Mutual Fund | म्युच्युअल फंडांच्या या १० प्रकारांविषयी जाणून घ्या...तुमच्या गुंतवणुकीसाठी ठरेल फायद्याचे

Mutual Fund Investment | मोठ्या संख्येने सर्वसामान्य गुंतवणुकदार यात गुंतवणूक (Investment)करताना दिसतात. मात्र अद्यापही बहुतांश लोकांना म्युच्युअल फंड नेमके काय असतात, त्यात कोणकोणते प्रकार (Mutual Funds category)आहेत याबद्दल माहिती नसते. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना तुमच्यासाठी योग्य ठरणाऱ्या प्रकारात गुंतवणूक करणे महत्त्वाचे ठरते.

Mutual Fund categories
म्युच्युअल फंडांचे प्रकार 
थोडं पण कामाचं
  • म्युच्युअल फंडातील गुंतवणूक लोकप्रिय होते आहे
  • म्युच्युअल फंडातील विविध प्रकार
  • गुंतवणूक करताना तुमच्या गरजेनुरुप प्रकार निवडून त्यात गुंतवणूक करावी

Mutual Fund Investment | नवी दिल्ली : म्युच्युअल फंडातील (Mutual Funds) गुंतवणूक अलीकडे लोकप्रिय झाली आहे. मोठ्या संख्येने सर्वसामान्य गुंतवणुकदार यात गुंतवणूक (Investment)करताना दिसतात. मात्र अद्यापही बहुतांश लोकांना म्युच्युअल फंड नेमके काय असतात, त्यात कोणकोणते प्रकार (Mutual Funds category)आहेत याबद्दल माहिती नसते. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना तुमच्यासाठी योग्य ठरणाऱ्या प्रकारात गुंतवणूक करणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे तुमची आर्थिक उद्दिष्टे (Financial goals) आणि आर्थिक नियोजन (Financial planning) अधिक चांगल्या पद्धतीने साध्य होऊ शकते.  ( Different Types of various Mutual Funds, know the details)

म्युच्युअल फंडांचे प्रकार

सेबीने म्युच्युअल फंडांची वर्गवारी काही श्रेणींमध्ये केली आहे. जेणेकरून गुंतवणुकदारांना आपल्याला योग्य ठरतील अशा प्रकारात गुंतवणूक करता येऊ शकेल. म्युच्युअल फंडात डेट प्रकारातील फंडाद्वारे मनी मार्केटमध्ये गुंतवणूक केली जाते, तर इक्विटी प्रकाराद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक केली जाते. मात्र याव्यतिरिक्त सर्वच म्युच्युअल फंड वेगवेगळ्या प्रकारांमध्ये विभागण्यात आले आहे. प्रत्येक प्रकाराचे खास वैशिष्ट्य आणि उद्दिष्ट असते. ते लक्षात घेऊन आपण गुंतवणूक केली पाहिजे. म्युच्युअल फंडाचे विविध प्रकार जाणून घेऊया.

१. लार्ज कॅप म्युच्युअल फंड
हा एक इक्विटी प्रकारातील म्युच्युअल फंडाचा प्रकार आहे. यात म्युच्युअल फंड कंपन्या लार्ज कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. म्हणजे बाजारातील टॉप १०० शंभर कंपन्यांमध्ये या प्रकाराद्वारे गुंतवणूक केली जाते. यात कमी जोखीम असते आणि बाजारातील चढ उतारांचा तुलनेने कमी प्रभाव यावर पडतो.

२. मिड कॅप म्युच्युअल फंड
या प्रकारात शेअर बाजारातील बाजारमूल्यानुसार १०१ ते २५० या क्रमांकाच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली जाते. लार्ज कॅपच्या तुलनेत  यामध्ये थोडी अधिक जोखीम असते, मात्र परतावादेखील जास्त मिळतो.

३. स्मॉल कॅप फंड
या प्रकारात शेअर बाजारातील बाजारमूल्यानुसार २५० क्रमांकाच्या पुढील कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली जाते. या तुलनेने छोट्या कंपन्या असल्याने यांच्या शेअरमध्ये जास्त चढउतार येत असतात. त्यामुळे या जोखीम अधिक असते मात्र त्याचबरोबर परतावादेखील जास्त मिळू शकतो.

४. मल्टी कॅप फंड
हे देखील इक्विटी प्रकारातीलच म्युच्युअल फंड असतात. यामध्ये लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप अशा तिन्ही श्रेणीतील कंपन्यांच्या शेअरचे मिश्रण असते. या तिन्ही प्रकारात गुंतवणूक विभागली जाते. जेणेकरून तिन्ही प्रकारातील फायदे मिळावेत आणि जोखीम मर्यादित राहावी. यामुळे गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओत विविधता येते.

५. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम फंड
यालाच ईएलएसएस फंड असेदेखील म्हणतात. हे देखील इक्विटी प्रकारातच येतात. या म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून चांगला परतावा तर मिळतोच शिवाय प्राप्तिकर अधिनियमाच्या ८० क अंतर्गत प्राप्तिकरात १.५ लाख रुपयांपर्यतची करवजावटदेखील मिळते. टॅक्स सेव्हिंगसाठी या फंडात गुंतवणूक केली जाते. मात्र या फंडांमध्ये ३ वर्षांच्या लॉक इन पिरियड असतो. दीर्घकालावधीसाठी या फंडात गुंतवणूक केली जाते.

६. डिव्हिडंड यील्ड फंड
हे इक्विटी प्रकारातील म्युच्युअल फंड असून यात गुंतवणुकदारांना डिव्हिडंडचा लाभ मिळतो. म्युच्युअल फंडाने ज्या कंपन्यांच्या शेअरमध्ये पैसा गुंतवलेला असतो त्या कंपन्यांनी डिव्हिडंड दिला की तो लाभ गुंतवणुकदारांना दिला जातो. ज्या कंपन्या चांगला लाभांश देतात आणि ज्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला अशा कंपन्यात याद्वारे गुंतवणूक केली जाते.

७. सेक्टोरल फंड
या म्युच्युअल फंडाद्वारे विशिष्ट एका क्षेत्रातील चांगल्या किंवा आघाडीच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली जाते. अर्थात यात सर्व गुंतवणूक एकाच क्षेत्रातील कंपन्यांमध्ये असल्याने जोखीमदेखील जास्त असते. मात्र त्या क्षेत्राने दमदार कामगिरी केल्यास फायदाही मोठा होतो.

८. कॉन्ट्रा फंड
या प्रकारात बाजारातील परिस्थितीच्या विरुद्ध गुंतवणूक केलीजाते. ज्या शेअरमधून गुंतवणुकदार पैसे काढून घेत असतात त्यात म्युच्युअल फंड पैसे गुंतवतात. यात दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक करून शेअरच्या किंमतीतील तेजी किंवा घसरण यांची सरासरी गाठली जाते. मात्र यात मोठी जोखीम असते आणि चढउतार असतात. ज्यांची जोखीम क्षमता जास्त आहे आणि ज्यांच्याकडे धैर्य जास्त आहे अशाच लोकांसाठी हा पर्याय आहे.

९. व्हॅल्यू फंड
या फंडाद्वारे म्युच्युअल फंड कंपन्या चांगल्या कंपन्यांचा शोध घेतात. ज्या कंपन्यांच्यी कामगिरी चांगली आहे, व्यवस्थापन चांगले आहे, व्यवसायाचे मॉडेल, स्पर्धा, आर्थिक स्थिती इत्यादी घटक चांगले आहेत अशा कंपन्यांची निवड करून मग त्यात गुंतवणूक केली जाते. या कंपन्यांकडून भविष्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा असते. संयमाने दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक करणाऱ्या आणि अनुभवी गुंतवणुकदारांसाठी हा पर्याय आहे.

१०. फोकस फंड
फोकस फंड हे असे म्युच्युअल फंड आहेत जे आपल्या पोर्टफोलिओत तुलनेने कमी कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करतात. सर्वच क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी यात मर्यादित क्षेत्रातील ठराविक कंपन्यांच्या शेअरमध्ये पैसा गुंतवला जातो. चांगली कामगिरी करणाऱ्या ठराविक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून मोठा परतावा मिळवणे हे यामागचे उद्दिष्ट असते.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी