VIVO पाठोपाठ OPPO विरोधात कारवाई, ४३८९ कोटींच्या करचोरीचा सुरू झाला तपास

DRI detects customs duty evasion of Rs 4389 cr by Oppo India : प्राथमिक अंदाजानुसार ओप्पोने किमान ४३८९ कोटी रुपयांची कस्टम ड्युटी न भरता पैसे बनावट नोंदींच्या मदतीने चीनमध्ये पाठवले आहेत. या प्रकरणात तपास सुरू आहे. डीआरआय (Directorate of Revenue Intelligence - DRI) तपास करत आहे.

DRI detects customs duty evasion of Rs 4389 cr by Oppo India
VIVO पाठोपाठ OPPO विरोधात कारवाई, ४३८९ कोटींच्या करचोरीचा सुरू झाला तपास  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • VIVO पाठोपाठ OPPO विरोधात कारवाई, ४३८९ कोटींच्या करचोरीचा सुरू झाला तपास
  • विवोने चीनमध्ये ६२ हजार ४७६ कोटी रुपये बनावट नोंदी करून पाठवल्याचा आरोप, तपास सुरू
  • ओप्पोने किमान ४३८९ कोटी रुपयांची कस्टम ड्युटी न भरता पैसे बनावट नोंदींच्या मदतीने चीनमध्ये पाठवल्याचा आरोप, तपास सुरू

DRI detects customs duty evasion of Rs 4389 cr by Oppo India : चीनमधून भारतात येऊन मोठा नफा कमावणाऱ्या आणि कर न देता कागदोपत्री बनावट नोंदी दाखवून पैसा चीनमध्ये पाठवणाऱ्या कंपन्यांविरोधात भारत सरकारने कठोर कारवाई सुरू केली आहे. आधी विवो या स्मार्टफोन तयार करणाऱ्या कंपनीविरोधात भारत सरकारने कारवाई सुरू केली. आता ओप्पो विरोधातही भारत सरकारने करचोरीच्या प्रकरणात कारवाई सुरू केली आहे. प्राथमिक अंदाजानुसार ओप्पोने किमान ४३८९ कोटी रुपयांची कस्टम ड्युटी न भरता पैसे बनावट नोंदींच्या मदतीने चीनमध्ये पाठवले आहेत. या प्रकरणात तपास सुरू आहे. डीआरआय (Directorate of Revenue Intelligence - DRI) तपास करत आहे.

  1. आरोप : ओप्पो इंडिया कंपनीने त्यांच्या आयात केलेल्या वस्तूंविषयी अर्धवट आणि दिशाभूल करणारी माहिती दिली. या माहितीच्या आधारे कमी कर लागू झाला. कंपनीने कर चुकवेगिरी करून भारत सरकारची फसवणूक केली. 
  2. किती फायदा : ओप्पो इंडिया कंपनीने भारत सरकारला आयात केलेल्या वस्तूंविषयी अर्धवट आणि दिशाभूल करणारी माहिती पुरवून संबंधित वस्तूंवरचा २९८१ कोटींचा कर देणे टाळले. 
  3. आणखी एक आरोप : आयात करताना ओप्पो इंडिया कंपनी चीनमधील मूळ कंपनीला देत असलेल्या रॉयल्टी आणि लायसन्स फी विषयीची माहिती भारत सरकारपासून लपवत होती. या व्यवहारांची माहिती जाहीर केली असती तर नियमानुसार कंपनीला आणखी १४०८ कोटींचा कर लागू झाला असता. हा कर देणे कंपनीने टाळले.
  4. एकूण करचोरी : अर्धवट आणि दिशाभूल करणारी माहिती पुरवून ओप्पो इंडिया कंपनीने एकूण ४३८९ कोटी रुपयांचा कर भारत सरकारला देणे टाळले. या एवढ्या मोठ्या करचोरीच्या प्रकरणात तपास सुरू आहे. कस्टम ड्युटी १९६२च्या तरतुदींतर्गत कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. समाधानकारक स्पष्टीकरण दिले नाही तर कंपनीच्या कार्यालयांची तपासणी होईल. व्यवहारांशी संबंधित कागदपत्रांची तपासणी केली जाईल. 
  5. चीन आणि भारतातील ओप्पोवर कारवाई : ओप्पो इंडिया कंपनीच्या करचोरीच्या प्रकरणात चीनमधील ओप्पो कंपनीचीही हातमिळवणी आहे त्यामुळे ओप्पो इंडिया आणि चीनमधील मूळ कंपनी या दोघांविरोधात कायदेशीर कारवाईची तयारी भारतात सुरू आहे. 
  6. चीनमधील ओप्पो कंपनी : चीनमधील ओप्पो कंपनीची ओप्पो इंडिया ही भारतात कार्यरत असलेली एक सबसिडरी अर्थात उपकंपनी आहे. ओप्पोचे चीनमधील मुख्यालय ग्वांगडोंग येथे आहे. ओप्पो इंडिया ही कंपनी भारतात स्मार्टफोनची निर्मिती, जोडणी (जुळवाजुळव), घाऊक व्यापार, मोबाईल हँडसेट, अॅक्सेसरीज यात गुंतली आहे. भारतात ही कंपनी ओप्पो (OPPO), वन प्लस (ONEPLUS), रिअलमी (REALME) या ब्रँडेड उत्पादनांची निर्मिती आणि विक्री मोठ्या प्रमाणावर करते.
  7. विवो विरुद्धची कारवाई : अलिकडेच ईडीने विवो कंपनी विरोधात करचोरीची कारवाई सुरू केली आहे. विवो कंपनीने कर भरावा लागू नये म्हणून बनावट नोंदी दाखवून ६२ हजार ४७६ कोटी रुपये चीनमध्ये पाठवल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे. या प्रकरणात पुढील कारवाई सुरू आहे. विवोने केलेली करचोरी ही कंपनीच्या भारतातील एकूण जाहीर उत्पन्नाच्या ५० टक्के एवढी आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी