फास्टॅग : जर तुमच्याही मनात प्रश्न असतील, तर मग हे वाचा

काम-धंदा
Updated Apr 07, 2021 | 15:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

तुमच्या गाडीत फॅस्टॅग आहे का? हा वापरात असतानादेखील मनात अनेक प्रश्न आहेत...

What is Fastag & how it operates?
फास्टॅगसंदर्भातील तुमच्या शंकांचे निरसन 

थोडं पण कामाचं

  • फास्टॅग हे एक इलेक्ट्रॉनिक टोल वसूल करण्याचे तंत्रज्ञान
  • हे अतिशय सुरक्षित तंत्रज्ञान आहे.
  • तुमच्या बॅंक खात्यातून आपोआप टोलची रक्कम वजा केली जाते

नवी दिल्ली : कारने प्रवास करताना फास्टॅग लावणे आता सर्वांनाच बंधनकारक झाले आहे. टोल नाक्यावर कॅशने टोल जमा करण्याऐवजी आता गाडीच्या समोरच्या काचेवर लावलेला फास्टॅग हा टोल वसूलीचे साधन झाला आहे. मात्र या फास्टॅगसंदर्भात सर्वसामान्यांच्या मनात अजूनही अनेक प्रश्न आहेत. उदाहरणार्थ फास्टॅगचे रिचार्ज कसे करावे आणि जर गाडीवर फास्टॅग नसल्यास काय होईल?

काय आहे फास्टॅग?


फास्टॅग हे एक इलेक्ट्रॉनिक टोल वसूल करण्याचे तंत्रज्ञान आहे. अनेक ठिकाणी विशेषत: राष्ट्रीय महामार्गांवर टोल प्लाझा येथे टोल गोळा करण्यासाठी याचा वापर केला जातो. टोल प्लाझावर लावलेले सेन्सर तुमच्या गाडीवरील फास्टॅग स्कॅन करतात आणि तुमच्या बॅंक खात्यातून ठराविक रक्कम वळती केली जाते. या उपकरणात रेडिओ, फ्रिक्वेन्सी आयडेटिंफिकेशन टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. हे अतिशय सुरक्षित तंत्रज्ञान आहे.

फास्टॅगचा वापर का सुरू झाला?


दिवसेंदिवस रस्त्यावर वाहनांच्या संख्येत मोठी वाढ होते आहे. त्यामुळे महामार्गांवरील टोल प्लाझावर प्रत्यक्षरित्या कॅशद्वारे टोलची वसूली करणे हे अवघड होत चालले होते. शिवाय यामुळे टोल प्लाझावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. त्यामुळे रस्त्यांवरील वाहनांचे नियमन करण्यासाठी आणि टोल वसूली सोपी करण्यासाठी फास्टॅगसारख्या तंत्रज्ञानाची आवश्यकता होती.

कुठे मिळतो फास्टॅग?


तुम्ही पेटीएम किंवा तुमच्या बॅंकेशी संपर्क केल्यास तुम्हाला घरबसल्या तुमचा फास्टॅग मिळू शकतो. याशिवाय तुम्ही कोणत्याही टोल प्लाझावर तुमच्या आरसी आणि मोबाईल नंबरच्या आधारे फास्टॅग मिळवू शकता. फास्टॅग घेतल्याबरोबर लगेचच वापरात आणता येतो.

फास्टॅग रिचार्ज कसा करावा?


तुमचा फास्टॅग रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही. फास्टॅगला मोबाईलप्रमाणे रिचार्ज करण्याची आवश्यकता नसते. तुमचा फास्टॅग तुमच्या बॅंक खात्याशी थेट जोडलेला असतो. त्यामुळे तुम्ही जितक्या वेळा टोल प्लाझा ओलांडता तितक्या वेळा तुमच्या बॅंक खात्यातून आपोआप टोलची रक्कम वजा केली जाते. याशिवाय तुम्हाला जर तुमचा फास्टॅग पेटीएम किंवा गुगलपे द्वारे रिचार्ज करायचा असेल तर तुमच्या वॉलेटमध्ये बॅलन्स असला पाहिजे, अन्यथा तुमचे कार्ड उपयोगात येणार नाही.

एका वाहनावर किती फास्टॅग वापरता येतात?


एका वाहनासाठी एकच फास्टॅग असतो. काही नागरिकांना असे वाटते की एका वाहनावर फास्टॅग घेऊन तो इतर वाहनांवर वापरता येईल. मात्र असे करता येणे शक्य नाही. कारण तुमच्या वाहनाचा क्रमांक तुमच्या डिजिटल डेटामध्ये नोंदवलेला असतो. तुम्ही जेव्हा टोल प्लाझावर असता तेव्हा तुमची ही माहिती तपासली जाते. त्यामुळे एका वाहनासाठी एकच फास्टॅग वापरावा लागतो. जर तुम्हाला फास्टॅग हरवला तर तुम्ही दुसरा फास्टॅग घेऊ शकता. मात्र जसा तुम्ही नवीन फास्टॅग घेतला तसा तुमचा आधीचा फास्टॅग आपोआपच रद्द होतो आणि त्याचा वापर तुम्हाला करता येत नाही.

फास्टॅग नसल्यास


जर तुमच्या वाहनावर फास्टॅग नसेल तुमच्याकडून मोठा दंड वसूल करण्यात येईल. त्यामुळे महामार्गावर जाताना किंवा टोल प्लाझावरून जाताना तुमच्या वाहनावर फास्टॅग असल्याची खात्री करून घ्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी