Dhanteras Gold Investment | धनत्रयोदशीला सोने खरेदी करणार असाल तर या ५ गोष्टी लक्षात घ्या

Dhanteras Gold Investment | धनत्रयोदशीला सोन्यात गुंतवणूक करण्याची परंपरा आहे. वर्षाच्या ज्या काही दिवसांमध्ये लोक हमखास सोने खरेदी करतात त्यातील हा एक दिवस असतो.

Dhanteras Gold Investment
धनत्रयोदशीला सोने खरेदी 
थोडं पण कामाचं
  • धनत्रयोदशीला सोन्यात गुंतवणूक करण्याची परंपरा
  • भारतीयांना सोन्यात (Gold)गुंतवणूक करायला आवडते
  • सोने खरेदी करताना काही बाबी लक्षात घेणे महत्त्वाचे

Dhanteras | मुंबई: दिवाळीच्या सणात धनत्रयोदशी (Dhanteras) हा एक महत्त्वाचा आणि शुभ दिवस असतो. धनत्रयोदशीला सोन्यात गुंतवणूक (Dhanteras Gold Investment) करण्याची परंपरा आहे. वर्षाच्या ज्या काही दिवसांमध्ये लोक हमखास सोने खरेदी करतात त्यातील हा एक दिवस असतो. यावर्षी सोन्याच्या भावात वाढ झालेली आहे. त्यामुळे नागरिकांना सोने विकत घेताना जास्त गुंतवणूक करावी लागते आहे. अशावेळी सोन्याची खरेदी करताना किंवा गुंतवणूक (Gold Investment) करताना काही बाबी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. भारतीयांना सोन्यात (Gold)गुंतवणूक करायला आवडते. अलीकडेच सोने ५०,००० रुपये प्रती १० ग्रॅमच्या (Gold Rate)पातळीवर पोचले होते. जाणकारांच्या मते कोरोना महामारीनंतरच्या काळातील अनिश्चितता लक्षात घेता सोन्याच्या मागणीत आणि किंमतीत वाढ होत राहील. लोक वेगवेगळ्या कारणांसाठी सोने खरेदी करतात. भविष्यात आर्थिक संकट आल्यास त्याला तोंड देण्यासाठी सोने हे महत्त्वाचे साधन समजले जाते. सोन्यात गुंतवणूक करताना कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात ते पाहूया. (Dhanteras Gold Investment | Consider these 5 points before investing in Gold)

सोन्यात कशी कराल गुंतवणूक

सोन्यात गुंतवणूक करताना ती दागिने (Gold Jewellerry)गोल्ड बार किंवा शिक्के या रुपाने करता येते. हाच प्रकार सर्वसाधारणपणे लोकप्रिय आहे. मात्र या प्रकारे गुंतवणूक करताना जीसएटी, मेकिंग चार्ज इत्यादी खर्च वाढतो. शिवाय सोन्याची शुद्धता आणि सोने सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकर इत्यादी बाबींचीही चिंता असते. मात्र प्रत्यक्ष सोने विकत घेऊनच सोन्यात गुंतवणूक करता येते असे नाही. तर गोल्ड ईटीएफ (Gold ETF), गोल्ड फंड (Gold Fund), सोव्हेरन गोल्ड बॉंड (Sovereign Gold Bond) यासारखे चांगले पर्याय देखील उपलब्ध आहेत. यामध्ये गुंतवणूक करताना सोन्याची शुद्धता, सोने सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकर आणि इतर शुल्क या सर्व घटकांची कोणतीही चिंता नसते.

सोने खरेदी करताना या ५ गोष्टी लक्षात ठेवा -

१. हॉलमार्क असणारे दागिने

सोन्याचे दागिने खरेदी करताना सर्वात सुरक्षित प्रकार म्हणजे हॉलमार्क असणारे दागिने. इंडियन स्टॅंडर्ड ब्युरो सोन्याच्या शुद्धतेची तपासणी करते. सोने १८ कॅरेट, २२ कॅरेट, २४ कॅरेट अशा स्वरुपात मिळते. हॉलमार्कचे दागिने विकत घेतल्यास सोन्याच्या शुद्धतेविषयी खातरजमा होते.

२. सोन्याचा भाव तपासा

सोन्याच्या भावात तेजी येणार कि घसरण होणार याचा अंदाज वर्तवणे अवघड असते. मात्र जर तुम्ही सोन्याची खरेदी करू इच्छित असाल तर थोडासा अभ्यास करून याची खातरजमा करून घ्या की त्या दिवसांमध्ये सोन्याच्या भावात घसरण होण्याची चिन्हे तर नाहीत ना. सोन्याचा भाव खाली येणार असल्यास थोडे थांबून मग सोने खरेदी करा.

३. मेकिंग चार्जवर घासाघीस

जर तुम्ही सोन्याचे दागिने विकत घेत असाल तर तुम्हाला मेकिंग चार्ज द्यावा लागतो. मेकिंग चार्ज नेमका किती आहे हे जाणून घ्या. मेकिंग चार्ज कमी करणे महत्त्वाचे असते. सोन्याच्या दागिन्यांचा मेकिंग चार्ज हा दागिन्यांच्या एकूण किंमतीच्या ३० टक्क्यांपर्यत असू शकतो.

४. बिल किंवा चलनद्वारेच खरेदी करा

जीएसटी द्यावा लागतो म्हणून काहीजण बिल किंवा चलान घेणे टाळतात. मात्र भविष्यात काही अडचण आल्यास तुम्ही विशिष्ट सराफाकडून सोन्याची खरेदी केली आहे यासाठी किंवा एखादा वाद निर्माण झाल्यास कागदोपत्री पुरावा म्हणून हे बिल तुम्हाला उपयोगी ठरते.

५. वजनाची खातरजमा करा

सोन्याचे दागिने, शिक्के किंवा बार विकत घेताना सोन्याच्या वजनाची खातरजमा करून घ्या. म्हणजे तुम्ही जितक्या वजनाचे मूल्य देत आहात तितक्याच वजनाचे सोने तुम्हाला मिळेल याची खात्री होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी