Gold Vs Bitcoin: बिटकॉइनचे एकूण मूल्य जगात ८व्या क्रमांकावर, लवकरच चांदीला मागे टाकणार

बिटकॉइनचे एकूण बाजारमूल्य किंवा एकूण मूल्य १.११९ लाख कोटी डॉलरवर पोचले आहे. बाजारमूल्याच्यादृष्टीने विचार करता बिटकॉइनने सोशल मीडियामधील दिग्गज कंपनी असलेल्या फेसबुकलादेखील मागे टाकले आहे.

Bitcoin's value
बिटकॉइनचे जगातील एकूण मूल्य 
थोडं पण कामाचं
  • बिटकॉइनमध्ये पुन्हा जबरदस्त तेजी
  • बिटकॉइनमधील तेजी कायम राहिल्यास लवकरच चांदीला मागेपडणार
  • बिटकॉइनची किंमत ६०,००० डॉलरच्या

नवी दिल्ली: बिटकॉइन या क्रिप्टोकरन्सीमध्ये (Cryptocurrency) जबरदस्त तेजी दिसून येते आहे. सध्याची तेजी पाहता बिटकॉइनचा (Bitcoin) प्रवास आतापर्यतच्या उच्चांकीच्या दिशेने होते आहे. शनिवारी बिटकॉइन ६२,००० डॉलरच्या किंमतीच्या जवळ पोचली होती. एप्रिलमध्ये बिटकॉइनची किंमत ६५,००० डॉलरच्या जवळपास पोचली होती. ती बिटकॉइनची आतापर्यतची उच्चांकी किंमत आहे. याआधी शुक्रवारी बिटकॉइन ६०,००० डॉलरच्या किंमतीवर पोचत, बिटकॉइन जगातील आठवी सर्वात मूल्यवान मालमत्ता (most valuable asset)बनली आहे. (Gold Vs Bitcoin: Bitcoin becomes 8th most valuable asset in the world)

फेसबुकला बिटकॉइनने टाकले मागे

companiesmarketcap.com या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार बिटकॉइनचे एकूण बाजारमूल्य किंवा एकूण मूल्य १.११९ लाख कोटी डॉलरवर पोचले आहे. बाजारमूल्याच्यादृष्टीने विचार करता बिटकॉइनने सोशल मीडियामधील दिग्गज कंपनी असलेल्या फेसबुकलादेखील मागे टाकले आहे. फेसबुकचे एकूण बाजारमूल्य ९२६.२७ अब्ज डॉलर इतके आहे. याआधी याचवर्षी जानेवारी महिन्यातदेखील बिटकॉइनने एकूण बाजारमूल्यात फेसबुकला मागे टाकले होते.

चांदीला मागे टाकण्याच्या तयारीत बिटकॉइन

बिटकॉइनच्या किंमतीत जर १७.३ टक्क्यांची तेजी आली तर बिटकॉइनचे एकूण मूल्य हे चांदीपेक्षाही जास्त होणार आहे. जगभरात असलेल्या चांदीच्या एकूण किंमतीपेक्षा बिटकॉइनची किंमत आगामी काळात जास्त होण्याची शक्यता आहे. सध्या जगातील एकूण चांदीची किंमत १.३१३ लाख कोटी डॉलर इतकी आहे. चांदीव्यतिरिक्त सोने आणि जगातील आघाडीच्या कंपन्या यांनादेखील बिटकॉइन मागे टाकण्याची शक्यता आहे. अॅपल, मायक्रोसॉफ्ट, सौदी अरेबिया, अल्फाबेट, अॅमेझॉन यांचे एकूण समभाग भांडवल बिटकॉइनपेक्षा सध्या जास्त आहे. मात्र लवकरच बिटकॉइनचे जगभरातील एकूण मूल्य या कंपन्यांपेक्षाही जास्त होण्याची चिन्हे आहे. अर्थात सोन्याला बिटकॉइनकडून मागे टाकण्यासाठी अद्याप अवकाश आहे. बिटकॉइनचे आणि सोन्याचे सध्याचे जे मूल्य आहे ते लक्षात घेऊन जर बिटकॉइनच्या किंमतीत ९०५ टक्क्यांची तेजी आली तर जगभरातील सोन्याच्या एकूण किंमतीपेक्षा बिटकॉइनची किंमत जास्त झालेली असेल. सध्या जगभरातील सोन्याची एकूण किंमत ११.२५५ लाख कोटी डॉलर इतकी प्रचंड आहे आणि अजूनही सोने हीच जगातील सर्वात मूल्यवान वस्तू आहे.

इलॉन मस्कला संपत्तीत मागे टाकणार सतोशी

जगातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी असलेल्या अमेरिकेच्या अॅपलला मागे टाकण्यासाठी बिटकॉइनच्या सध्याच्या किंमतीत ११२ टक्के वाढ व्हावी लागेल. सध्या अॅपलचे एकूण समभाग भांडवल २.३७६ लाख कोटी डॉलर इतके आहे. जर बिटकॉइनने अॅपललादेखील मागे टाकले तर बिटकॉइनचे संस्थापक सतोशी नाकामोतो हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनतील. अर्थाक सतोशी नाकामोतो हे एक अज्ञात नाव आहे. प्रत्यक्षात या नावाची व्यक्ती आढळून आलेली नाही. मात्र बिटकॉइनची स्थापना किंवा निर्मिती सतोशी नाकामोतो यांनी केल्याचे सांगितले जाते. सध्या टेस्लाचे सीईओ असलेल्या इलॉन मस्क यांची एकूण संपत्ती २३६ अब्ज डॉलर इतकी जबरदस्त असून ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी