गौतम अदानींची संपत्ती एकाच दिवसात २२,५०० कोटींनी घटली, टॉप २० यादीतून बाहेर

काम-धंदा
Updated Apr 08, 2021 | 17:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी ब्लूमबर्ग बिलियनेर इंडेक्सच्या टॉप २० मधून बाहेर फेकले गेले आहेत. गौतम अदानी यांच्या एकूण संपत्तीत एकाच दिवसात ३.०३ अब्ज डॉलर म्हणजेच २२,५०० कोटी रुपयांची घसरण झाली आहे.

Gautam Adani on 21 ranking in global rich list
श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी २१ व्या तर मुकेश अंबानी १२ व्या स्थानावर 

थोडं पण कामाचं

  • गौतम अदानी ब्लूमबर्ग बिलियनेर इंडेक्सच्या टॉप २० मधून बाहेर
  • संपत्तीत एकाच दिवसात ३.०३ अब्ज डॉलर म्हणजेच २२,५०० कोटी रुपयांची घसरण
  • श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी १२ व्या स्थानावर

मुंबई : कोरोना महामारीच्या संकटातदेखील आघाडीचे भारतीय उद्योगपती आणि अदानी समूहाचे (Adani Group) अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांनी जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत स्थान पटकावले होते. जगातील टॉप २० श्रीमंतांच्या यादीत त्यांचा समावेश झाला होता. मात्र बुधवारी अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत मोठी घसरण झाली. त्याचा फटका बसत गौतम अदानी टॉप २० श्रीमंतांच्या यादीतून बाहेर फेकले गेले आहेत.

अदानींची संपत्ती


ब्लूमबर्ग बिलियनेर्स इंडेक्सनुसार गौतम अदानी यांच्या एकूण संपत्तीत एकाच दिवसात ३.०३ अब्ज डॉलर म्हणजेच २२,५०० कोटी रुपयांची घसरण झाली आहे. त्याचा फटका बसत ते श्रीमंतांच्या यादीत २१ स्थानावर पोचले आहेत. आता त्यांच्या एकूण संपत्तीचे मूल्य ५९.३ अब्ज डॉलर इतके आहे. याआधी गौतम अदानी यांच्या एकूण संपत्तीचे मूल्य ६१.३ अब्ज डॉलर इतके होते. 

ब्लूमबर्ग इंडेक्सच्या अहवालानुसार अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअरमध्ये बुधवारी शेअर बाजारात गुंतवणुकादारंनी नफावसूली केली आहे. कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत चांगलीच वाढ झालेली होती. त्यामुळे वाढलेल्या किंमतीत शेअर विकून नफा कमावणे गुंतवणुकदारांनी पसंत केले. ब्लूमबर्गच्या याच इंडेक्समध्ये मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ७५.९ अब्ज डॉलर असल्याची माहिती देण्यात आली आहे. टॉप २० श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी १२ व्या स्थानावर आहेत. त्यांच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही.

पोर्ट टायकून अदानी


गौतम अदानी यांच्या उद्योग कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर अदानी समूहातील विविध कंपन्या उदाहरणार्थ अदानी पॉवर, अदानी एंटरप्राईझेस, अदानी ग्रीन आणि अदानी पोर्ट यांच्या शेअरच्या किंमतीत मागील वर्षभरात चांगलीच वाढ झाली होती. या कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीमध्ये जवळपास ५० टक्क्यांची वाढ पाहण्यास मिळाली होती. गौतम अदानी यांनी स्वत:ला पोर्ट टायकून बनवले आहे. मागील तीन महिन्यात त्यांनी सागरी बंदरांची खरेदी केली आहे.

अॅमेझॉनचे जेफ बेझॉस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती


ब्लूमबर्ग बिलियनेर्स इंडेक्सनुसार (Bloomberg Billionaires Index) अॅमेझॉनचे (Amazon) संस्थापक जेफ बेझॉस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. बेझॉस यांच्या एकूण संपत्तीचे मूल्य १९२ अब्ज डॉलर इतके आहे. तर टेस्ला (Tesla) या वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या आणि स्पेसएक्स (SpaceX) या जगप्रसिद्ध कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क (Elon Musk) यांची एकूण संपत्ती १७३ अब्ज डॉलर इतकी आहे. मस्क सध्या दुसऱ्या स्थानावर आहेत. मायक्रोसॉफ्टचे (Microsoft) सहसंस्थापक बिल गेट्स (Bill Gates) १४३ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. फ्रान्सचे आघाडीचे व्यावसायिक आणि जगातील लक्झरी वस्तूंची सर्वात मोठी कंपनी एलव्हीएमएच मोएट हेनेस्सीचे (LVMH Moët Hennessy)चेअरमन बर्नार्ड आरनॉल्ट १२८ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह चौथ्या क्रमांकावर आहेत. फेसबुकचे (Facebook)मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) ११८ अब्ज डॉलरसह पाचव्या क्रमांकावर आहेत.

मागील काही दिवसात टेस्लाच्या इलॉन मस्क यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याने ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले होते. मात्र पुन्हा टेस्लाच्या शेअरच्या किंमतीत घसरण झाल्याने मस्क जगातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी