कर्ज देताना क्रेडिट किंवा सिबिल स्कोअर का पाहिला जातो, दोघांमध्ये फरक काय, स्वत:च करा चेक

काम-धंदा
Updated Apr 22, 2021 | 16:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

क्रेडिट स्कोअर, सिबिल स्कोअरमुळे बॅंक किंवा वित्तसंस्थेला तुमच्या आर्थिक स्थितीची कल्पना येते. या स्कोअरमधून तुमच्या आधीच्या कर्ज, क्रेडिट कार्ड बिल किंवा इतर खात्यांची कल्पना आणि त्यातील ट्रेंड बॅंकेला दिसतो.

Know difference between credit score & CIBIL score
क्रेडिट स्कोअर आणि सिबिल स्कोअरमधील फरक 
थोडं पण कामाचं
  • क्रेडिट स्कोअर (Credit Score) आणि सिबिल स्कोअर (CIBIL Score)
  • दोघांमधील फरक
  • कसा करावा चेक

नवी दिल्ली :  कर्जासाठी अर्ज केल्यानंतर अर्जदाराचे क्रेडिट स्कोअर (Credit Score) आणि सिबिल स्कोअर (CIBIL Score)नेहमी तपासला जातो. क्रेडिट स्कोअर आणि सिबिल स्कोअरमुळे बॅंक किंवा वित्तसंस्थेला तुमच्या आर्थिक स्थितीची कल्पना येते. या स्कोअरमधून तुमच्या आधीच्या कर्ज, क्रेडिट कार्ड बिल किंवा इतर खात्यांची कल्पना आणि त्यातील ट्रेंड बॅंकेला दिसतो. त्यातून अर्जदाराची आर्थिक पत आणि आर्थिक व्यवहारांबद्दल ग्राहकाची मानसिकता लक्षात येते. त्यामुळे त्या व्यक्तीस कर्ज देण्यासंबंधीचा निर्णय घेणे बॅंकेला किंवा त्या वित्तीय संस्थेला सोपे जाते.

कर्जाची आवश्यकता

घर किंवा मालमत्ता किंवा गाडी घेताना बहुतांश वेळा लोक बॅंकेकडून कर्ज घेतात (Loan). कारण सर्वसाधारणपणे अशा व्यवहारांमध्ये मोठी रक्कम द्यावी लागते. सर्वसामान्य व्यक्तीसाठी एवढी रक्कम एकरकमी उभी करणे अवघड असते. त्यामुळे बहुतांश वेळा लोक कर्ज घेऊन घर किंवा कार विकत घेतात. अशा वेळेस बॅंक किंवा वित्तीय कंपनी ग्राहकाला कर्ज देण्यापूर्वी त्याचा क्रेडिट स्कोअर किंवा सिबिल स्कोअर तपासतात. यातून अर्जदाराच्या पूर्ण आर्थिक स्थितीचा अंदाज बॅंकेला येतो. या दोन संकल्पनांमध्ये नेमका काय फरक आहे आणि कर्ज घेताना याचे महत्त्व का आहे, हे जाणून घेऊया.

क्रेडिट स्कोअर आणि सिबिल स्कोअरमधील फरक


क्रेडिट स्कोअर आणि सिबिल स्कोअर या संकल्पनांचा वापर कर्ज देताना केला जातो. जितका क्रेडिट स्कोअर किंवा सिबिल स्कोअर जास्त तितकी ग्राहकाची आर्थिक स्थिती उत्तम, तितकी ग्राहकाची आर्थिक शिस्त उत्तम. त्यामुळे अशा ग्राहकाला कर्ज देण्यास बॅंक किंवा वित्तीय संस्था प्राधान्य देतात. कारण अशा ग्राहकाकडून कर्जवसूलीत कोणतीही अडचण न येण्याची किंवा कमीत कमी अडचण येण्याची शक्यता असते. क्रेडिट स्कोअर हा अर्जदाराच्या आर्थिक स्थितीला ट्रॅक करण्यासाठी वापरात आणला जातो. जर एखादी व्यक्ती वेळेवर त्याच्या कर्जाचे हफ्ते भरत असेल. तर त्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर चांगला समजला जातो. तर सिबिल रिपोर्ट तीन अंकांचा असतो. यामध्ये क्रेडिट स्कोअरच्या आधारावर पॉईंट्स निश्चित करण्यात आले आहेत. 

सिबिल स्कोअरचे रेटिंग


सिबिल स्कोअर ३०० ते ९०० अंकांच्या दरम्यान असतो. तुमचा सिबिल स्कोअर जितका ९००च्या जवळ तितका चांगला असतो, अशात तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता जास्त असते. ७५० पेक्षा जास्त स्कोअर हा चांगला सिबिल स्कोअर समजला जातो. तर ३००च्या जवळपासचा स्कोअर हा वाईट सिबिल स्कोअर समजला जातो. सिबिल स्कोअर जर चांगला नसेल तर तुमचा कर्जाचा अर्ज नाकारला जाऊ शकतो.

स्वत:च चेक करा तुमचा क्रेडिट स्कोअर


क्रेडिट स्कोअर चेक करण्यासाठी तुम्ही सिबिलची वेबसाईट किंवा इतर बॅंकिंग सर्व्हिसेस अॅग्रीगेटर्सच्या वेबसाईटवर जाऊ शकता. तिथे विचारण्यात आलेली माहिती भरल्यानंतर तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर तपासू शकता. तुम्हाला हवे असल्यास वेबसाईटचे सबस्क्रिप्शन प्लॅनदेखील घेऊन तुम्ही स्कोअर पाहू शकता. क्रेडिट स्कोअर निशुल्कदेखील पाहता येतो. मात्र फ्री सबस्क्रिप्शनने स्कोअर बघणाऱ्यांना केवळ एकदाच आपला सध्याचा सिबिल रिपोर्ट पाहता येतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी