Cardless ATM cash withdrawal, RBI makes big announcement for bank customers : नवी दिल्ली : भारतात इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही, पुरेशी साक्षरता नाही, अनेकांकडे मोबाईल नाही, या देशात डिजिटल व्यवहारांना भविष्य नाही असे भारताचे माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम म्हणाले होते. चिदंबरम यांचे हे वाक्य भारताच्या नागरिकांनी खोटे ठरवले. मोदी सरकारच्या काळात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी सुरू झालेल्या प्रयत्नांना देशातील नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
भारतात मार्च महिन्यात यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात यूपीआय पद्धतीने ५४०५.६५ दशलक्ष व्यवहार झाले. ही आकडेवारी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआयने प्रसिद्ध केली आहे. या व्यवहारांमधून ९६०५८१.६६ कोटी रुपये हस्तांतरित झाले. एका महिन्यात ५ अब्जपेक्षा जास्त व्यवहार यूपीआय पद्धतीने करून भारताने विक्रम केला. आता भारत आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे.
आजही जे व्यवहारांसाठी रोख रकमेचा वापर करतात त्यापैकी अनेकजण ही रोख रक्कम थेट बँकेच्या शाखेतून नाही तर एटीएममधून काढतात. यासाठी कार्डचा वापर करतात. पण कार्डाचे क्लोनिंग करून त्यातील माहितीचा गैरवापर होण्याचा धोका असतो. हा धोका टाळण्यासाठी भारतात कार्ड न वापरता एटीएममधून पैसे काढण्याची सोय उपलब्ध केली जाणार आहे. रिझर्व्ह बँकेने या संदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी 'कार्डलेस कॅश विड्रॉवल' योजनेची घोषणा केली.
सध्या भारतात मर्यादीत प्रमाणात 'कार्डलेस कॅश विड्रॉवल' अस्तित्वात आहे. पण रिझर्व्ह बँक यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात यूपीआय पद्धतीचा वापर करून संपूर्ण देशात 'कार्डलेस कॅश विड्रॉवल' ही सोय उपलब्ध करून देणार आहे.