House construction at low cost : नवी दिल्ली : आपले स्वप्नातील स्वत:चे घर (Dream Home)असावे असे प्रत्येकालाच वाटते. मात्र दिवसेंदिवस घर बांधण्याचा किंवा विकत घेण्याचा खर्च (House construction cost)सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर चालला आहे. त्यातच बांधकाम साहित्य महाग होत चालल्यामुळे यात दिवसेंदिवस वाढच होते आहे. शहरांमध्ये तर घर बांधणे शक्यच होत नाही. त्यामुळे सर्वचजण हाउसिंग सोसायटीमध्ये किंवा अपार्टमेंटमध्ये फ्लॅट (Flat) विकत घेतात. मात्र आजही बहुतेकांना प्लॉट विकत घेऊन त्यावर घर बांधायला आवडते. कारण ते मनासारखे आणि प्रशस्त असते. पण मग बांधकामाचा खर्च आवाक्यात कसा ठेवायचा किंवा आपल्या बजेटमध्ये सुंदर घर कसे बांधायचे हा प्रश्न उतरतोच. तुमच्या स्वप्नातील सुंदर घर स्वस्तात कसे बांधायचे त्यासंदर्भातील पर्याय जाणून घेऊया. (Construct house at cheaper price by using these tips, check details)
अलीकडच्या काही दिवसात बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्यातील लोखंडी रॉड किंवा सळई (Iron Rod), सिमेंट (Cement), वाळू (Sand)आणि विटा (Bricks)यासारख्या वस्तूंच्या किंमतीत घट झालेली आढळून आली होती. अर्थात या वस्तूंचे भाव हे स्थिर नसतात आणि त्यात केव्हाही वाढ होऊ शकते. मात्र तुमच्या घराच्या बांधकामाचा खर्च या वस्तूंच्या किंमतीवर बराचसा अवलंबून असतो. त्यामुळे जर या वस्तूंच्या किंमती कमी झाल्या असतील तर तुमच्यासाठी घराचे बांधकाम करण्याची योग्य संधी आहे. अर्थात पावसाळ्यात बांधकाम करणे योग्य समजले जात नाही. मात्र जर तुमच्या खर्चात मोठी बचत होणार असेल तर तुम्ही या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन बांधकाम करू शकता. याचबरोबर काही छोट्या बाबींवरदेखील तुमचे लक्ष दिल्यास तुमचा खर्च बराच कमी होऊ शकतो. तेही बांधकामाच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड न करता तुम्ही खर्चात मोठी बचत करू शकता.
अधिक वाचा : EPFO update : ईपीएफओने मे मध्ये जोडले 16.8 लाख नवे सदस्य, नोंदवली 83 टक्क्यांची वाढ
स्वस्तात घर बांधण्यासाठीच्या काही टिप्स कमालीच्या उपयुक्त ठरतात. समजा तुम्हाला बहुमजली इमारत बांधायची नाही. एखादे बैठे घरच बांधायचे आहे तर एक छोटासा बदल तुमचे लाखो रुपये वाचवू शकतो. सर्वसाधारणपणे घर बांधण्यासाठी लोक फ्रेम स्ट्रक्चरचा (Frame Structure) वापर करतात. त्याऐवजी जर लोड बेअरिंग (Load Bearing Structure) पद्धतीचा वापर केला गेला तर तुमच्या खर्चात प्रचंड कपात होत मोठी बचत होते. कारण फ्रेम स्क्ट्रॅक्चरच्या तुलनेत लोड बेअरिंगमध्ये लोखंडी सळईचा वापर कमी होतो. याचबरोबर नेहमीच्या विटांऐवजी फ्लाय अॅशच्या विटां (Fly Ash Bricks)चा वापर केल्यास, लाकडाऐवजी क्रॉंकीटच्या चौकटी बनवणे, सागाच्या लाकडाऐवजी स्वस्त पण टिकाऊ लाकडाचा वापर करणे यासारख्या गोष्टींमुळे तुमची लाखो रुपयांची बचत होऊ शकते.
आता पाहूया की पारंपारिक पद्धतीने घर बांधल्यास किती खर्च येईल. त्याचबरोबर टिप्सचा वापर केल्यास बचतदेखील होईल. उदाहरणार्थ समजा 500 चौरस फूटाचा प्लॉट आहे. तर बैठे घर बांधायचा सरासरी खर्च 1,500 रुपये प्रति चौरस फूट इतका येतो. हे लक्षात घेता 500 चौरस फूट प्लॉटवर एकमजली घर बांधण्याचा खर्च जवळपास 7.50 लाख रुपये इतका येईल.
अधिक वाचा : Govt Jobs News : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, १० लाख पदांवर होणार भरती
घर बांधताना काही बदल केल्यास, काही टिप्स वापरल्यास मोठी बचत होऊ शकते. कसे ते पाहूया. लोड बेअरिंगने घर बांधल्यास कॉलम आणि बीमची गरज पडत नाही. त्यामुळे लोखंडी सळईचा वापर फक्त छत आणि सज्जा बनवण्यासाठी होतो. त्याचबरोबर वाळू आणि सीमेंटचा वापरदेखील कमी होतो. शिवाय नेहमीच्या विटांऐवजी फ्लाय अॅशच्या विटा वापरल्यास मोठी बचत होते. या बदलांमुळे प्रति युनिटी 4-5 रुपयांची बचत होते. याचा अर्थ विटांचा खर्च जवळपास निम्माच होतो. फ्लाय अॅशचा विटा वापरण्याचा आणखी एक फायदा म्हणजे त्यावर प्लास्टर करण्याची गरज नसते. त्यांच्यावर सरळ पुट्टी चढवून रंग देता येतो. त्यामुळे प्लास्टर आणि मजूरीचा खर्च वाचतो.
जर वर सांगितलेले पर्याय वापरले तर सीमेंटच्या 50 गोण्या किंवा थैल्या कमी लागतील. सध्या एक थैलीची किंमत जवळपास 350 रुपये आहे. म्हणजेच सिमेंटवरच तुमची 17,500 रुपयांची बचत होईल. घराच्या एकूण खर्चात लोखंडी सळईच्या खर्चाचा वाटा जवळपास 20 टक्के असतो. लोड बेअरिंगच्या बांधकामात हा खर्च 10 टक्के असतो. म्हणजेच 1.50 लाख रुपयांऐवजी तुम्हाला 75 हजार रुपयेच खर्च येईल. यामुळे तुमची 75 हजार रुपयांची बचत होईल.
बैठे घर बनवण्यासाठी सरासरी 5 हजार विटा लागतात. विटांवर साधारणपणे 50 हजार रुपये खर्च होईल. मात्र जर फ्लाय अॅशच्या विटा वापरल्या तर हा खर्च निम्मा होईल. यात सिमेंट आणि वाळूचा खर्च कमी होतो. म्हणजेच हल्लीच्या पद्धतीने घर बांधण्यास जर 75,000 रुपये खर्च होत असेल तर या पद्धतीने 50,000 रुपयेच खर्च येईल. म्हणजेच 25,000 रुपयांची बचत होईल.
लोड बेअरिंगमुळे दगड, पुट्टी, टाइल्स, खिडकी, दरवाजे, प्लंबिंग, टॉयलेट, बाथरुम, सिमेंट, वाळू या सर्वच वस्तूंच्या बाबतीत मोठी बचत होईल. शिवाय जागाही कमी वापरली जाईल. साधारपणे दीड लाखांपर्यतची बचत यामुळे होईल. शिवाय मजूरीचाही मोठा खर्च यामध्ये वाचणार आहे.