सिबिल स्कोअर कमी असला तरी कर्ज मिळू शकते? जाणून घ्या सविस्तर...

Cibil Score: कर्ज मिळवण्यासाठी सिबिल स्कोअर किंवा क्रेडिट स्कोअर ही एक महत्वाची गोष्ट असते. तुमच्या सिबिल स्कोअरवर कर्ज मिळणार की नाही किंवा किती टक्क्यांनी मिळणार हे सर्व निश्चित होतं. 

Indian Rupees
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Representative Image

मुंबई : कर्ज (Loan) मिळविण्यासाठी तुम्ही ज्यावेळी बँकेकडे अर्ज करता त्यावेळी तुमचा सिबिल स्कोअर (Cibil score) हा तपासण्यात येतो आणि त्याच्या आधारावर तुम्हाला कर्ज मंजूर करण्यात येत असते. यासोबतच तुमचे उत्पन्न हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. ७५० किंवा त्याहून अधिक सिबिल स्कोअर हा चांगला मानण्यात येतो. असा क्रेडिट स्कोअर (Credit Score) असल्यास नागरिकांना सहज कर्ज उपलब्ध होते. मात्र, अनेकांना आपला क्रेडिट स्कोअर चांगला ठेवणं अवघड जाते. चांगला क्रेडिट स्कोअर ठेवण्यासाठी पैशांचे नियोजन, कौशल्य आवश्यक असते आणि याच्या मदतीने तुम्ही आपल्या कर्जाची परतफेड करु शकता. त्याचा फायदा म्हणजे तुमचा सिबिल स्कोअर हा खूपच चांगला होतो.

अनेकांना प्रश्न पडतो की आपला सिबिल स्कोअर हा कमी आहे मग अशा परिस्थितीत आपल्याला कर्ज मिळेल का? खराब किंवा कमी क्रेडिट स्कोअर असल्यासही कर्ज मिळू शकते. पण असे असले तरी क्रेडिट स्कोअर चांगला ठेवणे यातच शहाणपण आहे. कमी क्रेडिट स्कोअर असल्यास तुम्हाला अधिक व्याजाने कर्ज घ्यावे लागते तसेच कर्जाची रक्कमही जास्त मिळू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्याच्या सहाय्याने कमी क्रेडिट स्कोअर असतानाही कर्ज मिळू शकते.

कर्जासाठी अर्ज करताना आपले क्षेत्र वाढवा

वेगवेगळ्या बँका आणि वित्तीय संस्थांमध्ये कर्ज मंजूर करण्याची पद्धत, नियम हे वेगवेगळे असतात. काही संस्था कर्ज मंजूर करताना मोठा कट ऑफ ठेवतात तर काही संस्था अशा असतात ज्या कमी क्रेडिट स्कोअर असतानाही कर्ज मंजूर करतात. तज्ञांच्या मते, ज्यांचा क्रेडिट स्कोअर कमी आहे अशा व्यक्तींनी कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करताना अनेक ठिकाणी अर्ज करावा. अशा पतसंस्था, बँका शोधाव्यात जेथे कमी क्रेडिट स्कोअर असला तरी कर्ज मंजूर केले जाते. 

आपल्या बँकेसोबत संपर्क साधा

जर तुमचा क्रेडिट स्कोअर हा काही समस्येमुळे खराब झाला असेल तर त्याच्या संदर्भात तुम्ही बँकेसोबत थेट बोलू शकता. तुम्ही बँकेचे जुने ग्राहक असल्याने बँकेला तुम्ही व्यवस्थित सांगू शकतात. त्यामुळे कमी क्रेडिट स्कोअर असूनही आपल्याला चांगल्या अटींवर कर्ज मिळण्यास मदत मिळेल.

सुरक्षित कर्जाचा पर्याय निवडा 

कमी क्रेडिट स्कोअरमुळे अनेकांना कर्ज नाकारले जाते किंवा त्यांना खूप जास्त दराने कर्ज मंजूर केले जाते. असे नागरिक सुरक्षित कर्जाचा पर्याय निवडू शकतात. असे कर्ज देताना बँकांसमोर पत जोखीम कमी असते. कारण, कर्जदाराने त्याच्या कर्जाच्या मागणीसमोर गॅरंटी म्हणून एखाद्या गोष्टीची हमी दिली जाते. एखादी व्यक्ती सोने, मालमत्ता, सिक्युरिटीजवर कर्ज घेऊ शकते. पण हा पर्याय आपात्कालीन परिस्थितीतच निवडावा.

संयुक्त कर्ज किंवा गॅरेंटरसह कर्जासाठी अर्ज 

कमी क्रेडिट स्कोअर असूनही कर्ज मिळवण्यासाठी संयुक्त कर्ज घेणे हा एक पर्याय आहे. यामध्ये एखाद्या व्यक्तीसह जोडीदार किंवा कुटुंबातील सदस्य एकत्रितपणे कर्ज लागू केले जाऊ शकते. मात्र, दुसऱ्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर चांगला असणे आवश्यक आहे. कारण दुसरा सदस्य हा सह-अर्जदार म्हणून काम करतो.

NBFC किंवा पी२पी माध्यमातून कर्ज 

कमी क्रेडिट स्कोअर असल्यास बँकांऐवजी नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपन्यांसोबत (एनबीएफसी) संपर्क साधू शकता. याशिवाय पी २ पी कर्ज देण्याच्या व्यासपीठावर कर्ज घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, या संस्था बँकांपेक्षा अधिक व्याजाने कर्ज देतात.

कर्जाची रक्कम कमी 

जर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असेल तर आपण थोड्या पैशासाठी वैयक्तिक कर्ज घेऊ शकता. तसेच याचा परतावा वेळेवर करुन तुम्ही आपला क्रेडिट स्कोअर चांगला बनवू शकता. या प्रक्रियेत हळूहळू आपला क्रेडिट स्कोअर सुधारित करु शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी