Importance of Life Insurance & Health Insurance | आयुर्विमा आणि आरोग्यविमा का घ्यावा?...किती रकमेचा घ्यावा?

Life Insurance & Health Insurance | विम्याबद्दलचे अज्ञान, विम्याच संकल्पना नीट कळलेली नसणे आणि त्याचे आपल्या जीवनातील महत्त्व लक्षात आलेले नसणे यामुळे अनेकांनी पुरेसे विमा संरक्षण घेतलेले नसते. विम्याचा मुख्य हेतू संरक्षण हा आहे, गुंतवणूक हा नाही.

Importance of Life Insurance & Health Insurance
आयुर्विमा आणि आरोग्यविम्याचे महत्त्व 
थोडं पण कामाचं
  • आयुर्विमा हा तुमच्या आर्थिक स्थैर्यासाठी आणि तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजांसाठी अत्यंत आवश्यक
  • आपत्कालीन वैद्यकीय खर्चासाठी आरोग्यविमा तितकाच महत्त्वाचा
  • पुरेशा रकमेचा विमा घेणे अत्यंत महत्त्वाचे असते

Importance of Insurance | नवी दिल्ली : आर्थिक नियोजनात विम्याचे महत्त्व (Importance of Insurance) खूप मोठे असते. आपल्या कुटुंबियांना आणि प्रियजनांना विमा संरक्षणाद्वारे (Insurance cover) आर्थिक स्थैर्य (Financial Stability) तुम्ही देऊ शकतो. विमा संरक्षणामुळे (Life Insurance) तुमच्या पश्चात तुमचे घर, कार, दैनंदिन खर्च आणि आर्थिक स्थैर्य हे सर्व सुरक्षित राहते. आयुर्विमा हा तुमच्या आर्थिक स्थैर्यासाठी आणि तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजांसाठी अत्यंत आवश्यक असतो. आयुर्विम्याइतकाच आरोग्यविमादेखील अलीकडच्या काळात खूप महत्त्वाचा झाला आहे. वैद्यकीय खर्च दिवसेंदिवस महाग होत चालला आहे. त्यामुळे आपत्कालीन वैद्यकीय खर्चासाठी आरोग्यविमा (Health Insurance) तितकाच महत्त्वाचा ठरतो. पुरेशा रकमेचे विमा संरक्षण (Adequate Insurance cover)तुम्ही घेतले आहे का?  यासंदर्भातील महत्त्वाचे मुद्दे जाणून घ्या. (Financial Planning Tips : Importance of Life Insurance & Health Insurance in your life)

१. विम्याबद्दलची उदासिनता

भारतासारख्या देशात लोकसंख्येच्या मानाने विमा संरक्षण असणाऱ्यांचे प्रमाण फारच कमी म्हणजे ४ ते ५ टक्क्यांच्या आसपास आहे. त्यातच अनेकजण विमा संरक्षणाची रक्कम लक्षात घेत नाहीत. अनेकांनी विमा घ्यायला हवा म्हणून कोणतीतरी पॉलिसी घेतलेली असते. प्रत्यक्षात त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक असणारे विमा संरक्षण आणि त्यांनी घेतलेले विमा संरक्षण यात मोठे अंतर असते. म्हणजेच त्यांनी पुरेशा रकमेच्या विमा घेतलेला नसतो. विमा घेणेच महत्त्वाचे नसून तो पुरेशा रकमेचा असणे तितकेच महत्त्वाचे असते. आपण हे लक्षात घेतले पाहिजे की विम्याचा मुख्य हेतू संरक्षण हा आहे, गुंतवणूक हा नाही. अनेकजण विम्याकडे किंवा विम्याच्या पॉलिसीकडे गुंतवणुक म्हणून पाहतात. विम्याबद्दलचे अज्ञान, विम्याच संकल्पना नीट कळलेली नसणे आणि त्याचे आपल्या जीवनातील महत्त्व लक्षात आलेले नसणे यामुळे अनेकांनी पुरेसे विमा संरक्षण घेतलेले नसते.

२. आयुर्विमा का हवा?

अनेकदा सर्वसामान्य माणसे विम्याकडे गुंतवणूक म्हणून पाहतात. त्यामुळेच किती प्रिमियम भरला म्हणजे मॅच्युरिटीनंतर किती रक्कम मिळेल किंवा बोनससारखे किती फायदे मिळतील हे पाहण्याचाच कल असतो. परंतु विमा ही गुंतवणूक नसून ते असते आर्थिक संरक्षण. आपल्या पश्चात आपल्या कुटुंबावर आर्थिक संकट येऊ नये यासाठी आयुर्विमा घ्यायचा असतो. आपल्या अकस्मात मृत्यूनंतर कुटुंबाचे दैनंदिन आर्थिक खर्च, मुलांचे शिक्षण, मुलांची लग्नकार्ये, कर्ज, भविष्यातील आर्थिक गरजा यासंदर्भात कुटुंबाला मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागू नये यासाठी आपण आयुर्विमा घ्यायचा असतो. त्यामुळेच प्रिमियमची रक्कम किंवा मॅच्युरिटीनंतरचे फायदे यावर भर न देता, आपल्याला नेमके किती विमा संरक्षण आवश्यक आहे, हे समजून घेऊन आयुर्विमा पॉलिसी घेणे केव्हाही चांगले. आयुर्विम्याचा मुख्य हेतू आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाची आर्थिक गरज भागवणे हा असतो.

३. आयुर्विम्याची रक्कम नेमकी किती असावी

आयुर्विमा संरक्षणाची रक्कम काढण्याचे अनेक प्रकारे काढता येते. सर्वसाधारणपणे आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाच्या आर्थिक गरजांचा विचार करून ही रक्कम निश्चित करावी. यातील पहिला मुद्दा म्हणजे आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या १२ ते १५ पट रकमेएवढी विमा संरक्षणाची रक्कम असावी. म्हणजे या रकमेतून दैनंदिन आर्थिक खर्च, मुलांचे शिक्षण, मुलांची लग्नकार्ये इत्यादी भागवता येतील. यातील दुसरा मुद्दा म्हणजे वर उल्लेख केलेली रक्कम ही किमान रक्कम आहे. आपली नोकरी करण्याची शिल्लक राहिलेली वर्षेदेखील यात गृहीत धरल्यास उत्तमच. कारण तितकी वर्षे तुम्हाला उत्पन्न मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही तिदेखील रक्कम विमा संरक्षणात घेतली तर योग्य ठरते. याशिवाय तुमची मालमत्ता, तुमच्यावर असणारी कर्जे यासारख्या बाबींदेखील विमा संरक्षणाची रक्कम ठरवण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. 

४.आरोग्यविमादेखील तितकाच महत्त्वाचा

आरोग्यविमा हा देखील एक दुर्लक्षिलेला प्रकार आहे. कोरोना महामारीसारख्या वैद्यकीय संकटाने तर आरोग्यविम्याचे महत्त्व अधिकच अधोरेखित केले आहे. अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय खर्चापोटी आपली अनेक वर्षांची बचत खर्ची पडते आणि मोठे आर्थिक संकट उभे राहते. अशावेळी जर आरोग्यविमा असेल तर आर्थिक बोझा पडत नाहीच परंतु ऐनवेळी पैशांची जुळवाजुळव करण्यासाठीची धावपळ वाचते. शिवाय दिवसेंदिवस वैद्यकीय खर्च महागच होत चालले आहे. उतार वयात वैद्यकीय खर्चही वाढत जातात. याचा मोठा विपरित परिणाम तुमच्या आर्थिक स्थैर्यावर होऊ शकतो. त्यामुळेच सर्व कुटुंबाचा आरोग्यविमा असणे ही काळाची गरज आहे.

५. विमा पॉलिसी घेतानाचा सजगपणा

तंत्रज्ञान आणि नियामक संस्थांमुळे दिवसेंदिवस विमा क्षेत्रात पारदर्शकता येत चालली आहे. तुम्ही ऑनलाईन कोणत्याही प्रकारच्या विम्याची माहिती आणि त्यासाठी उपलब्ध असणाऱ्या पर्यायांची माहिती केव्हाही घेऊ शकता, तुलना करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला आवश्यक असणारा विमा घेऊ शकता. यासाठी विमा एजंटांवर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. शिवाय ऑनलाईन विमा घेतल्यास प्रिमियममध्येही बचत होते. मात्र आपली गुंतवणूक आणि विमा यासाठी तुम्ही फॅमिली डॉक्टरप्रमाणेच आपल्या कुटुंबाच्या आर्थिक सल्लागाराचे मार्गदर्शन घेतल्यास तेच अधिक योग्य ठरते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी