पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ (PPF) हा गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे. पीपीएफ खात्यामध्ये दरवर्षी किमान ५०० रुपये भरावे लागतात आणि तरच तुमचे पीपीएफ खाते चालू राहते. १५ वर्षे अशा प्रकारे पैसे भरावे लागतात. कुठल्याही एका आर्थिक वर्षात पीपीएफ खात्यात दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची मर्यादा आहे. या गुंतवणुकीवर सेक्शन ८० सी अंतर्गत करामधून सूट देण्यात आली आहे. व्याजावरील उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा कर लागत नाही. मॅच्युरिटीच्या वेळी मिळणारी रक्कमेवरही टॅक्स भरावा लागत नाही. इतके सर्व फायदे लक्षात घेत नागरिक आपले पीपीएफ खाते बँक किंवा पोस्ट कार्यालयात सुरू करतात आणि आपली गुंतवणूक सुरू करतात.
अनेकदा असे पहायला मिळतं की, काही नागरिकांना पीपीएफ खात्यात किमान गुंतवणुक रक्कम भरता येत नाही आणि त्यामुळे त्यांचे खाते इनअॅक्टिव्ह म्हणजेच बंद होते. अशा परिस्थितीत नागरिकांना घाबरण्याची गरज नाही कारण, हे अकाऊंट तुम्ही पुन्हा सुरू करु शकतात. पाहूयात त्यासाठी काय आहे सोपी पद्दत.
पीपीएफ खाते पुन्ही सुरु करण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस / बँकेत जावे लागेल जेथे तुम्ही हे खाते सुरू केले आहे. तेथे तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल.
त्यासोबतच तुमची थकबाकी जमा करा, म्हणजेच जेव्हापासून तुम्ही पैसे भरलेले नाहीत तेव्हापासूनची रक्कम भरावी लागले.
तसेच प्रत्येक वर्षासाठी ५० रुपयांचा किमान दंड भरावा लागेल.
समजा तुमचे खाते ३ वर्षांपासून चालू नाही तर तीन वर्षांचे १,५०० रुपये आणि १५० रुपये दंड असे मिळून एकूण १६५० रुपये तुम्हाला भरावे लागणार. त्यानंतर तुमचे अकाऊंट पुन्हा सुरू होईल. पीपीएफ खात्याचा लॉक-इन कालावधी १५ वर्षांचा असतो यामधून १५ वर्षांपूर्वी तुम्ही पैसे काढू शकत नाहीत.
२०१६ मध्ये पीपीएफ नियमांत एक महत्वपूर्ण बदल झाला आहे. यामध्ये सरकारने विशिष्ट परिस्थितीत मॅच्युरिटीपूर्वी पीपीएफ अकाऊंट बंद करण्याची परवानगी दिली आहे. ज्यामध्ये जीवघेणा आजार किंवा मुलांच्या शिक्षणावरील खर्चाचा समावेश आहे. पीपीएफ अकाऊंट पाच वर्षे चालल्यानंतरच असे करु शकतात. बंद झालेल्या पीपीएफ खात्यात या सुविधेचा लाभ घेता येत नाही.
तिसऱ्या आर्थिक वर्षानंतर सहाव्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तारखेपर्यंत पीपीएफ अकाऊंटमधील रक्कमेवर तुम्ही कर्ज घेऊ शकतात. बंद असलेल्या पीपीएफ खात्यामधून याचा लाभ घेता येणार नाही. जर खातेधारकाला बंद असलेले पीपीएफ अकाऊंट व्यतिरिक्त नवीन अकाऊंट सुरू करण्याची इच्छा असेल तर नियमानुसार तो तसे करु शकत नाही. एका व्यक्तीचे एकच पीपीएफ अकाऊंट असू शकते.