'ईपीएफओ'ने बदलला हा नियम, ६ कोटी नोकरदारांवर थेट परिणाम, लगेच अपडेट करा तुमचे पीएफ खाते

ईपीएफओने नोकरदारांच्या पीएफ खात्याच्या (PF account) युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजे युएएनला (UAN)आधार कार्डशी (Aadhar Card)लिंक करणे बंधनकारक केले आहे. इलेक्ट्रॉनिक चलन कम रिटर्न फायलिंग प्रोटोकॉलमध्ये बदल.

EPFO changes Electronic Challan cum Return
युएएन आधार कार्डशी लिंक करणे बंधनकारक 

थोडं पण कामाचं

  • ईपीएफओने केला पीएफ खात्याशी संबंधित नियमात बदल
  • युएएनला आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक
  • इलेक्ट्रॉनिक चलन कम रिटर्न फायलिंग प्रोटोकॉल मध्ये बदल

नवी दिल्ली : ईपीएफओ ६ कोटी खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने म्हणजेच ईपीएफओने (EPFO) एका नियमात बदल केला आहे. यामुळे नोकरदारांसमोर अडचण येऊ शकते. ईपीएफओने नोकरदारांच्या पीएफ खात्याच्या (PF account) युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजे युएएनला (UAN)आधार कार्डशी (Aadhar Card)लिंक करणे बंधनकारक केले आहे. यासाठी ईपीएफओच्या सोशल सिक्युरिटी कोड २०२० च्या कलम १४२ मध्ये (EPFO, Social Security code 2020, Section 142 ) बदल करण्यात आला आहे. यामुळे इलेक्ट्रॉनिक चलन कम रिटर्न फायलिंग प्रोटोकॉल (Electronic Challan cum Return) (ECR) बदलला आहे. ईपीएफओने अलीकडेच ट्विट करून सांगितले आहे की एम्प्लॉयर म्हणजे कंपन्या १ जून २०२१ नंतर त्याच कर्मचाऱ्याचे ईसीआर फाइल करू शकतील ज्याचा युएएन आधारशी लिंक असेल. ज्यांचे आधार कार्ड युएएनशी लिंक नसेल त्यांचा ईसीआर स्वतंत्रपणे भरला जाईल. त्यानंतर ते कर्मचारी किंवा नोकरदार युएएनला आधार कार्डशी लिंक करू शकतात. मात्र सर्वच नोकरदारांना हे तत्परतेने करावे लागेल. (PF Account : EPFO changes important rule, Link your PF account with UAN immediately)

नियमातील बदलामुळे काय होणार ?

जर एखाद्या नोकरदाराचे किंवा कर्मचाऱ्याचे पीएफ खाते आधार कार्डशी जोडलेले नसेल किंवा लिंक केलेले नसेल तर त्या कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात तो काम करत असलेल्या कंपनी किंवा आस्थापनाकडून जमा करण्यात पीएफ योगदानाला ईपीएफओ थांबवू शकते. कंपनीचे तुमच्या पीएफ खात्यातील योगदान तेव्हाच सुरू होईल जेव्हा तुमचे पीएफ खाते आधारशी लिंक असेल. त्यामुळेच जर तुम्ही पीएफ खात्याला आधार नंबर दिलेला नाही किंवा लिंक केलेला नसल्यास हे काम तात्काळ पूर्ण करा.

१२ लाख नवी पीएफ खाती

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO)जाहीर केलेल्या नव्या आकडेवारीनुसार यावर्षी मार्च महिन्यात ईपीएफओशी १२.२४ लाख नवे सदस्य जोडले गेले आहेत. फेब्रुवारीमध्ये ईपीएफओशी ११.७७ लाख नवे कर्मचारी जोडले गेले होते. अर्थात मागील आर्थिक वर्षात ईएसआयसीशी जोडले जाणाऱ्यांच्या संख्येत २४ टक्के घट झाली आहे. याच कालावधीत ईएसआयसीच्या योजनांशी १.१५ कोटी नवे कर्मचारी जोडले गेले आहेत. २०१९-२० या आर्थिक वर्षात त्यांची संख्या १.५० कोटी इतकी होती.

कसे करायचे पीएफ खाते अपडेट

कर्मचारी किंवा नोकरदारांचे आधार कार्ड पीएफ खात्याशी किंवा युएएनशी लिंक करण्याची जबाबदारी तो नोकरी करत असलेल्या कंपनी किंवा आस्थापनाची असते. ईपीएफओने यासंदर्भात अनेक सूचना दिल्या आहेत. आधार लिंक नसल्यास कर्मचाऱ्याला पीएफ खात्यात तीच रक्कम दिसेल जी त्याच्या वेतन आणि महागाई भत्त्याद्वारे येते.

सोपे आहे आधार लिकिंग-

  1. पीएफ खाते किंवा युएएन आधार कार्डशी जोडण्यासाठी epfindia.gov.in या वेबसाईटवर जा.
  2. त्यानंतर ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये ई-केवायसी पोर्टलवर क्लिक करा
  3. आता आधार नंबर नोंदवा. त्यानंतर मोबाईल नंबर द्या. तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल.
  4. पुन्हा एकदा आधार नंबर भरावा लागेल. आता ओटीपी व्हेरिफिकेशन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  5. तीन वेळा ओटीपी, आधार नंबर आणि मोबाईल नंबर नोंदवल्यानंतंर तुमच्या पीएफ खात्याशी तुमचा आधार नंबर लिंक होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी