Muhurat Trading: सेन्सेक्स, निफ्टीमध्ये जोरदार तेजी, मुहुर्त ट्रेडिंगने गुंतवणुकदारांची दिवाळी

Diwali Muhurat Trading 2021: मुहुर्त ट्रेडिंग केल्याने संपूर्ण वर्षभर फायदा होतो असे गुंतवणुकदार किंवा ट्रेडर्स मानतात. बीएसईमध्ये याची सुरूवात १९५७ आणि एनएसईमध्ये याची सुरूवात १९९२ मध्ये झाली होती.

Diwali Muhurat Trading 2021
शेअर बाजारातील दिवाळी मुहुर्त ट्रेडिंग 
थोडं पण कामाचं
  • मुहुर्त ट्रेडिंग (Diwali Muhurat)ही एक खास परंपरा शेअर बाजारात दिवाळीच्या काळात साजरी करतात
  • सेन्सेक्स २९५.७० अंशांनी वधारून ६०,०६७.६२ अंशांवर बंद
  • दिवाळीबरोबरच संवत २०७८ची सुरूवात

Diwali Muhurat Trading 2021: मुंबई :  शेअर बाजारात (Stock Market)दिवाळीच्या दिवशी (Diwali) एक तासासाठी मुहुर्त ट्रेडिंगची परंपरा आहे. मुहुर्त ट्रेडिंग  (Diwali Muhurat)ही एक खास परंपरा शेअर बाजारात दिवाळीच्या काळात साजरी केली जाते. आज ट्रेडिंग सेशनची वेळ संध्या. ६:१५ वाजेपासून ते ७:१५ वाजेपर्यत होती. या दरम्यान शेअर बाजारात तेजीने सुरूवात झाली. शेवटी सेन्सेक्स २९५.७० अंशांनी वधारून ६०,०६७.६२ अंशांवर बंद झाला. निफ्टीमध्ये देखील तेजी नोंदवण्यात आली. निफ्टी ९१.८० अंशांनी वधारून १७,९२१ अंशांवर बंद झाला. (Diwali Muhurat Trading 2021: Sensex, Nifty shows surge, all sectors closed in green)

बाजारातील सुरूवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ३२३.९७ अंशांनी म्हणजे ०.५४ टक्के तेजीसह ६०,०९५.८९ अंशांच्या पातळीवर होता. तर निफ्टी १०१.३० अंशांनी वधारून ०.५७ टक्क्यांच्या तेजीसह १७,९३०.५० अंशांवर होता. 

मोठ्या कंपन्या केंद्रस्थानी

संवत २०७८च्या पहिल्या दिवशी महिंद्रा अॅंड महिंद्रा, आयटीसी, बजाज ऑटो, कोटक बॅंक, एल अॅंड टी, सन फार्मा, नेस्ले इंडिया, इंडसइंड बॅंक, टेक महिंद्रा, एचडीएफसी बॅंक, टायटन, पावर ग्रिड, एचसीएल टेक, रिलायन्स, एसबीआय, हिंदूस्थान युनिलिव्हर, एनटीपीसी, टीसीएस, इन्फोसिस, बजाज फिनसर्व्ह, मारुती, अॅक्सिस बॅंक, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, एचडीएफसी आणि टाटा स्टील या कंपन्यांचे शेअर वधारलेले दिसले. तर डॉक्टर रेड्डीज, एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट आणि आयसीआयसीआय बॅंकेच्या शेअरमध्ये मात्र घसरण झाली.

बाजार सुरू होण्याआधी सेन्सेक्समध्ये ५०० अंशांची वाढ

ब्लॉक डील सेशन संध्याकाळी ५:४५ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यत होते. तर प्री-ओपनिंग सेशन संध्या. ६:०० वाजेपर्यत सुरू झाले. प्री ओपनच्या काळात सेन्सेक्स ५७६.५८ अंशांच्या म्हणजे ०.९६ टक्के तेजीसह ६०,३४८.५० अंशाच्या पातळीवर पोचला. तर निफ्टी १२२ अंशांसह (०.६८ टक्के) वाढीसह १७,९५१.२० अंशावर व्यवहार करत होता.

काय असते मुहुर्त ट्रेडिंग (What is Muhurat Trading)

शेअर बाजारात दिवाळीच्या दिवशी एक नव्या वर्षाची सुरूवात होते. यावर्षी दिवाळीबरोबरच संवत २०७८ची सुरूवात झाली. दिवाळीच्या दिवशी शेअर बाजार बंद असतो. मात्र या दिवशी एका खास मुहुर्ताच्या वेळेस शेअर बाजार सुरू होतो. त्यावेळेस शेअर बाजारात गुंतवणुकदार विशेष शेअर ट्रेडिंग करतात.

गुंतवणुकदारांसाठी महत्त्वाचा असतो मुहुर्त ट्रेडिंग

मुहुर्त ट्रेडिंगचे गुंतवणुकदारांसाठी विशेष महत्त्व असते. कारण मुहुर्त ट्रेडिंग केल्याने संपूर्ण वर्षभर फायदा होतो असे गुंतवणुकदार किंवा ट्रेडर्स मानतात. बीएसईमध्ये याची सुरूवात १९५७ आणि एनएसईमध्ये याची सुरूवात १९९२ मध्ये झाली होती. अनेक लोक या खास सेशनमध्ये शेअर बाजारातील आपली पहिली गुंतवणूक करतात. 

कोरोना काळात लॉकडाउन लागू झाल्यानंतर गडगडलेला सेन्सेक्स वर्षभरात विक्रम करतो आहे. मागील वर्षभरात शेअर बाजाराने अभूतपूर्व तेजी दाखवली आहे. गुंतवणुकदारांनी यावर्षी तुफान कमाई केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी