मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजाराचा परिणाम भारतीय सेन्सेक्सवर सुद्धा बघायला मिळालाय. आजचा शुक्रवार शेअर मार्केटसाठी ब्लॅक फ्रायडे ठरलाय. पाऊण तासानंतर दुसऱ्यांदा सुरू झाल्यावर बाजार काहीसा सावरला. सकाळच्या घसरणीनंतर सेन्सेक्स जवळपास २००० अंकांनी आणि निफ्टी ६०० अंकांनी वधारला. मात्र गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस ब्लॅक फ्रायडे ठरला. ३१०० अंकांच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचं तब्बल १२ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय.
आज बाजार उघडताच शेअर बाजारात घसरण नोंदवली गेली. सेन्सेक्स २५०० अंकांनी घसरला. गुरुवारी सुद्धा शेअर मार्केटमध्ये घसरण बघायला मिळाली आणि गुरुवारी बाजार बंद होईपर्यंत ३००० अंकांची घसरण नोंदवण्यात आली होती. गेल्या २५ महिन्यांमध्ये पहिल्यांदाच निफ्टीत १० हजारांच्या व्यवसाय झाला. निफ्टीमध्ये ९६६ अंकांच्या घसरणीनंतर लोअर सर्किट लावलं गेलं होतं. म्हणजे व्यवसाय जवळपास ४५ मिनीटांसाठी बंद केलं गेलं होतं.
२००८ साली पहिल्यांदा निफ्टीमध्ये लोअर सर्किट लावलं होतं. निफ्टीत ९६६ अंकांची घसरण होत व्यापार ८५८५ वर झाला. जाणकारांचं म्हणणं आहे की, बाजारातील या घसरणीसाठी कुठे ना कुठे कोरोना जबाबदार आहे. गुरूवारी जेव्हा शेअर बाजार खुला झाला तेव्हा सेन्सेक्समध्ये १७०० अंकांची घसरण नोंदवण्यात आली आणि ही घसरण सुरूच राहिली. शेअर बाजार बंद होईपर्यंत ही घसरण ३००० अंकांवर पोहोचली होती. जर डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत बघितली तर ती १६ पैशांनी कमी झालीय. त्यामुळे १ डॉलरची किंमत आता ७४.४४ रुपये झालीय.
फक्त भारताताच नाही तर संपूर्ण जगात शेअर बाजारावर परिणाम झालाय. टोकियोमध्ये ५ टक्क्यांहून अधिक, हाँगकाँगमध्ये ३.८ टक्के आणि सिडनीमध्ये जवळपास ७ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आलीय. बँकॉक शेअर बाजारात जवळपास ८ टक्के घसरण बघायला मिळाली. तर सियोल, वेलिंग्टन, मुंबई आणि तायपेमध्ये जवळपास ४ टक्क्यांची घसरण दिसली. सिंगापूर आणि जकार्तामध्ये ३ टक्क्यांहून अधिकची घसरण झालीय.
शांघाय शेअर बाजारात १.३ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. या दरम्यान अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत जपानच्या येनमध्ये १ टक्क्यांहून अधिकची वाढ झालीय. एक्सीकॉर्पच्या स्टीफन इनेस यांनी सांगितलं की, प्रवासावरील बंदीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारावर परिणाम झालाय. म्हणून व्यावसायिक बिकवाली करत आहेत.