कोरोनाचा प्रभाव कमी होताच बँकांच्या ठेवींमध्ये वाढ

Despite Pandemic Bank Deposits Increased कोरोना संकटाचा प्रभाव कमी होऊ लागल्यामुळे देशाची आर्थिक स्थिती सामान्य होऊ लागली आहे.

Despite Pandemic Bank Deposits Increased
कोरोनाचा प्रभाव कमी होताच बँकांच्या ठेवींमध्ये वाढ 

थोडं पण कामाचं

  • कोरोनाचा प्रभाव कमी होताच बँकांच्या ठेवींमध्ये वाढ
  • बँकांमधील ठेवींमध्ये तसेच बँकांकडून केल्या जाणाऱ्या पतपुरवठ्यात वाढ
  • वाढत्या ठेवी आणि वाढता पतपुरवठा अर्थव्यवस्था सुधरत असल्याचे निदर्शक

मुंबईः कोरोना (corona) संकटामुळे (crisis) मार्च महिन्यापासून पुढील ४-६ महिने पैसे काढण्याचे प्रमाण जास्त होते. आरोग्य आणि अत्यावश्यक गरजांसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर खर्च करत होते. मात्र कोरोना संकटाचा प्रभाव कमी होऊ लागल्यामुळे पुन्हा परिस्थिती सामान्य होऊ लागली आहे. रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India - RBI) या संदर्भात एक आकडेवारी प्रसिद्ध केली. बँकांच्या (Banks) पतपुरवठ्यात (finance) ९ ऑक्टोबर २०२० रोजी संपलेल्या पंधरवड्यात ५.५६ टक्के वाढ झाल्याचे रिझर्व्ह बँकेने सांगितले. (Despite Pandemic Bank Deposits Increased)

बँकांमधील ठेवींमध्ये तसेच बँकांकडून केल्या जाणाऱ्या पतपुरवठ्यात वाढ

कोरोना संकटाचा प्रभाव कमी होऊ लागला आहे. देशाच्या अर्थचक्राला गती मिळू लागली आहे. आर्थिक व्यवहार वाढल्यामुळे बँकांमधील ठेवींमध्ये वाढ झाली आहे. बँकांच्या पतपुरवठ्यात ९ ऑक्टोबरपर्यंत ५.५६ टक्के वाढ झाली. यामुळे बँकांचा पतपुरवठा १०३.४४ लाख कोटी रूपये एवढा झाला. बँकांच्या ठेवीत १०.५५ टक्क्यांची वाढ झाली. या वाढीमुळे बँकांतील ठेवींच्या स्वरुपात असलेली एकूण रक्कम १४३.०२ लाख कोटी रूपयांपेक्षा जास्त झाली. 

याआधी ११ ऑक्टोबर २०१९ रोजी संपलेल्या पंधरवड्यात बँकांनी ९७.८९ लाख कोटी रूपयांचा पतपुरवठा केला. या काळात बँकांकडे ठेवींच्या स्वरुपात १२९.३८ लाख कोटी रूपये होते. याच वर्षी २५ सप्टेंबर रोजी संपलेल्या पंधरवड्यात बँकांनी १०२.७२ लाख कोटी रूपयांचा पतपुरवठा केला. या काळात बँकांकडे ठेवींच्या स्वरुपात १४२.६४ लाख कोटी रूपये जमा झाले.

वाढत्या ठेवी आणि वाढता पतपुरवठा अर्थव्यवस्था सुधरत असल्याचे निदर्शक

बँकांचा वाढत असलेला पतपुरवठा तसेच बँकांमधील वाढत्या ठेवी यावरुन अर्थव्यवस्थेत (economy or indian economy) सुधारणा होत आहे असे रिझर्व्ह बँकेने सांगितले. मंदावलेल्या अर्थचक्राने गती घेतली आहे. लवकरच परिस्थिती सावरेल, असा विश्वास रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला. 

ऑगस्ट महिन्यात वैयक्तिक कर्जात १०.६ टक्क्यांची वाढ

बँकांचा वार्षिक बिगरखाद्य पतपुरवठा मागच्या वर्षीच्या ९.८ टक्क्यांवरुन ६ टक्क्यांवर घसरला आहे. त्याचवेळी कृषी आणि कृषीपूरक उद्योग यांच्यासाठीचा बँकांकडून होणारा पतपुरवठा मागच्या वर्षीच्या तुलनेत ४.९ टक्क्यांनी वाढला आहे. मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात बँकांनी उद्योगांना पुरवलेल्या पतपुरवठ्यात ३.९ टक्के वाढ झाली होती. यंदा ऑगस्ट महिन्यात बँकांनी उद्योगांना पुरवलेल्या पतपुरवठ्यात अर्ध्या टक्क्याची घट दिसली. हा परिणाम कोरोनाचा असावा कारण वेगवेगळ्या भागांमध्ये ऑगस्ट महिन्यात काही भाग कार्यरत तर काही ठिकाणी लॉकडाऊन अशी परिस्थिती होती. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी ऑगस्ट महिन्यात वैयक्तिक कर्जात (personal loan) १०.६ टक्क्यांची वाढ दिसून आली.

रेपो रेट ४ टक्के, रिव्हर्स रेपो ३.३५ टक्के; जीडीपीत ९.५ टक्क्यांची घट

रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India - RBI) २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे पतधोरण (Monetary Policy) ९ ऑक्टोबरला जाहीर केले. तिसऱ्या तिमाहीसाठी रिझर्व्ह बँकेने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० या तिमाहीसाठी रेपो रेट ४ टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्के राहतील असे जाहीर केले. आधीच्या तिमाहीतही हेच दर होते त्यामुळे अर्थव्यवस्थेत स्थैर्य येत असल्याचा स्पष्ट संदेश सर्वत्र पोहोचला. कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्थेत घसरण झाली आहे. या घसरणीतून अर्थव्यवस्था सावरत आहे. चौथ्या तिमाहीत म्हणजे जानेवारी ते मार्च २०२१ या कालावधीत अर्थव्यवस्था पुन्हा मार्गावर येत असल्याचे स्पष्ट दिसू लागेल, असा विश्वास रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी