डी-मार्टचे संस्थापक राधाकिशन दमानींना घेतला मलबार हिलमध्ये १,००० कोटींचा बंगला

काम-धंदा
Updated Apr 03, 2021 | 22:23 IST | टाइम्स नाऊ मराठी

डी-मार्ट या लोकप्रिय रिटेल स्टोअर साखळीचे संस्थापक राधाकिशन दमानी यांनी दक्षिण मुंबईत एक आलीशान बंगला १,००१ कोटी रुपयांना विकत घेतला आहे. दमानी यांचा बंधू गोपीकिशन दमानी यांच्याबरोबर संयुक्तरित्या व्यवहार.

Damani buys bungalow at Malabar hill
दमानींचा नवा १,००० कोटींचा मलबार हिलचा आलीशान बंगला 

थोडं पण कामाचं

  • १,००१ कोटी रुपयांचा मलबार हिल येथील बंगला
  • ६०,००० चौ. फूटांचा दुमजली बंगला दीड एकरांच्या परिसरात विस्तारलेला
  • राधाकिशन दमानी देशातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती, मालमत्ता १५.४ अब्ज डॉलरची

मुंबई : डी-मार्ट या लोकप्रिय रिटेल स्टोअर साखळीचे संस्थापक राधाकिशन दमानी यांनी दक्षिण मुंबईत एक आलीशान बंगला १,००१ कोटी रुपयांना विकत घेतला आहे. दमानी यांनी त्यांचे बंधू गोपीकिशन दमानी यांच्याबरोबर संयुक्तरित्या हा बंगला विकत घेतला आहे. दक्षिण मुंबईतील मलबार हिल परिसरातील नारायण दाभोळकर रोडवर हा बंगला आहे. मलबार हिल हा मुंबईतील सर्वात आलीशान परिसर समजला जातो. हा परिसर अनेक धनाढ्यांच्या बंगल्यांसाठी प्रसिद्ध आहे. 

आलीशान बंगला

राधाकिशन दमानी हे उद्योगपती म्हणून प्रसिद्ध तर आहेतच शिवाय ते एक यशस्वी गुंतवणुकदार म्हणूनदेखील प्रसिद्ध आहे. दमानींचा नवा बंगला जवळपास ६०,००० चौ. फूटांचा असून तो दीड एकरांच्या परिसरात विस्तारलेला आहे. त्याचे नाव मधूकुंजं असे असून हा बंगला दोन मजली आहे. राधाकिशन दमानी आणि गोपीकिशन दमानी यांनी हा बंगला पुराचंद रॉयचंद अॅंड सन्स, परेशचंद रॉयचंद अॅंड सन्स, प्रेमचंद रॉयचंद अॅंड सन्स यांच्याकडून विकत घेतला आहे. या बंगल्याच्या व्यवहारापोटी दमानी यांनी ३० कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटीदेखील अदा केली आहे. यावर्षीच ३१ मार्चला दमानी यांनी ही मालमत्ता विकत घेतली आहे.   

दमानींची मालमत्ता १५.४ अब्ज डॉलरची

मुंबईतील एका वन रुम घरात वाढलेल्या दमानी यांनी डी-मार्ट ही देशातील लोकप्रिय रिटेल स्टोअरची साखळी उभी केली आहे. अव्हेन्यू सुपरमार्ट्स लि. ही डी-मार्टची प्रवर्तक कंपनी आहे. फोर्बस या जगप्रसिद्ध नियतकालिकाने भारतातील श्रीमंतांची २०२०साठी यादी प्रसिद्ध केली होती. त्यात राधाकिशन दमानी हे भारतातील चौथ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती ठरले होते. त्यांची एकूण मालमत्ता १५.४ अब्ज डॉलर इतकी आहे.

दमानींची वाटचाल

मलबार हिलमध्ये एखादा बंगला विकत घेणे हे दमानींसारख्या देशातील आघाडीच्या व्यावसायिकांसाठी काही नवीन गोष्ट नाही. २०१५ मध्ये पूनावाला समूहाचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांनीदेखील मुंबईतील प्रसिद्ध लिंकन हाऊस ७५० कोटी रुपयांना विकत घेतले होते. राधाकिशन दमानी यांनी मधूकुंज विकत घेताना ३०.०३ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्कदेखील मोजले आहे. राधाकिशन दमानी आणि त्यांचे बंधू गोपीकिशन दमानी हे सध्या अलमाऊंट रोडवरील पृथ्वी अपार्टमेंटमध्ये राहतात. हे अपार्टमेंटदेखील दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या भागात आहे. 

दमानी यांनी मधूकुंज ज्यांच्याकडून विकत घेतला ते पुराचंद रॉयचंद अॅंड सन्स एलएलपी, परेशचंद रॉयचंद अॅंड सन्स एलएलपी आणि प्रेमचंद रॉयचंद अॅंड सन्स एलएलपी हे व्यावसायिक भागीदार आहेत. दमानी यांनी विकत घेतलेल्या मधूकुंजची नोंदणी तारीख ३१ मार्च २०२१ ही आहे.

काय आहे डी मार्ट

डी-मार्ट ही देशातील सर्वात मोठ्या रिटेल स्टोअर साखळींपैकी एक आहे. देशातील अनेक शहरांमध्ये डी-मार्टच्या शाखा आहेत.

महत्त्वाचे मुद्दे - 

  1. देशातील सर्वाधिक महागड्या घरांपैकी एक
  2. देशातील निवासी रिअल इस्टेटमधील सर्वाधिक मोठ्या व्यवहारांपैकी एक व्यवहार
  3. १,००१ कोटी रुपयांचा व्यवहार
  4. ३० कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी
  5. ६०,००० चौ. फूटांचा दुमजली बंगला दीड एकरांच्या परिसरात विस्तारलेला
  6. राधाकिशन दमानी देशातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती, मालमत्ता १५.४ अब्ज डॉलरची

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी