Credit Card charges | क्रेडिट कार्डवर आकारले जाणारे हे चार्जेस तुम्हाला माहीत आहेत का? सांभाळा तुमचा खिसा

Credit Card | क्रेडिट कार्ड मोफत मिळतात मात्र त्यासोबत अनेक अटीदेखील असतात, ज्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. बहुतांश ग्राहकदेखील याविषयी अजाण असतात किंवा माहिती घेण्याचा प्रयत्न करत नाहीत.

Charges on Credit Card
क्रेडिट कार्डवरील वेगवेगळे शुल्क 
थोडं पण कामाचं
  • क्रेडिट कार्डशी निगडीत अनेक अटी जाणून घ्या
  • क्रेडिट कार्ड फायद्याचे की तोट्याचे हे तुमच्या आर्थिक शिस्तीवर अवलंबून
  • क्रेडिट कार्डवर आकारली जाणारी विविध प्रकारची शुल्क

Credit Card | मुंबई: क्रेडिट कार्ड ही अलीकडच्या काळात प्रत्येकापर्यत पोचलेली बाब आहे. अनेकजण क्रेडिट कार्डचा वापर करून खर्च करत असतात. तसे पाहता क्रेडिट कार्ड (Credit Cards)ही अत्यंत उपयुक्त गोष्ट आहे. खिशात पैसे नसतानाही खरेदी करता येते, खर्च करता येतो. क्रेडिट कार्डचे पैसे एक-दीड महिन्याने भरावे लागतात. शिवाय क्रेडिट कार्डचा वापर करून खरेदी केल्याने एक क्रेडिट हिस्ट्री (Credit History) देखील तयार होते, ज्यामुळे नंतर कर्ज घेणे सोपे होते. क्रेडिट कार्ड मोफत मिळतात मात्र त्यासोबत अनेक अटीदेखील (Terms & conditions on Credit Cards) असतात, ज्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. बहुतांश ग्राहकदेखील याविषयी अजाण असतात किंवा माहिती घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. मात्र क्रेडिट कार्ड घेतल्यानंतर हे शुल्क (Charges on Credit Cards)भरताना निराशा होते. (Credit Card: 7 charges you are paying on credit cards, see the details) 

क्रेडिट कार्डवर विविध प्रकारे ७ शुल्क आकारण्यात येतात. हे शुल्क किंवा चार्ज कोणकोणते असतात आणि किती प्रमाणात तुमच्याकडून वसूल केले जातात ते पाहूया. 

क्रेडिट कार्डवर आकारले जाणारे विविध चार्जेस -

१. कॅश अॅडव्हान्स फी (cash advance fee)

तुमच्या क्रेडिट कार्डच्या मर्यादेचा काही हिस्सा कॅश लिमिटच्या म्हणजे cash advance fee च्या रुपात घेतला जातो. ही रक्कम तुम्ही तुमच्या एटीएममधून काढू शकता. मात्र क्रेडिट कार्डद्वारे कॅश फायदा घेणे किंवा एटीएममधून क्रेडिट कार्डद्वारे कॅश काढणे ही महागडी बाब  आहे. कारण तुम्ही जितकी रक्कम काढता त्याच्या २.५ पटीपर्यत रक्कम तुम्हाला बॅंकेला द्यावी लागू शकते. यात ग्राहकाला कळतदेखील नाही की क्रेडिट कार्डचा वापर करून जसे पैसे काढले तसे व्याज आकारणी सुरू होते. अशा परिस्थितीत व्याजावर सूट मिळत नाही. बहुतांश बॅंका क्रेडिट कार्डचा वापर करून कॅश काढल्यावर १०० रुपयांपासून ते ५०० रुपयांचे शुल्कदेखील वसूल करतात.

२. अॅन्युअल मेंटेनन्स चार्ज (Annual Maintenance Charge)

अॅन्युअल मेंटेनन्स चार्ज हे हिडन किंवा छुपे शुल्क नसते. बॅंका या शुल्कासंदर्भात माहिती देतात. हे शुल्क वर्षातून एकदा वसूल केले जाते. वेगवेगळ्या प्रकारच्या क्रेडिट कार्ड हे शुल्क वेगवेगळे असते. काहीवेळेस बॅंका मोफत अॅन्युअल मेंटेनन्स चार्जची सुविधा देतात. म्हणजेच जॉइनिंग फी किंवा अॅन्युअल फीच्या नावाने कोणतेही शुल्क घेतले जात नाही. अर्थात ही सुविधा काही विशिष्ट कालावधीसाठीच असते.

३. इंटरेस्ट रेट (Interest rate on Credit Card bill)

याला अॅन्युअल पर्सेंटेज रेट किंवा एपीआर असे म्हणतात. एपीआर तुमच्या क्रेडिट कार्डच्या बिलातील सर्वात महत्त्वाचा भाग असतो. जर क्रेडिट कार्डचे बिल बाकी असेल तर एपीआरमुळे तुम्हाला मोठा भुर्दंड पडतो. त्यामुळेच क्रेडिट कार्डला कर्जाचा ट्रॅपदेखील म्हटले जाते. कारण इतर कर्जांच्या तुलनेत क्रेडिट कार्डचे व्याज कितीतरी पट अधिक असते. मात्र हे तुम्हाला थोडीशी रक्कम जमा केल्यावर देखील लागू होते. म्हणजेच तुमचे क्रेडिट कार्डचे बिल २०,००० रुपये आहे आणि तुम्ही त्यातील ७,००० रुपये जमा केले आहेत. तर उर्वरित १३,००० रुपयांवर तुमच्याकडून बॅंक ३३-४२ टक्क्यांनी व्याज वसूल करते. त्यामुळे दर महिन्याला तुमचे क्रेडिट कार्डचे बिल पूर्णपणे भरणे हाच एकमेव योग्य पर्याय ठरतो.

४.फॉरेन करन्सी मार्क अप फी (Foreign currency mark up fee)

बॅंकांकडून नेहमी सांगितले जाते की आंतरराष्ट्रीय ट्रान्झॅक्शनवर कोणतेही शुल्क लागत नाही. मात्र असे अजिबात नसते. बॅंक इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शनवर, फॉरेन करन्सी मार्क अप फी (Foreign currency mark up fee)च्या रुपात शुल्क वसूल करतात. हे शुल्क वेगवेगळ्या बॅंकांमध्ये वेगवेगळे असते. या शुल्काअंतर्गत ट्रान्झॅक्शन अमाउंटवरील काही हिश्याची वसूली केली जाते. काही बॅंकांचे हे शुल्क ट्रान्झॅक्शन अमाउंटच्या २ टक्के असते तर काही बॅंका ३.५ टक्क्यांपर्यतदेखील शुल्क आकारतात. 

५. जीएसटी (GST)

क्रेडिट कार्डद्वारे जितके ट्रान्झॅक्शन तुम्ही करता त्यावर जीएसटी कर वसूल केला जातो. त्यामुळेच वस्तू किंवा सामान विकत घेताना त्यावरील कर आणि त्याचे स्लॅब याबद्दलची माहिती घ्या. याचबरोबर जीएसटी अॅन्युअल फी, इंटरेस्ट पेमेंट आणि ईएमआयवर द्यावी लागणारी प्रोसेसिंग फी यावरदेखील १८ टक्के दराने शुल्क वसूल केले जाते.

६. लेट पेमेंट चार्जेस (late payment charges)

क्रेडिट कार्डच्या बिलाबरोबर तुम्हाला एक सुविधा मिळते ती अशी की तुम्ही त्या महिन्यात बिलातील सर्व रक्कम भरली नाही तरी चालते. त्यासाठी बॅंक तुम्हाला मिनिमम अमाउंट जमा करण्याचा पर्याय देते. जर एखादा ग्राहक मिनिमम अमाउंटदेखील भरू शकत नसेल तर बॅंक त्याच्याकडून लेट पेमेंट चार्ज वसूल करते. क्रेडिट कार्डच्या स्टेटमेंटमधील बॅलन्स तपासून ही लेट फी निश्चित केली जाते. एचडीएफसी क्रेडिट कार्डचे स्टेटमेंट बॅलन्स जर १००-५०० रुपयांच्या दरम्यान असेल तर लेट पेमेंट फी १०० रुपये असते. मात्र जर स्टेटमेंट बॅलन्स १०,००१ रुपयांपेक्षा अधिक असेल तर लेट पेमेंट फी ७५० रुपये इतकी असते.

७. ओव्हर लिमिट फी (over limit fee)

हे शुल्क तुमच्या क्रेडिट कार्डच्या प्रकारावर अवलंबून असते. प्रत्येक क्रेडिट कार्डबरोबर तुम्हाला एक क्रेडिट लिमिट मिळते. त्यापेक्षा अधिक रक्कम खर्च करण्याची सुविधा काही बॅंका देतात तर काही बॅंका देत नाहीत. जर एखाद्या क्रेडिट कार्डधारकाने लिमिटपेक्षा अधिक खर्च केला तर बॅंक त्यावर जबरदस्त व्याज आकारतात. बहुतांश बॅंकांची किमान मर्यादा ५०० रुपये इतकी असते. म्हणजेच किमान ओव्हर लिमिट फी (over limit fee) ही ५०० रुपये असू शकते. ही फी तुमच्या क्रेडिट कार्डचा प्रकार आणि बॅंक यावर अवलंबून असते.

क्रेडिट कार्ड वापरासाठी आर्थिक शिस्त आवश्यक

क्रेडिट कार्ड ही एक चांगली सुविधा आहे. मात्र ती अशा लोकांसाठी उपयुक्त आहे जे वेळेवर दर महिन्याला पूर्ण बिल भरतात. मात्र ज्यांच्याकडे आर्थिक शिस्त नाही अशा लोकांनी यापासून जरा लांब राहणेच योग्य ठरते. त्याचबरोबर तुम्ही ज्या बॅंकेकडून ज्या प्रकारचे क्रेडिट कार्ड घेतलेले आहे त्यावर वर उल्लेख केलेल्या शुल्कांचे दर किती आहे, तुमच्याकडून किती शुल्क वसूल केले जाते हे तुम्हाला माहित असणे अत्यंत आवश्यक आहे. क्रेडिट कार्ड वापरताना सजगपणे चार्जेस जाणून घेतले आणि नियमितपणे बिल भरले तर काहीच नुकसान होणार नाही.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी