जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या Elon Musk चा विक्रम, एकाच दिवसात कमावले २.७१ लाख कोटी

टेस्ला कंपनीच्या शेअरच्या किंमतीत १४.९ टक्क्यांची वाढ होत तो १,०४५.०२ डॉलरवर पोचला आहे. शेअरच्या किंमतीत आलेल्या तेजीमुळे इलॉन मस्क यांच्या संपत्तीत एकदम वाढ झाली आहे.

Net Worth of Elon Musk
इलॉन मस्क यांची एकूण संपत्ती 
थोडं पण कामाचं
  • इलॉन मस्क यांच्या संपत्तीत एकाच दिवसात २.७१ लाख कोटी रुपयांची भर
  • मस्क यांची संपत्ती आता २८९ अब्ज डॉलर
  • टेस्लाच्या एकूण बाजारमूल्यात म्हणजे समभाग भांडवलाने १ लाख कोटी डॉलरचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली: टेस्लाचे (Tesla)मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलॉन मस्कने  (Elon Musk)नवा विक्रम केला आहे. एरवी सतत चर्चेत असणाऱ्या इलॉन मस्क यांच्या संपत्तीत एकाच दिवसात २.७१ लाख कोटी रुपयांची (३६.२ अब्ज डॉलर) भर पडली आहे. कोणत्याही व्यक्तीच्या संपत्तीत एकाच दिवसात वाढ झालेली ही सर्वाधिक रक्कम आहे. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार (Bloomberg Billionaires Index)मस्क यांची संपत्ती आता २८९ अब्ज डॉलर इतकी झाली आहे. सोमवारी इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी असलेल्या टेस्लाच्या एकूण बाजारमूल्यात म्हणजे समभाग भांडवलाने १ लाख कोटी डॉलरचा टप्पा ओलांडला. हा टप्पा गाठणारी टेस्ला अमेरिकेची सहावी कंपनी आहे. कंपनीच्या शेअरच्या किंमतीत १४.९ टक्क्यांची वाढ होत तो १,०४५.०२ डॉलरवर पोचला आहे. शेअरच्या किंमतीत आलेल्या तेजीमुळे इलॉन मस्क यांच्या संपत्तीत एकदम वाढ झाली आहे. (World's richest man Elon Musk makes history by gaining Rs 2.71 Lakhs crores in a single day)

१ लाख कारची मिळाली ऑर्डर

हर्टज ग्लोबल होल्डिंग्सने १ लाख टेस्ला कारची ऑर्डर दिली आहे. १ लाख कारची ऑर्डर मिळाल्यानंतर टेस्लाच्या शेअरच्या किंमतीत जबरदस्त तेजी आली आहे. टेस्लामध्ये इलॉन मस्क यांचा २३ टक्के मालकी हिस्सा आहे. शेअरच्या किंमतीत आलेल्या तेजीमध्ये इलॉन मस्क यांची संपत्ती २.७१ लाख कोटी रुपयांनी वाढली आहे. याशिवाय इलॉन मस्क स्पेसएक्स या कंपनीचे मालक आहेत. जाणकारांनुसार या कंपनीचे मूल्य १०० अब्ज डॉलर आहे. २०२१ मध्ये इलॉन मस्क यांच्या संपत्तीत ११९ अब्ज डॉलरची जबरदस्त वाढ झाली आहे. मस्क यांची एकूण संपत्ती २८९ अब्ज डॉलर आहे. एक्झॉन मोबिल कॉर्प किंवा नाइके इन्कॉर्पोरेशनच्या बाजारमूल्यापेक्षा ही रक्कम जास्त आहे.

अमेरिकन ट्रिलियन डॉलर कंपन्या

ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सच्या आकडेवारीनुसार एकाच दिवसात एखाद्या व्यक्तीने कमावलेली ही सर्वाधिक रक्कम आहे. मागील वर्षी चीनी अब्जाधीश झोंग शानशान यांच्या संपत्तीत ३२ अब्ज डॉलरची वाढ झाली होती. शानशान यांची मिनरल वॉटर कंपनी असलेल्या नोंग्फू स्प्रिंग कंपनीची शेअर बाजारात नोंदणी झाली होती. टेस्ला ट्रिलियन डॉलर कंपन्यांच्या यादीत समाविष्ट होणारी पहिली कार कंपनी आहे. अॅपल, अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि अल्फाबेट या कंपन्यांचे बाजारमूल्य ट्रिलियन डॉलरच्या वर आहे. 

फेसबुकदेखील ट्रिलियन डॉलरच्या टप्प्यावर वेगाने पोचली आहे. अर्थात अद्याप फेसबुकचे समभाग भांडवल १ ट्रिलियन डॉलरच्या खाली आहे कारण मागील दोन महिन्यांत फेसबुकच्या शेअरच्या किंमतीत घसरण झाली आहे. इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनात आणि इलेक्ट्रिक कारच्या बाजारपेठेत इलॉन मस्क यांच्या टेस्लाने जबरदस्त आघाडी घेतली आहे. मागील काही वर्षांपासून टेस्लाची जोरदार घोडदौड सुरू आहे. मस्क यांच्या स्पेसएक्सने देखील अंतराळ व्यवसायात आघाडी घेतली आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी