Citibank | जबरदस्त! अमेरिकेच्या १०० वर्षे जुन्या बॅंकेला विकत घेणार Axis, IndusInd आणि Kotak Mahindra बॅंक

Citibank | अमेरिकेच्या सिटी बॅंकेसाठी भारतातील अॅक्सिस बॅंक, कोटक महिंद्रा बॅंक आणि इंडसइंड बॅंक या तीन खासगी क्षेत्रातील आघाडीच्या बॅंकांनी बोली प्रस्ताव सादर केला आहे. सिटी बॅंकेच्या भारतातील व्यवसायाला विकत घेण्यासाठी हा प्रस्ताव देण्यात आला आहे.

Indian Banks to take over Citibank
अमेरिकेच्या १०० वर्षे जुन्या बॅंकेला विकत घेणार भारतीय बॅंका 
थोडं पण कामाचं
  • सिटीबॅंक विकणार भारतातील व्यवसाय
  • अॅक्सिस बॅंक, कोटक महिंद्रा बॅंक आणि इंडसइंड बॅंक या तीन खासगी क्षेत्रातील आघाडीच्या बॅंकांचा बोली प्रस्ताव सादर
  • पुढील दोन ते तीन महिन्यात व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता

Citibank | नवी दिल्ली: भारतीय बॅंकिंग क्षेत्राने मागील दोन दशकात मोठी झेप घेतली आहे. विशेषत: खासगी क्षेत्रातील बॅंकांनी मोठी झेप घेतली आहे. अमेरिकेच्या सिटी बॅंकेसाठी भारतातील अॅक्सिस बॅंक, कोटक महिंद्रा बॅंक आणि इंडसइंड बॅंक या तीन खासगी क्षेत्रातील आघाडीच्या बॅंकांनी बोली प्रस्ताव सादर केला आहे. सिटी बॅंकेच्या भारतातील व्यवसायाला विकत घेण्यासाठी हा प्रस्ताव देण्यात आला आहे. प्रसार माध्यमातून समोर आलेल्या वृत्तानुसार सिटी बॅंक १३ देशांमधून कन्झ्युमर बॅंकिंग क्षेत्रातून बाहेर पडू इच्छिते. सध्या जेन फ्रेझर हे सिटी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. सिटी बॅंक ज्या देशांमधून आपला व्यवसाय गुंडाळू इच्छिते यामध्ये भारताचा देखील समावेश आहे. (Axis, IndusInd & Kotak Mahindra Bank to take over 100 years old American Bank in India)

पुढील २-३ महिन्यात होणार फैसला

समोर आलेल्या माहितीनुसार शुक्रवारी भारतीय बॅंकांनी सिटी बॅंकेकडे आपला प्रस्ताव सादर केला होता. या व्यवहारात सिटी बॅंक पुढील दोन ते तीन महिन्यात द्विपक्षीय बोलणी सुरू करण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर कोणत्या बॅंकेने बोली जिंकली हेदेखील जाहीर होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे सिटी बॅंकेला प्रस्ताव सादर करणाऱ्या कोणत्याही बॅंकेने या व्यवहारासाठी शेअरची ऑफर दिलेली नाही तर सरळ रोख रकमेचीच ऑफर सिटी बॅंकेला देण्यात आली आहे. यात दोन बॅंकांनी सर्वाधिक बोली लावली असून त्या स्पर्धेत पुढे असल्याचे सांगण्यात येते आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार सिंगापूरच्या डीबीएस बॅंक, आयसीआयसीआय बॅंक आणि एचडीएफसी बॅंकेनेदेखील या व्यवहाराचे मूल्यांकन केले आहे, मात्र अद्याप या बॅंकांनी बोली लावलेली नाही.

अनेक बॅंका सिटी बॅंकेला विकत घेण्यास इच्छूक

सिटी बॅंकेच्या भारतातील व्यवसायात क्रेडिट कार्ड्स, रिटेल बॅंकिंग, होम लोन आणि संपत्ती व्यवस्थापन या श्रेणींचा समावेश आहे. सिटी बॅंकेच्या भारतात ३५ शाखा आहेत तर कन्झ्युमर बॅंकिंग व्यवसायात ४,००० कर्मचारी आहेत. बॅंकेच्या कॉर्पोरेट बॅंकिग खात्यांचा एकूण व्यवसायात ८० टक्के वाटा आहे. या सर्व व्यवहारावर आणि प्रस्तावार सिटी बॅंकेने अद्याप अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया किंवा माहिती दिलेली नाही. सिटी बॅंकेचे आपले ग्राहक, कर्मचारी आणि शेअरधारक यांच्या हितसंबंध आणि संबंधित बाबींवर लक्ष आहे. सध्या संभावित खरेदीदारांशी बॅंकेचे सर्वच बाजारात बोलणी सुरू आहेत. अनेक बॅंकांनी सिटी बॅंकेचा व्यवसाय विकत घेण्यात रस दाखवला आहे. अॅक्सिस बॅंक, कोटक महिंद्रा बॅंक आणि इंडसइंड बॅंक या तीन बॅंकांनीदेखील या प्रस्तावासंदर्भात अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

१९०२ मध्ये भारतात सुरूवात

जाणकारांच्या मते सिटी बॅंकेचा व्यवसाय विकत घेऊ इच्छिणारे संभावित खरेदीदार किंवा बॅंका आपल्या क्रेडिट कार्ड आणि मोर्टरेज व्यवसायाला या अधिग्रहणाद्वारे अधिक भक्कम करू इच्छितात. सिटी बॅंकेने १९०२ मध्ये भारतात आपल्या व्यवसायाची सुरूवात केली होती. त्यानंतर १९८५ मध्ये बॅंकेने कन्झ्युमर बॅंकिंग व्यवसायाची सुरूवात केली होती. मागील दशकात सिटी बॅंकेच्या कार्ड व्यवसायात २ टक्के वार्षिक वृद्धीदर नोंदवला होता आणि या व्यवसायात बॅंक सहाव्या क्रमांकावर घसरली होती. मात्र सरासरी कार्डचा खर्च आणि एकूण या क्षेत्रातील व्यवसाय लक्षात घेता बॅंक आपले स्थान टिकवून आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापर्यत सिटी बॅंकेकडे २९ लाख रिटेल ग्राहकआणि १२ लाख बॅंक खाती होती.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी