Buy Now Pay Later | भारतात पुढील चार वर्षात १० पटीने वाढणार 'बाय नाऊ पे लेटर' प्रकार, पाहा तुमच्या फायद्याचे काय?

Buy Now Pay Later: कोट्यवधी ग्राहक या सोप्या आणि व्याजमुक्त फ्री क्रेडिट (Free Credit) प्रकाराकडे आकर्षित होत आहेत. एका अंदाजानुसार भारतात 'बाय नाऊ पे लेटर' चा बाजार २०२६ पर्यत वाढून ४५-५० अब्ज डॉलरवर पोचेल.

Buy Now Pay Later
बाय नाऊ पे लेटर चा पर्याय 
थोडं पण कामाचं
  • बाय नाऊ पे लेटर हा एक पेमेंट करण्याचा प्रकार
  • यात ग्राहकाला वस्तू खरेदी करताना पैसे देण्याची आवश्यकता नाही, मात्र निश्चित मुदतीत पैसे परत करावेत लागतात
  • 'बाय नाऊ पे लेटर'चा वापर करणाऱ्या ग्राहकांची संख्या पुढील चार ते पाच वर्षात ८ कोटी ते १० कोटींवर पोचण्याची शक्यता

Buy Now Pay Later (BNPL) | नवी दिल्ली : भारतात सध्या 'बाय नाऊ पे लेटर' (Buy Now Pay Later) हा प्रकार कोणतीही खरेदी करताना अत्यंत लोकप्रिय होताना दिसतो आहे. मागील काही दिवसात यामध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. पुढील फक्त चार वर्षांच्या कालावधीत यामध्ये दहा पटीने वाढ होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत. कोट्यवधी ग्राहक या सोप्या आणि व्याजमुक्त फ्री क्रेडिट (Free Credit) प्रकाराकडे आकर्षित होत आहेत. एका अंदाजानुसार भारतात 'बाय नाऊ पे लेटर' चा बाजार २०२६ पर्यत वाढून ४५-५० अब्ज डॉलरवर पोचेल. सध्या हा बाजार ३-३.५ अब्ज डॉलरचा आहे. एका अहवालानुसार 'बाय नाऊ पे लेटर'चा वापर करणाऱ्या ग्राहकांची संख्या पुढील चार ते पाच वर्षात ८ कोटी ते १० कोटींवर पोचण्याची शक्यता आहे. सध्या १ ते १.५ कोटी ग्राहक (Customer)याचा वापर करतात. (Buy Now Pay Later: India can register 10 times growth in next 4 years in Buy Now Pay Later industry)

सध्या 'बाय नाऊ पे लेटर' या पर्यायात मिळणारे कमाल क्रेडिट एक लाख रुपये आहे. क्रेडिट कार्डवर मिळणाऱ्या ऑफर्सपेक्षा हे फारच कमी आहे. एका संशोधनानुसार जाणकारांचे म्हणणे आहे की क्रेडिट कार्डच्या व्यवसायावर 'बाय नाऊ पे लेटर' चा परिणाम होण्यासाठी काही काळ लागणार आहे.

'बाय नाऊ पे लेटर' चा व्यवसाय दोन वर्षात दुप्पट

MobiKwik या फिनटेक कंपनीचा 'बाय नाऊ पे लेटर' व्यवसाय दोनच वर्षात दुप्पट झाला आहे. मोबिक्विक ही भारतात 'बाय नाऊ पे लेटर' चा वापर करणाऱ्या टॉप कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीने म्हटले आहे की या श्रेणीद्वारे त्यांना ३१ मार्च अखेर सरलेल्या आर्थिक वर्षात एकूण ३.०२ अब्ज रुपयांचा महसूलातील २० टक्के हिस्सा मिळाला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की सध्या फक्त ६ ते ७ रोची भारतीयांकडे क्रेडिटचा पर्याय आहे. याचा अर्थ ९३ टक्के भारतीयांपर्यत अद्याप क्रेडिटचा पर्याय पोचलेला नाही. आगामी काळात 'बाय नाऊ पे लेटर' हा पर्याय सर्वाधिक महसूल कमावणारा पर्याय बनणार आहे. मागील दोनच वर्षात 'बाय नाऊ पे लेटर' द्वारे झालेल्या व्यवहारांमध्ये ४५ टक्के वाढ झाली आहे. मोठ्या संख्येने नवे ग्राहक हा पर्याय वापरत आहेत. शिवाय या पर्यायाद्वारे होणाऱ्या व्यवहारांची रक्कमदेखील वाढते आहे.

कोरोनात वाढली ऑनलाइन शॉपिंग

कोरोना महामारीच्या काळात ऑनलाइन खरेदीकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यामुळे सहज कर्ज किंवा क्रेडिट मिळवण्याच्या दृष्टीने अनेक ग्राहक 'बाय नाऊ पे लेटर' या पर्यायाकडे वळले आहेत. अॅमेझॉनने २०२० मध्ये 'बाय नाऊ पे लेटर' पर्याय सुरू केला होता. तर देशांतर्गत बाजारात भारत पे द्वारे ही सेवा मागील महिन्यातच सुरू करण्यात आली आहे. अॅमेझॉनच्या म्हणण्यानुसार तरुण ग्राहक आणि मिलेनियल्स मोठ्या संख्येने कोरोन महामारीच्या काळात क्रेडिट आणि खरेदी क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळेच 'बाय नाऊ पे लेटर' चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

'बाय नाऊ पे लेटर' पेमेंट आहे तरी काय?

हा एक पेमेंट पर्याय आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या खिशातून एकही रुपया न देता खरेदी करू शकता. सर्वसाधारणपणे ही सुविधा देणाऱ्या कंपनीबरोबर तुम्हाला साइन अप करावे लागते. म्हणजे जर ग्राहकासाठी जर त्या कंपनीने आधी बिलाचे पेमेंट केले तर एका निश्चित वेळेत ग्राहकाला आपल्या रकमेची परतफेड करावी लागते. ही रक्कम ग्राहक एकरकमी परत करू शकतात किंवा नो कॉस्ट ईएमआयद्वारेदेखील याची परतफेड करता येते. मात्र जर दिलेल्या मुदतीत ग्राहकाने रकमेची परतफेड केली नाही तर कंपनी ग्राहकाकडून व्याज आकारणी करते. अर्थात वेळेवर पैशांची परतफेड न केल्यास ग्राहकाच्या क्रेडिट स्कोअरवरदेखील विपरित परिणाम होतो.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी