वैशाली: एटीएम (ATM)च्या वापरामुळे लोकांच्या आर्थिक व्यवहारामध्ये मोठी सुलभता आली आहे. लोक पाहिजे तेव्हा पैसे काढू शकतात. बँकेत भल्यामोठ्या रांगेत ताटकळत उभे राहण्याची आता आवश्यकता नाही. पंरतू जेव्हा तुम्ही एटीएमवर काही ठराविक रक्कम काढण्यासाठी जाता आणि त्यावेळी एटीएममधून जर दुप्पट रक्कम निघत असेल तर? तुम्ही म्हणाल की असे होऊच शकत नाही. मात्र बिहारच्या वैशाली जिल्ह्यात असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. वैशाली जिल्ह्यातील बिदुपूर चाकसिंकदर भागात 'इंडिया नंबर वन एटीएममधून' दुप्पट पैसे निघण्याचा प्रकार घडला आहे.
बँकांव्यतिरिक्त अनेक ठिकाणी एटीएम सेंटर उभारण्यात आले आहेत. बँकामध्ये होणारी गर्दी टाळणे हा एटीएम सेंटर्स उभे करण्यामागील हेतू होता. मागील वीस वर्षात एटीएममुळे बॅकिंग व्यवस्थेत मोठा बदल दिसून आला. हाँगकाँन्ग अॅण्ड शांघाय बँकिंग कार्पोरेशन अर्थात एचसबीसी या बँकेने भारतात १९८७ साली मुंबईत पहिले एटीएम सुरु केले होते. आजघडीला भारतात एकूण २,३७,००० एटीएम मशीन्स आहेत.
आजुबाजुच्या परिसरात ही बातमी एखाद्या वणव्याप्रमाणे पसरली. काहीच वेळात पैसे काढण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. कोणी एक हजार रुपये काढण्यासाठी गेला तर त्या व्यक्तीला चक्क दोन हजार रुपये मिळू लागले होते. जसेही बँक अधिकाऱ्यांना या घटनेबाबत कळाले त्यांनी तात्काळ एटीएम कंपनीला सूचना दिली. एटीएम कंपनीने तात्काळ याची दखल घेत तेथे कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांना पाठवले. पोलिसांच्या मदतीने त्यांनी एटीएमचे शटर बंद करत लोकांना त्या ठिकाणावरुन पांगवले. शटर बंद करण्यापूर्वी या संधीचा अनेक लोकांनी फायदा घेतला होता. बँक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घडामोडीच्या वेळी या एटीएममधून जवळपास दीड ते दोन लाख रुपये काढण्यात आले. मात्र किती रक्कम या वेळात काढण्यात आली. हा संशोधनाचा विषय आहे.
ज्या वेळी एटीएममधून दुप्पट पैसे निघण्याचा सगळा प्रकार सुरु झाला त्यावेळी अनेक लोक या गोंधळाचा गैरफायदा घेऊ इच्छित होते. एटीएममधून पैसे काढते वेळी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर बाचाबाचीही झाली. या एटीएम मशीनची तपासणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, नेमक्या कोणत्या तांत्रिक कारणामुळे हा सगळा प्रकार घडला याची तपासणी करण्यासाठी या एटीएम मशीनचा डेटा कंपनीच्या मुंबईतील ऑफिसकडे पाठवण्यात आला आहे. कंपनीकडून आलेल्या डेटा कलेक्शनच्या आधारावर पैसे रिकव्हर करण्याचा निर्णय घेतला जाईल.
असेही बोलले जात आहे की, एटीएम मशीनमध्ये नोटा ठेवण्यासाठी असलेल्या कप्प्यामध्ये (ट्रे) चुकीच्या पध्दतीने नोटा ठेवण्यात आल्या तर अशा प्रकारची गडबड होऊन मशीनमध्ये मोठ्या प्रमाणावर अव्यवस्था निर्माण होऊ शकते. यापुर्वीही अनेकवेळा जास्तीचे पैसे एटीएम मधून बाहेर पडण्याचा प्रकार घडला आहे.