२०२० मध्ये उद्योगपती अदानींच्या संपत्तीत 'इतक्या' अब्ज डॉलर्सची वाढ, अंबानींनाही टाकले मागे

काम-धंदा
Updated Nov 21, 2020 | 13:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांची संपत्ती यावर्षी सर्व श्रीमंत भारतीयांमध्ये सर्वाधिक आहे. त्यांनी आशियातील सर्वात श्रीमंत आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनाही मागे टाकले.

Gautam Adani
गौतम अदानी आणि मुकेश अंबानी 

थोडं पण कामाचं

  • अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांची संपत्ती यावर्षी सर्व श्रीमंत भारतीयांमध्ये सर्वाधिक आहे
  • त्यांनी आशियातील सर्वात श्रीमंत आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनाही मागे टाकले
  • स्टीव्ह बाल्मर, लॅरी पेज आणि बिल गेट्सच्या पुढे अदानी जगातील नवव्या क्रमांकाचे संपत्ती निर्माता ठरले आहेत

नवी दिल्ली : अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांची संपत्ती यावर्षी सर्व श्रीमंत भारतीयांमध्ये सर्वाधिक आहे. त्यांनी आशियातील सर्वात श्रीमंत आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनाही मागे टाकले. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, यावर्षी गौतम अदानींची संपत्ती १९.१ अब्ज डॉलर्सने वाढली आहे, जी २०२० मध्ये मुकेश अंबानी यांनी कमावलेल्या १६.४ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. अदानी यांनी २०२० च्या पहिल्या साडे दहा महिन्यांत आपली संपत्ती १.४१ लाख कोटींनी वाढविली. म्हणजे दिवसाला ४४९ कोटी रुपयांची वाढ. स्टीव्ह बाल्मर, लॅरी पेज आणि बिल गेट्सच्या पुढे अदानी जगातील नवव्या क्रमांकाचे संपत्ती निर्माता ठरले आहेत.

जगातील 40 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती

यावर्षी अदानींची संपत्ती ३०.४ अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे आणि ते जगातील ४० व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहे. दरम्यान, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ७५ अब्ज डॉलर्स इतकी असून यंदा १६.४ अब्ज डॉलर्सची भर पडली आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार आता ते जगातील दहावे श्रीमंत आहेत.

एलोन मस्कच्या संपत्तीत वाढ

दरम्यान, टेस्लाच्या एलोन मस्क यांनी सन २०२० मध्ये जगातील सर्वात जास्त संपत्ती जोडली आहे. त्यांची संपत्ती ९२ अब्ज डॉलर्सवरून १२० अब्ज डॉलरवर गेली आहे. अॅमेझॉनचे जेफ बेझोस आणि नोंगफू स्प्रिंगच्या झोंग शशान यांच्या मालमत्तेत अनुक्रमे ६८ अब्ज डॉलर्स आणि ५७ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.

समभागांच्या वाढीमुळे यंदा अदानी यांच्या मालमत्तेत वाढ 

अदानी ग्रीन, अदानी एन्टरप्रायजेस, अदानी गॅस आणि अदानी ट्रान्समिशनच्या समभागांच्या वाढीमुळे यंदा अदानी यांच्या मालमत्तेत वाढ झाली आहे. २०२० मध्ये अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्ये ५५१ % वाढ झाली आहे, तर अदानी गॅस आणि अदानी एन्टरप्राइजेसच्या शेअर्समध्ये अनुक्रमे १०३% आणि ८५% वाढ झाली आहे. या काळात अदानी ट्रान्समिशन आणि अदानी पोर्टमध्ये अनुक्रमे ३८% आणि ४% टक्के वाढ झाली आहे, तर अदानी पॉवरमध्ये ३८% टक्के घट झाली आहे. 

१९८८ मध्ये वयाच्या ३२व्या वर्षी कमोडिटी व्यापारी म्हणून काम करणार्‍या गौतम अदानी यांच्याकडे आता बंदरे, विमानतळ, ऊर्जा संसाधने, रसद, शेती व्यवसाय, रिअल इस्टेट, आर्थिक सेवा, गॅस वितरण आणि संरक्षण व्यवसायांची मालकी आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी