Gautam Adani | अखेर अदानींनी केली अंबानींची बरोबरी, दोघांचीही संपत्ती ६.६३ लाख कोटी रुपये

Gautam Adani Wealth | अदानी आणि अंबानी आता सारख्याच क्रमांकावर आहेत. सध्या या दोघांचीही संपत्ती ८९ अब्ज डॉलर म्हणजे ६.६३ लाख कोटी रुपये इतकी आहे. मागील वर्षभरात आणि २०२१ या वर्षात गौतम अदानी यांच्या संपत्तीत तुफान वाढ दिसून येते आहे.

Gautam Adani & Mukesh Ambani
गौतम अदानींची संपत्ती झाली मुकेश अंबानीएवढी 
थोडं पण कामाचं
  • गौतम अदानी बनले देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
  • अदानींची संपत्ती आता अंबानींनीएवढी
  • अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअरमधील तेजीमुळे झाली संपत्तीत वाढ

Gautam Adani Wealth | मुंबई : अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी (Gautam Adani)आता देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (Richest Indian) झाले आहेत. गौतम अदानी यांची एकूण संपत्ती आता मुकेश अंबानीएवढीच (Mukesh Ambani) झाली आहे. त्यामुळे अदानी आणि अंबानी आता सारख्याच क्रमांकावर आहेत. सध्या या दोघांचीही संपत्ती ८९ अब्ज डॉलर म्हणजे ६.६३ लाख कोटी रुपये इतकी आहे. मागील वर्षभरात आणि २०२१ या वर्षात गौतम अदानी यांच्या संपत्तीत (Net wealth of Adani) तुफान वाढ दिसून येते आहे. मागील एका वर्षातच जबरदस्त घोडदौड करत गौतम अदानींनी संपत्तीच्या बाबतीत देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांना गाठले आहे. (Gautam Adani's net wealth is now equaled to Mukesh Ambani's wealth)

अदानी यांच्या कंपन्यांचे बाजारमूल्य १० लाख कोटींवर

समोर आलेल्या माहितीनुसार अदानी समूहातील कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य १० लाख कोटी रुपयांवर पोचले आहे. तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य १४.९१ लाख कोटी रुपये इतके आहे. अर्थात जरी रिलायन्सचे समभाग भांडवल म्हणजे बाजारमूल्य अदानी समूहातील कंपन्यांपेक्षा जास्त असले तरी गौतम अदानी यांची आपल्या कंपनीतील हिस्सेदारी ही रिलायन्स समूहातील मुकेश अंबानींच्या हिस्सेदारीपेक्षा अधिक आहे. 

अदानींचा ७१ टक्के मालकी हक्क

अदानी समूहातील कंपन्यांमधील हिस्सेदारी लक्षात घेता अदानी समूहातील कंपन्यांमध्ये गौतम अदानी यांचा मालकी हक्क किंवा हिस्सेदारी ७०.५९ टक्के आहे. अदानी यांनी तीन कंपन्यांमधअये ७४.९२ टक्के तर एका कंपनीत ७४.८० टक्के हिस्सेदारी आहे. या तुलनेत मुकेश अंबानींचा यांचा रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये ५०.६१ टक्के हिस्सा आहे. अदानी समूहावरील कर्ज आणि रिलायन्स समूहावरील कर्ज यांची रक्कम लक्षात घेता, कर्जाची परतफेड केल्यानंतर अदानी आणि अंबानी यांची एकूण संपत्ती आता सारखीच झाली आहे.

बुधवारी अदानींनी गाठले अंबानींना

बुधवारी (२४ नोव्हेंबर) अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत वाढ झाली. त्यामुळे या कंपन्यांच्या ग्रॉस बाजारमूल्यात १२,००० कोटी रुपयांची आणि निव्वळ बाजारमूल्यात ४,२५० कोटी रुपयांची वाढ झाली. शेअर बाजारात अदानी एंटरप्राइझेसचा शेअर २.७६ टक्क्यांची तेजी नोंदवत १७५४.६५ रुपयांच्या पातळीवर स्थिरावला. यामुळे अदानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ ते आता मुकेश अंबानींच्या बरोबरीवर पोचले आहे.

रिलायन्सच्या शेअरमध्ये घसरण

एकीकडे अदानी समूहातील कंपन्यांमध्ये तेजी येत असताना रिलायन्सच्या शेअरच्या किंमतीत मात्र घसरण झाली आहे. सौदी अरामकोबरोबर १५ अब्ज डॉलरचा व्यवहार फिस्कटल्यानंतर रिलायन्सच्या शेअरच्या किंमतीत सातत्याने घसरण होते आहे. बुधवारी रिलायन्सच्या शेअरमध्ये १.४८ टक्के घसरण होत तो २,३५०.९० रुपयांवर पोचला. शेअरमधील घसरणीमुळे अंबानी यांच्या संपत्तीत ११,००० कोटी रुपयांची घट झाली आहे.

अदानींच्या संपत्तीत ज्या गतीने वाढ होते ते पाहता ते लवकरच मुकेश अंबानींना मागे टाकतील अशी चिन्हे आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी