Elon Musk's offer to Twitter : न्यूयॉर्क : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk) नेहमीच ट्विटरचा वापर करत असतात. त्यांचे ट्विट सर्वांचेच लक्ष वेधून घेत असतात. आता मस्क महाशयांनी ट्विटर (Twitter)विकतच घेण्याची तयारी चालवली आहे. इलॉन मस्कने ट्विटरला तब्बल 41.39 अब्ज डॉलरची ऑफर (Musk offer to Twitter) दिली आहे. इलॉन मस्क ट्विटरचा मालकी हिस्सा विकत घेऊ इच्छितात आणि त्यासाठी त्यांनी ट्विटरला 54.20 डॉलर प्रति शेअरमध्ये खरेदी करण्याची ऑफर दिली आहे. गंमत म्हणजे या ऑफरची माहितीदेखील त्यांनी एक ट्विट करतच दिली आहे. इलॉन मस्कच्या या नव्या ऑफरमुळे जगातील अनेकांचे कान उंचावले आहेत. सोशल मीडियाच्या दुनियेतदेखील याचा जबरदस्त परिणाम होऊ शकतो. (Elon Musk gives $41.39 billion offer to buy Twitter, announces by a tweet)
इलॉन मस्क यांनी ज्या सोशल मीडिया कंपनीवर त्यांनी अनेकदा टीका केली आहे त्या ट्विटरमध्येच मोठे बदल करत त्याची मालकी खासगी होणे गरजेचे आहे असे मस्क यांना वाटते. ट्विटरचा मालकी हिस्सा विकत घेण्यासाठी मस्क यांनी प्रति शेअर 54.20 डॉलरची ऑफर ट्विटरला दिली आहे. ही रक्कम 1 एप्रिलला बाजार बंद होताना ट्विटरच्या शेअरची जी किंमत होती त्याच्या 38 टक्के प्रिमियमवर आहे. विशेष म्हणजे याच्या एकच दिवस आधी इलॉन मस्क यांनी ट्विटरचा 9 टक्के हिस्सा विकत घेतल्याचे जाहीर केले होते. समोर आलेल्या माहितीनुसार या एकूण व्यवहाराची किंमत शिल्लक 76.358 कोटी शेअर्सच्या संख्येवरून काढण्यात आली आहे.
मस्कने या आठवड्याच्या सुरूवातीस कंपनीतील आपली हिस्सेदारी उघड केल्यानंतर ट्विटरच्या बोर्डात सामील होण्याची ऑफर नाकारली होती. विश्लेषकांच्या मते ट्विटरच्या संचालक मंडळात स्थान स्विकारल्यास मस्क यांना कंपनीचा जास्तीत जास्त 15 टक्के हिस्साच विकत घेता आला असता. परिणामी मस्क यांनी ट्विटरची मालकी मिळवता आली नसती.
अधिक वाचा : PPF investment limit : पीपीएफमधील करमुक्त गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्याचा केंद्राचा विचार
"माझी गुंतवणूक केल्यापासून मला आता समजले आहे की कंपनी सध्याच्या स्वरूपात कंपनीची भरभराट होणार नाही किंवा कंपनी सामाजिक गरजांची पूर्ततादेखील करू शकणार नाही. त्यामुळेच ट्विटरला खाजगी कंपनी म्हणून बदलण्याची गरज आहे," असे मस्क यांनी ट्विटरचे अध्यक्ष ब्रेट टेलर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. "ही माझी सर्वोत्कृष्ट ऑफर आहे आणि ही अंतिम ऑफर आहे. ती स्वीकारली गेली नाही, तर मला शेअरहोल्डर म्हणून माझ्या स्थितीवर पुनर्विचार करावा लागेल," असा एक प्रकारे मस्क यांनी ट्विटरला इशाराच दिला आहे. ट्विटरने टिप्पणीसाठी वृत्तसंस्थेच्या विनंतीला प्रतिसाद दिला नाही.
2009 मध्ये ट्विटरवर खाते सुरू केल्यापासून इलॉन मस्कने 8 कोटीहून जास्त फॉलोअर्स जोडले आहेत. आपल्या ट्विटर हॅंडलचा वापर इलॉन मस्क अत्यंत खूबीने आणि धूर्तपणे अनेक मोठ्या घोषणा करण्यासाठी केला आहे. यात टेस्लाच्या खासगी मालकीच्या घोषणेचाही समावेश आहे ज्यावर वादळ निर्माण झाले होते. ट्विटरला इलॉन मस्क यांनी दिलेल्या ऑफरसाठी त्यांचे आर्थिक सल्लागार हे मॉर्गन स्टॅनले असल्याचे मस्क यांनी म्हटले आहे.