Elon Musk ने विकले ७ अब्ज डॉलर मूल्याचे टेस्लाचे शेअर

Elon Musk | काही दिवसांपूर्वीच इलॉन मस्क यांनी ट्विट करत म्हटले होते की जर सोशल मीडियावरील युजर्सनी मस्क यांना टेस्लाचे १० टक्के शेअर विकण्याचे सांगितले तर ते शेअर विक्री करतील. यासाठी इलॉन मस्क यांनी ट्विटरवर एक पोल देखील घेतला होता. त्यात बहुसंख्य लोकांनी मस्क यांनी टेस्लाचे १० टक्के शेअर विकावेत असे म्हटले होते. मस्क यांच्या मालकीच्या टेस्लाचे १० टक्के शेअर म्हणजे १.७ कोटी शेअर आहेत.

Elon Musk sold Tesla Shares
इलॉन मस्क यांच्याकडून टेस्लाच्या शेअरची विक्री 
थोडं पण कामाचं
  • इलॉन मस्क यांच्याकडून आपल्या मालकी हक्काचे जवळपास ६.९ अब्ज डॉलर मूल्याच्या टेस्ला शेअरची विक्री
  • टेस्लाचे एकूण समभाग भांडवल १ ट्रिलियन डॉलरवर
  • सोशल मीडियावर मस्क यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की ते टेस्लाच्या शेअरची विक्री करतील

Elon Musk | न्यूयॉर्क : टेस्लाचे (Tesla) सीईओ आणि मालक इलॉन मस्क (Elon Musk)यांनी कंपनीतील आपल्या मालकी हक्काचे जवळपास ६.९ अब्ज डॉलर मूल्याचे शेअर विकले आहेत. टेस्लाच्या शेअरमध्ये मागील काही दिवसात जबरदस्त तेजी येत कंपनीचे समभाग भांडवल १ ट्रिलियन डॉलरवर पोचले आहे. टेस्लाच्या शेअरमधील तेजीचा लाभ घेत मस्क यांनी शेअर विक्री केली आहे. शुक्रवारी मस्क यांच्या ट्रस्टकडे असलेल्या टेस्लाच्या १२ लाख शेअरची विक्री करण्यात आली होती. त्याचे मूल्य १.२ अब्ज डॉलर आहे. इलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (World's Richest Person)आहेत आणि टेस्लाचे सर्वात मोठे शेअरधारक आहेत. (Elon Musk sold Tesla shares of worth $7 bn this week)

मस्क यांचे ट्विट

याआधी काही दिवसांपूर्वीच इलॉन मस्क यांनी ट्विट करत म्हटले होते की जर सोशल मीडियावरील युजर्सनी मस्क यांना टेस्लाचे १० टक्के शेअर विकण्याचे सांगितले तर ते शेअर विक्री करतील. यासाठी इलॉन मस्क यांनी ट्विटरवर एक पोल देखील घेतला होता. त्यात बहुसंख्य लोकांनी मस्क यांनी टेस्लाचे १० टक्के शेअर विकावेत असे म्हटले होते. मस्क यांच्या मालकीच्या टेस्लाचे १० टक्के शेअर म्हणजे १.७ कोटी शेअर आहेत. 

मस्ककडून पहिल्यांदाच शेअर विक्री

इलॉन मस्क यांनी या आठवड्यात टेस्लाचे ६०.३६ लाख शेअर विकले आहेत. १.७ कोटी शेअरपैकी हे जवळपास ३७ टक्के शेअर आहेत. एकूण १० टक्के शेअरची विक्री करण्यासाठी मस्क यांनी आणखी १ कोटी शेअरची विक्री करावी लागणार आहे. यानंतर त्यांच्या मालकीच्या १० टक्के शेअरची विक्री झालेली असेल. टेस्लाच्या शेअरची किंमत शुक्रवारी २.८ टक्क्यांनी घसरून १,०३३.४२ डॉलरवर आली होती. यावर्षी टेस्लाच्या शेअरमध्ये मोठी तेजी आली आहे. ऑक्टोबर महिन्यात टेस्लाच्या शेअरच्या किंमतीत चांगलीच वाढ झाली होती. यावर्षी आतापर्यत टेस्लाच्या शेअरने ४६ टक्क्यांची तेजी नोंदवली आहे. २००३ मध्ये टेस्लाची स्थापना झाल्यापासून मस्क यांनी पहिल्यांदाच टेस्लाच्या शेअरची विक्री केली आहे. मस्क यांनी विक्री केलेल्या शेअरची संख्या आणि मूल्य खूपच जास्त आहे.

टेस्ला आहे सर्वात मूल्यवान ऑटोमोबाईल कंपनी

टेस्लाच्या शेअरमध्ये  या आठवड्यात १५.४ टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे कंपनीच्या बाजारमूल्यात १८७ अब्ज डॉलची घट झाली आहे. तरीदेखील टेस्ला ही जगातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेली ऑटोमोबाईल कंपनी आहे. टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारला असलेल्या मागणीमुळे कंपनीच्या शेअरच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. रिव्हियन ऑटोमोटिव्ह ही अमेरिकेतील शेअर बाजारात नुकताच नोंदणी झालेली ऑटोमोबाइल कंपनी आहे. 

मस्क यांची शेअर विक्री सुरू राहणार

यावर्षी टेस्लाच्या शेअरची विक्री करण्याचे संकेत याआधीच इलॉन मस्क यांनी दिले होते. अमेरिकेत श्रीमंतांवर कर लावण्याच्या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर मस्क यांनी ही भूमिका घेतली आहे. शेअरची विक्री केल्याने कर भरण्यासाठी मस्क यांच्याकडे रोकड उपलब्ध होणार आहे. सध्याची शेअर विक्री करण्याआधी मस्क यांच्याकडे टेस्लाचे २३ टक्के शेअर होते. आगामी काळात मस्क टेस्लाच्या आणखी शेअरची विक्री करण्याची चिन्हे आहेत.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी