ही '५' सूत्रे तुम्हाला बनवतील श्रीमंत, देतील आर्थिक स्थैर्य

फक्त परिश्रम करून किंवा चांगला पगार असलेली नोकरी मिळवून आर्थिक स्थैर्य येणार नाही. त्यासाठी अर्थसाक्षरता महत्त्वाची ठरते. अर्थसाक्षरता म्हणजे आर्थिक बाबींची जाण असली पाहिजे.

Top 5 Financial Tips
महत्त्वाची आर्थिक सूत्रे 

थोडं पण कामाचं

  • आर्थिक स्थैर्यासाठी आणि श्रीमंत होण्यासाठी अर्थसाक्षरता महत्त्वाची
  • आपण कमावलेल्या पैशाला आपल्यासाठी कामाला लावता आले पाहिजे
  • श्रीमंत होण्यासाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि अंमलात आणल्याच पाहिजेत अशा बाबी

मुंबई : आर्थिक सुबत्ता असावी, भरपूर पैसा असावा, श्रीमंत व्हावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. यासाठी सर्वजण आयुष्यभर भरपूर मेहनतदेखील करतात. मात्र फक्त परिश्रम करून किंवा चांगला पगार असलेली नोकरी मिळवून आर्थिक स्थैर्य येणार नाही. त्यासाठी अर्थसाक्षरता महत्त्वाची ठरते. अर्थसाक्षरता म्हणजे आर्थिक बाबींची जाण असली पाहिजे. एरवी आपण पैशांसाठी काम करत असतो मात्र आपण कमावलेल्या पैशाला आपल्यासाठी कामाला लावता आले पाहिजे. अनेकवेळा आपल्या आयुष्यातील काही सवयी किंवा काही समज असे असतात ज्यामुळे आपणच आपल्या श्रीमंत बनवण्याच्या वाटेवरचे अडथळे ठरत असतो. श्रीमंत होण्यासाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि अंमलात आणल्याच पाहिजेत अशा काही टिप्स किंवा सूत्रे पाहूया. (Financial Tips : Top 5 Financial Tips for financial stability & Wealth creation)

१. तुमचे बजेट आखा

बजेट आखणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. अखेर तुमचे पैसे कुठे जात आहेत हे बजेट आखल्याशिवाय तुम्हाला कसे कळणार? तुमचा खर्च आणि बचत याचे आकलन तुम्हाला बजेट आखल्यावरच होईल. तुम्ही काही हजार कमवा किंवा लाखो कमवा, बजेट इज मस्ट. बजेट म्हणजेच तुमच्या खर्चाचा आणि उत्पन्नाचा ताळमेळ असतो. यातूनच तुम्हाला तुमच्या नेमक्या आर्थिक क्षमतेची जाणीव होत असते.

२. पुरेसे विमा संरक्षण महत्त्वाचे

आरोग्यविमा आणि आयुर्विमा हे दोन्ही प्रकारचे विमा तुमच्या आर्थिक नियोजनाचा अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. दुर्दैवाने बहुतांश लोक याकडे दुर्लक्ष तरी करतात किंवा पुरेसे विमा संरक्षण तरी घेत नाहीत. तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबियांच्या आर्थिक गरजांची काळजी घेण्यासाठी पुरेसे आयुर्विमा संरक्षण असणे महत्त्वाचे आहे. योग्य टर्म इन्श्युरन्स घेऊन तुम्ही चिंतामुक्त होऊ शकता. त्यामुळे दुर्दैवाने अकस्मातपणे आलेल्या संकटामुळे तुमच्या कुटुंबाला तुमच्या पश्चात आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार नाही. कोरोना काळात वैद्यकीय खर्चाची तरतूद किती महत्त्वाची असते याची जाणीव सर्वानाच झाली आहे. आरोग्य विमा ती गरज भागवतो.

३. बचत आवश्यक आहे

फक्त कमाई करून उपयोगाची नाही. दरमहा नियमितपणे बचत करणे आवश्यक आहे. स्वत:साठी आधी पैसे बाजूला काढा. म्हणजेच हाती पगार आल्यावर सर्व बिले भरण्याआधी स्वत:च्या बचतीसाठी किमान ५ टक्के रक्कम बाजूला काढा. ही दरमहा केलेली नियमित बचत काही वर्षांनी तुमच्यासाठी मोठी रक्कम उभी करेल. बचतीतून तुमच्या संपत्ती निर्मितीची सुरूवात होते. ही पहिली पायरी असते.

४. दरमहा नियमित गुंतवणूक करा

तुम्ही पैसा साठवून उपयोग नाही. तर पैशाला तुमच्यासाठी कामाला लावले पाहिजे. हे साध्य होते गुंतवणुकीतून. तुम्ही केलेली योग्य आणि नियमित गुंतवणुकच तुमच्यासाठी संपत्ती निर्माण करत असते. दरमहा केलेल्या नियमित बचतीला योग्य गुंतवणूक प्रकारात गुंतवा. कारण गुंतवणुकीमुळे तुमची संपत्ती निर्माण होते. त्यामुळे विविध गुंतवणूक प्रकारात तुमची गुंतवणूक विभागून ठेवा. दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवून नियमित गुंतवणूक करा. यामुळे तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळेल आणि छोट्याशा बचतीतून काही वर्षांनी मोठी रक्कम उभी झालेली असेल.

५. रिटायरमेंट प्लॅनिंग करा

आपल्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे आर्थिक नियोजन कार्यरत असतानाच करा. त्यामुळे तुम्हाला दीर्घकालावधीत योग्य पद्धतीने तजवीज करता येईल. रिटायरमेंटसाठी दरमहा नियमितपणे दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक करा. कारण आयुष्यातील विविध जबाबदाऱ्या, दैनंदिन खर्च इत्यादी बाबींमुळे तुमच्या हातातील पैसे खर्च होत राहतात. पाहता पाहता तुम्ही निवृत्त व्हाल आणि तुमच्या हाती फारसे पैसे राहणार नाहीत. तरुणवयातच रिटायरमेंटसाठी केलेल्या गुंतवणुकीची फळे तुम्हाला निवृत्तीनंतरच्या आयुष्यात चाखता येतील. तरुणपणी केलेले आर्थिक नियोजन तुमचे निवृत्तीनंतरचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या स्थिर आणि समृद्ध करेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी