Financial Planning Tips | आर्थिक स्थैर्यासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महत्त्वाच्या ५ टिप्स...

Financial Planning Tips | तरुण वयात किंवा अगदी करीयरच्या सुरूवातीच्या काळात आर्थिक नियोजन केल्यास त्याचा फायदा उर्वरित आयुष्यात होतो. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी (Financial Freedom) आणि संपत्ती निर्मितीसाठी (Wealth creation)आर्थिक नियोजन करणे अत्यावश्यक आहे.

Financial Planning Tips
आर्थिक नियोजनाची सूत्रे 
थोडं पण कामाचं
  • श्रीमंत व्हायचे असेल तर त्याची सुरूवात आर्थिक नियोजनापासूनच होते
  • प्रत्येक व्यक्तीचे आर्थिक नियोजन वेगवेगळे
  • करियरच्या सुरूवातीच्या काळातच आर्थिक नियोजन आखणे महत्त्वाचे

Financial Planning | मुंबई: आर्थिक नियोजनाशिवाय आर्थिक स्थैर्य, सुबत्ता आणि श्रीमंती या गोष्टी शक्य नाहीत. श्रीमंत व्हायचे असेल तर त्याची सुरूवात आर्थिक नियोजनापासूनच होते. नियोजन हे कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते. आर्थिकदृष्ट्या चिंतामुक्त होण्यासाठी आर्थिक नियोजन (Financial Planning) तितकेच महत्त्वाचे ठरते. किंबहुना आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी (Financial Freedom) आणि संपत्ती निर्मितीसाठी (Wealth creation)आर्थिक नियोजन करणे अत्यावश्यक आहे.  अर्थात प्रत्येक व्यक्तीचे आर्थिक नियोजन वेगवेगळे असते. तरुण वयात किंवा अगदी करीयरच्या सुरूवातीच्या काळात आर्थिक नियोजन केल्यास त्याचा फायदा उर्वरित आयुष्यात होतो. तरुणांनी त्यामुळे त्यांच्या करियरच्या सुरूवातीच्या काळातच आर्थिक नियोजन आखणे महत्त्वाचे ठरते. योग्यरित्या आर्थिक नियोजन करण्यासाठी काही बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. (Financial Planning : Key Points to be considered while doing Financial Planning to become rich)

आर्थिक नियोजन करताना लक्षात घ्यावयाची ५ महत्त्वाची सूत्रे किंवा ५ टिप्स -

१.  तुमची आर्थिक उद्दिष्टे ठरवा

आर्थिक नियोजनातील हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. भविष्यातील आपल्या गरजा आणि अपेक्षा काय आहेत? प्रत्येकाने त्याचे  अल्पकालीन आणि दीर्घकालीन भविष्य काय असेल आणि त्या पातळीवर पोहोचण्यासाठी त्यांनी काय केले पाहिजे याची कल्पना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन आर्थिक गरजांवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. आपल्या या आर्थिक उद्दिष्टांनुसार विविध गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक केली पाहिजे.

२.  आयुर्विमा आणि आरोग्यविमा

आयुर्विमा आणि आरोग्यविमा याशिवाय तुमचे आर्थिक नियोजन पूर्णच होऊ शकणार नाही. योग्य वेळीच विमा (आयुर्विमा आणि आरोग्यविमा)घेणे आवश्यक आहे.  त्यासाठी काही प्रमाणात पैशांची बचत करणे प्रत्येकासाठी  महत्वाचे आहे. ग्राहकांच्या वाढत्या गरजा भागविण्यासाठी विविध प्रकारच्या विमा योजना बाजारात उपलब्ध आहेत. प्रत्येकाने काळजीपूर्वक आपल्यासाठी योग्य असलेली विमा पॉलिसी निवडली पाहिजे. वेळप्रसंगी या क्षेत्रातील जाणकारांचे मार्गदर्शन घ्यावे.

३. गुंतवणूकीचा पोर्टफोलिओ तयार करा

विमा, बचत आणि उत्पन्नाची काळजी घेण्याव्यतिरिक्त प्रत्येकाने गुंतवणूकींवरही विचार केला पाहिजे. यात म्युच्युअल फंड, बॅंकेतील किंवा पोस्टातील मुदतठेवी, सोने, रिअल इस्टेट, करबचतीसाठीच्या विविध योजना इत्यादींचा उल्लेख करता येईल. यामध्ये गुंतवणूक करताना सल्लागारासोबत काळजी पूर्वक योजना आखली पाहिजे.

४.  आर्थिक सल्लागाराचे मार्गदर्शन घ्या

तज्ज्ञाचे महत्त्व जसे इतर क्षेत्रात असते तसेच ते आर्थिक क्षेत्रातदेखील असते. बर्‍याच वेळा सर्वसामान्य नागरिक गोंधळात पडतात आणि विविध आर्थिक निर्णयाबद्दल घाबरतात. आपण गुंतवणूक करू नये किंवा गुंतवणूक करावी का? आपण गृह कर्ज घ्यावे का? करबचत कशी करावी? कोणत्या गुंतवणूक करावी ? नेमकी कोणती विमा पॉलिसी घ्यावी? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात असतात. यासाठीच आर्थिक सल्लागार नेमणे खूप महत्त्वाचे ठरते. आर्थिक सल्लागारकडून अशा प्रश्नांची उत्तरे मिळतात आणि पुढील मार्ग सुकर होतो.

५. प्राप्तिकराचे नियोजन 

भारतातील प्रत्येक नोकरदार, व्यावसायिकाने उत्पन्नाचे रक्षण करण्यासाठी प्रभावी कर नियोजन केले पाहिजे. ते गृह कर्ज घेऊ शकतात, विमा पॉलिसी किंवा बाँडमध्ये गुंतवणूक करू शकतात किंवा मालमत्ता भाड्याने देऊ शकतात. हा निर्णय चर्चा करून, मार्गदर्शन घेऊन घेतला पाहिजे. विविध करबचत करणाऱ्या गुंतवणूक प्रकारात पैसे गुंतवले पाहिजे. करवजावटीच्या सवलतींचा पूर्ण लाभ घेतला पाहिजे.

आर्थिक नियोजनाची सुरूवात अगदी तरुण वयातच केली पाहिजे. त्यामुळे तुम्हाला आर्थिक शिस्त लाभेल आणि श्रीमंत होण्याचा तुमचा मार्ग मोकळा होईल. यातून तुम्हाला आर्थिक स्थैर्याबरोबरच आर्थिक स्वातंत्र्यदेखील मिळेल. येईल. तुमच्या भविष्यातील आर्थिक गरजांची पूर्तता करणे तितकेच सुलभ आणि सोपे होईल. तुम्ही तणावमुक्त आणि बिनधास्तपणे जगू शकाल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी