Future Retail | मुंबई : आधीच अडचणीत असलेल्या फ्युचर रिटेलचे प्रमुख किशोर बियानी (Kishore Biyani)यांच्यासाठी २०२२ या वर्षाचा पहिलाच दिवस टेन्शनचा होता. हे टेन्शन ३,००० कोटी रुपयांचे होते. फ्युचर रिटेलने (Future Retail) शुक्रवारी ३१ डिसेंबरला बॅंकांना ३,००० कोटी रुपयांची थकबाकी द्यायची होती. फ्युचर रिटेलच्या कर्जाच्या परतफेडीसंदर्भात बॅंकांकडून देण्यात आली हे वन टाइम रिस्ट्रक्चरिंग प्रोग्रॅम म्हणजे ओटीआर अंतर्गत करावयाचे पेमेंट होते. (Future retails misses payment of Rs 3,000 to banks, Kishore Biyani in trouble)
समोर आलेल्या माहितीनुसार एप्रिल २०२१ मध्ये फ्युचर रिटेल आणि बॅंकांमध्ये ओटीआरसंदर्भात सहमती झाली होती. त्यानुसार फ्युचर समूहाला ३,००० कोटी रुपयांचे वन टाइम पेमेंट करायचे होते. यासाठी कंपनी देशभरातील आपले ९०० रिटेल स्टोअर्स विकणार होती. मात्र असे झाले नाही कारण फ्युचर रिटेल आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्यात २९ ऑगस्ट २०२०ला २४,७१३ कोटी रुपयांचा व्यवहार झाला होता. यानुसार जर फ्युटर समूहाने आपले रिटेल स्टोअर्स रिलायन्सला विकले असते, मात्र अॅमेझॉनच्या विरोधानंतर ही डील होऊ शकली नाही. सध्या अमेझॉन आणि फ्युचर समूहामध्ये विविध न्यायालयांमध्ये खटला सुरू आहे.
रिलायन्स आणि फ्युचर समूहादरम्यान झालेली डील पूर्ण करण्याची मुदत ३१ मार्च २०२२ ही आहे. त्याआधी इच्छा असूनदेखील फ्युचर समूह आपल्या रिटेल स्टोअर्सना म्हणजे बिग बझार या रिटेल चेनला कोणत्याही थर्ड पार्टीला विकू शकत नाही. सध्या ३,००० कोटी रुपयांच्या वन टाइम पेमेंटसंदर्भात किशोर बियानी यांना १ महिन्याचा ग्रेस पीरियड मिळाला आहे. ही मुदत ३० जानेवारी २०२२ ला संपेल. जर बॅंकांना पैसे नाही मिळाले तर त्यांना हे कर्ज थकित कर्ज किंवा बुडीत कर्ज म्हणून घोषीत करावे लागेल. याचबरोबर बॅंका ओटीआरच्या अटींनादेखील रद्द करतील.
फ्युचर रिटेलने बॅंकांकडून एकूण १०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेतले आहे. यामध्ये लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म लोनचे जवळपास ६,२०० कोटी रुपयांचे आणि फॉरेन करन्सी बॉंडचे ३,५०० कोटी रुपये आहेत. परदेशी करेन्सी बॉंडची कर्जाच्या परतफेडीची तारीख २०२५ मध्ये आहे. याशिवाय २०० कोटी रुपयांचे नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचरदेखील आहे. तर तिकडे फ्युचर समूह आणि रिलायन्समधील २४,७१३ कोटी रुपयांची मल्टी लेयर डीलदेखील संकटात आहे. अॅमेझॉनने या डीलला विरोध केला आहे. अॅमेझॉनचे म्हणणे आहे की फ्युचर समूहाशी त्यांना जुना करार आहे. अमेझॉन आणि फ्युचर समूहात यासंदर्भात न्यायालयीन लढाई सुरू आहे. त्याची पुढील सुनावणी ११ जानेवारी आहे. १७ डिसेंबरला सीसीआयने अॅमेझॉनवर ताशेरे ओढले होते.
अॅमेझॉन आणि फ्युचर समूहातील न्यायालयीन लढाई कोण जिंकते यावरच फ्युचर समूह आणि रिलायन्स यांच्यातील डीलचे भवितव्य अवलंबून आहे. त्याचबरोबर या सर्व संघर्षावरच भारतातील रिटेल क्षेत्राचे भवितव्य ठरणार आहे.