Financial Planning to get Rich | मुंबई: आर्थिक बाबींमुळे येणारे टेन्शन प्रत्येकालाच सहन करावे लागते. मात्त यातून सुटका करून घेण्यासाठी फक्त उत्पन्न वाढून उपयोगाचे नाही तर योग्य आर्थिक नियोजन करणे हेच महत्त्वाचे आहे. आर्थिक नियोजन करणे ही श्रीमंत (Rich)होण्याच्या मार्गातील पहिली पायरी आहे. आर्थिक बाबींमध्ये नियोजन (Financial Planning) तितकेच महत्त्वाचे ठरते. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, संपत्ती निर्मितीसाठी (Wealth creation)आर्थिक नियोजन करणे अत्यावश्यक आहे. हे नियोजन करण्यासाठी वेगवेगळ्या मानसिक आणि वर्तनात्मक बाबींचा सावध विचार आवश्यक असतो. प्रत्येक व्यक्तीचे आर्थिक नियोजन वेगवेगळे असू शकते किंवा ते तसे असतेच. तरुण वयात किंवा अगदी करीयरच्या सुरूवातीच्या काळातच काळजीपूर्वक आर्थिक नियोजन करण्याची गरज आहे. आर्थिक नियोजन करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या ते पाहूया (Financial Planning Tips : How to do Financial Planning to become rich)
योग्य आर्थिक नियोजनापासून सुरुवात करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने त्यांच्या दरमहिन्याच्या उत्पन्नाचे आणि खर्चाचे अचूक आकलन करणे गरजेचे आहे. यामुळे सद्य आर्थिक परिस्थिती संदर्भात अंदाज बांधण्यास मदत होईल व यावर पुढील नियोजन ठरविता येईल.
आयुर्विमा आणि आरोग्यविमा याशिवाय तुमचे आर्थिक नियोजन पूर्णच होऊ शकणार नाही. योग्य वेळीच विमा (आयुर्विमा आणि आरोग्यविमा)घेणे आवश्यक आहे. त्यासाठी काही प्रमाणात पैशांची बचत करणे प्रत्येकासाठी महत्वाचे आहे. ग्राहकांच्या वाढत्या गरजा भागविण्यासाठी विविध प्रकारच्या विमा योजना बाजारात उपलब्ध आहेत. प्रत्येकाने काळजीपूर्वक आपल्यासाठी योग्य असलेली विमा पॉलिसी निवडली पाहिजे. वेळप्रसंगी या क्षेत्रातील जाणकारांचे मार्गदर्शन घ्यावे.
विमा, बचत आणि उत्पन्नाची काळजी घेण्याव्यतिरिक्त प्रत्येकाने गुंतवणूकींवरही विचार केला पाहिजे. यात म्युच्युअल फंड, बॅंकेतील किंवा पोस्टातील मुदतठेवी, सोने, रिअल इस्टेट, करबचतीसाठीच्या विविध योजना इत्यादींचा उल्लेख करता येईल. यामध्ये गुंतवणूक करताना सल्लागारासोबत काळजी पूर्वक योजना आखली पाहिजे. विविध करबचत करणाऱ्या गुंतवणूक प्रकारात पैसे गुंतवले पाहिजे. करवजावटीच्या सवलतींचा पूर्ण लाभ घेतला पाहिजे.
आर्थिक नियोजनातील हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. भविष्यातील आपल्या गरजा आणि अपेक्षा काय आहेत? प्रत्येकाने त्याचे अल्पकालीन आणि दीर्घकालीन भविष्य काय असेल आणि त्या पातळीवर पोहोचण्यासाठी त्यांनी काय केले पाहिजे याची कल्पना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन आर्थिक गरजांवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. आपल्या या आर्थिक उद्दिष्टांनुसार विविध गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक केली पाहिजे.
ज्या दिवशी तुम्ही पहिली कमाई कराल त्याच दिवसापासून नियोजनाचा संबंध सुरू होतो. जितक्या तरुण वयात आर्थिक नियोजन कराल तितके लवकर आर्थिक स्थैर्य मिळेल. निवृत्तीनंतरचे जीवन तितकेच चिंतामुक्त असेल. आर्थिक नियोजनातूनच श्रीमंती आणि आर्थिक स्थिरता येईल. यातूनच तुम्हाला जगण्याचे आणि निर्णय स्वातंत्र्य मिळेल. संपत्ती निर्माण करताना किंवा श्रीमंत होताना नियोजनाची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. यात आर्थिक बाबींच्या सर्व पैलूंचा विचार केला जातो आणि त्यातूनच भक्कम आर्थिक स्थितीची पायाभरणी केली जाते.