5G bid payment : नवी दिल्ली : भारत सरकारला दहा दिवसांत १३ हजार ५०० कोटी रुपयांची कमाई होणार आहे. देशात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरू आहे. या लिलावातून केंद्र सरकारला मोठे उत्पन्न मिळणार आहे. भारतात सुरू असलेल्या 5G स्पेक्ट्रमच्या लिलावात रिलायन्स जिओ (Reliance Jio), भारती एअरटेल (Bharti Airtel), व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea), अदानी डेटा नेटवर्क्स (Adani Data Networks) या कंपन्या सहभागी झाल्या आहेत. या कंपन्या आतापर्यंत खरेदी केलेल्या स्पेक्ट्रमचे पहिल्या टप्प्याचे पेमेंट म्हणून केंद्राला लवकरच १३ हजार ५०० कोटी रुपये देणार आहेत.
मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ (Reliance Jio) केंद्राला ७८३८ कोटी रुपये देणार आहे. सुनिल मित्तल यांची भारती एअरटेल (Bharti Airtel) केंद्राला ३८३४ कोटी रुपये देणार आहे. व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea) केंद्राला १६७३ कोटी रुपये देणार आहे. अदानी डेटा नेटवर्क्स (Adani Data Networks) केंद्राला २१२ कोटी रुपये देणार आहे.
भारतातील सुमारे ५० टक्के 5G स्पेक्ट्रम मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ (Reliance Jio) कंपनीने केंद्राकडून ८८ हजार ०७८ कोटी रुपयांना खरेदी केले. भारती एअरटेल (Bharti Airtel) कंपनीने ४३ हजार ०८४ कोटी रुपये मोजून १९ हजार ८६७ मेगाहर्ट्ज खरेदी केले. व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea) कंपनीने १८ हजार ७९९ कोटी रुपयांत स्पेक्ट्रम खरेदी केले.
टेलिकॉम कंपन्या जास्तीत जास्त २० वार्षिक हप्त्यांमध्ये स्पेक्ट्रमसाठीचे पेमेंट केंद्राला करणार आहेत. अथवा वीस पेक्षा कमी वर्षात मोठ्या रकमांच्या स्वरुपात त्यांचे पेमेंट पूर्ण करणार आहेत.