमुळे मायक्रोसॉफ्टचे बाजारमूल्य किंवा समभाग भांडवल वाढले आहे. त्यामुळे अॅपलला (Apple)मागे टाकत मायक्रोसॉफ्ट जगातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेली कंपनी बनली आहे. (Bill Gates Birthday: Microsoft overtakes Apple & becomes most valuable company, birthday gift to Bill Gates)

मायक्रोसॉफ्टच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी

यावर्षी मायक्रोसॉफ्टच्या शेअरच्या (Share price of Microsoft)  किंमतीमध्ये ४५ टक्के वाढ झाली आहे. क्लाउड कम्प्युटिंगच्या क्षेत्रात मायक्रोसॉफ्टची आघाडी आहे. कोरोना महामारीच्या काळात ऑनलाईन, डिजिटल कामकाजाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. त्याचा फायदा मायक्रोसॉफ्टला झाला आहे. तर यावर्षी अॅपलच्या शेअरच्या किंमतीमध्ये १२ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे जरी अॅपलचे बाजारमूल्य वाढले असले तरी मायक्रोसॉफ्टच्या शेअरमधील जबरदस्त तेजीमुळे अॅपल मागे पडली आहे. मायक्रोसॉफ्टचे एकूण समभाग भांडवल आता २.४२६ ट्रिलियन डॉलरवर पोचले आहे. तर मायक्रोसॉफ्टच्या शेअरची किंमत ३२३.१७ डॉलर प्रति शेअर इतकी झाली आहे.

बिल गेट्सचा वाढदिवस

बिट गेट्स आज ६६ वर्षांचे झाले आहेत. २८ ऑक्टोबर १९५५ त्यांचा जन्म वॉशिंग्टनमध्ये झाला होता. १९७५मध्ये बिल गेट्स यांनी पॉल अॅलनबरोबर संयुक्तरित्या एक सॉफ्टवेअर कंपनी स्थापन केली होती. ही कंपनी म्हणजेच मायक्रोसॉफ्ट. कधीकाळी अतिशय छोट्या स्वरुपात स्थापन झालेली ही कंपनी आज जगातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. मायक्रोसॉफ्टच्या यशामुळे तरुणवयातच बिल गेट्स हे अब्जाधीशांच्या यादीत समाविष्ट झाले होते. वयाच्या ३२ वर्षीच त्यांचे नाव फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत आले आणि त्यानंतर सतत ते जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत स्थान पटकावून आहेत. इतर अब्जाधीशांचा उदय होण्याआधी कित्येक वर्षे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती हे बिरुद बिल गेट्स यांच्याकडेच होते. 

बिल गेट्सची संपत्ती आणि गेट्स फाउंडेशन

सध्या बिल गेट्स जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती १३५ अब्ज डॉलर (Bill Gates net worth) इतकी आहे. २०२१ मध्ये बिल गेट्सच्या संपत्तीत ३ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. बिल गेट्स यांनी सामाजिक कार्यसाठी बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनची स्थापना केली आहे. आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा बिल गेट्स यांनी गेट्स फाउंडेशनला दिला आहे. बिल गेट्स आणि त्यांची घटस्फोटित पत्नी मेलिंडा गेट्स हे दोघे एकत्रितपणे बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे कामकाज पाहतात. २००० मध्ये या फाउंडेशनची स्थापना झाली होती.

मायक्रोसॉफ्टच्या नफ्यात वाढ

सॉफ्टवेअर आणि क्लाउड कम्प्युटिंगच्या क्षेत्रात मक्तेदारी असलेल्या मायक्रोसॉफ्टच्या महसूलात आणि नफ्यात वाढ झाली आहे. विशेषत: क्लाउड कम्प्युटिंग तंत्रज्ञानातील मक्तेदारीमुळे जुलै ते सप्टेंबर या कालावधीत मायक्रोसॉफ्टच्या नफ्यात २४ टक्क्यांची दणदणीत वाढ झाली आहे. कंपनीने १७.२ अब्ज डॉलरचा नफा कमावला आहे. कोरोना महामारीमुळे जगभर बदललेल्या कार्यसंस्कृतीचा फायदा मायक्रोसॉफ्टला झाला आहे. क्लाउड कम्प्युटिंगच्या तंत्रज्ञानाने मायक्रोसॉफ्टला पुन्हा एकदा स्पर्धेत पुढे नेले आहे. २०१० मध्ये अॅपलने मायक्रोसॉफ्टला मागे टाकले होते आणि जगातील सर्वात मोठी कंपनी बनली होती. आयफोनसारख्या जगविख्यात उत्पादनामुळे अॅपलने जबरदस्त मुसंडी मारली होती.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी