Four Days a Week | आठवड्यातील चार दिवस काम (For days of work) आणि तीन दिवस सुट्टी (Three days holiday) हा फॉर्म्युला जगातील अनेक देशांमध्ये राबवला जातो. कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढावी आणि त्यांचं मानसिक आणि कौटुंबिक आरोग्य चांगलं राहावं, या उद्देशानं ही संकल्पना राबवली जाते. यात आता ब्रिटनदेखील सहभागी झाला असून चार दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय प्रयोगिक तत्त्वावर घेण्यात आला आहे. बँकिंग, हॉस्पिटॅलिटी यासारख्या क्षेत्रातील 70 कंपन्यांमध्ये हा प्रयोग सुरू केला जाणार आहे.
सध्या केवळ 70 कंपन्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग केला जाणार आहे. पुढील सहा महिने या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना आठवड्यातून चारच दिवस काम करावं लागेल आणि तीन दिवस सुट्टी दिली जाईल. असं असलं तरी त्यांच्या पगारात कुठलीही कपात केली जाणार नाही किंवा त्यांचे इतर कुठलेही लाभ कमी केले जाणार नाहीत. सध्या आठवड्यातून पाच दिवस या कंपन्यांतील कर्मचारी काम करतात. त्याऐवजी त्यांना चारच दिवस काम करावे लागेल आणि तीन दिवस सुट्टी असणार आहे.
फोर डे विक ग्लोबल, फोर डे विक युके कँपेन अशा अनेक मोहिमा ब्रिटनमधील स्वयंसेवी संस्थांकडून गेल्या काही महिन्यांपासून चालवल्या जात आहेत. कर्मचाऱ्यांची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून या कँपेनकडे पाहिलं जात आहे. पाचऐवजी चार दिवसांचा आठवडा करण्याचे काय परिणाम कर्मचाऱ्यांवर आणि कंपनीच्या कामगिरीवर होतात, हे तपासून पाहण्याचा उद्देश यामागे आहे. या प्रयोगातून समोर आलेले निष्कर्ष पुढच्या वर्षी म्हणजेच 2023 साली जाहीर केले जाणार आहेत. या प्रयोगावर ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठातील तज्ज्ञ लक्ष ठेऊन आहेत. याशिवाय अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठातील काही तज्ज्ञही या प्रयोगाचं निरीक्षण करणार आहेत.
या प्रयोगात 70 कंपन्यांमधील 3300 पेक्षाही अधिक कर्मचारी सहभागी झाले आहेत. मार्केटिंग, बँकिंग, रिटेल, फायनान्स यासह विविध क्षेत्रातील कंपन्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे. या प्रयोगामुळे कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढेल, परफॉर्मन्स सुधारेल आणि मानसिक स्वास्थ्यही उत्तम राहिल, अशी माहिती या प्रयोगात सहभागी असणाऱ्या एका कर्मचाऱ्याने दिली आहे.
सध्या ब्रिटनमध्ये अनेक कंपन्यांनी चार दिवसांच्या आठवड्याची संकल्पना राबवली आहे. मात्र हा प्रयोग यशस्वी झाला, तर मोठ्या प्रमाणात याच्या अंमलबजावणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. जपानसह इतर काही विकसित देशांनीदेखील चार दिवसांचा आठवडा सुरू केला असून त्याचे सकारात्मक परिणाम जाणवत असल्याचं दिसून आलं आहे. भारतात गेल्या काही वर्षांत पाच दिवसांचा आठवडा या संकल्पनेनं मूळ धरलं आहे. अद्याप अनेक कंपन्यांमध्ये सहा दिवसांचाच आठवडा ठेवण्यात आला आहे. मात्र कर्मचाऱ्यांना जास्त सुट्ट्या दिल्या, तर त्यांचा फरफॉर्मन्स सुधारत असल्याचं वेळोेवेळी केलेल्या प्रयोगांमधून दिसून आलं आहे.