Tips to Become Crorepati | चहा (Tea) हे भारतातील बहुतांश लोकांचं आवडीचं पेय. भारतातील मध्यमवर्गाचा अभ्यास केला, तर सरासरी दोन वेळा (Two Times) प्रत्येकजण चहा पित असल्याचं दिसून येतं. सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात चहाने होते आणि दुपारमुळे आलेला थकवा पळवून ताजंतवानं होण्यासाठी संध्याकाळचा चहादेखील अनेकांना भुरळ घालतच असतो. याशिवाय मित्रांच्या भेटीत, नातेवाईकांच्या घरी, येताजाता, मीटिंगमध्ये अशा वेगवेगळ्या निमित्ताने माणसं चहा पित असतात. हा चहा आरोग्यासाठी हानीकारक असल्याचं माहित असतानाही चहाचा मोह भल्याभल्यांना सुटत नाही.
सध्या कुठेही चहा घेतला तरी त्यासाठी किमान 10 रुपये मोजावेच लागतात. काही ठिकाणी त्याहून अधिक तर काही ठिकाणी त्याहून कमी पैसे घेतले जातात. मात्र देशाचा विचार केला, तर सरासरी 10 रुपये एका चहासाठी खर्च होतात. चहा पिण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या किराणा सामानात चहा पावडर, साखर आणि दूध या गोष्टी घ्याव्या लागतात. त्यामुळे घरी चहा पिणाऱ्यांचा हा खर्च दर महिन्याला होतो. चहा पिऊन तब्येतीला काहीही फायदा होत नाही, हे माहित असतानाही आपण चहा पितो आणि इतरांनाही पाजत असतो. पण नव्यानेच समोर आलेल्या एका कल्पनेनुसार जर प्रत्येक व्यक्तीनं त्याच्या आयुष्यात चहा पिणं बंद केलं, तरी तो कोट्यधीश होऊ शकतो.
एक तरुण दररोज दोन वेळा चहा पितो, असं गृहित धरलं, तर त्याचा रोजचा खर्च होतो 20 रुपये. हेच 20 रुपये वाचवून तो कोट्यधीश होऊ शकतो, असं सांगितलं जातं. तरुण हा देशाचं भवितव्य असतो. त्याने चहा पिणं सोडलं, तर त्याच्या तब्येतीवरही चांगला परिणाम होईल आणि त्याच्या अर्थकारणावरही. अनेकांना ही गोष्ट मजेशीर वाटू शकते. केवळ चहा पिणं सोडल्यामुळे एखादी व्यक्ती करोडपती कशी काय होऊ शकते, असा प्रश्न मनात येणं साहजिक आहे. मात्र जर आर्थिक उत्पन्नवाढीच्या स्रोतांचा विचार केला आणि योग्य प्रकारे गुंतवणूक केली, तर हे शक्य असल्याचं दिसून येईल.
जेव्हा तुम्ही दिवसातून दोन वेळा चहा पिता तेव्हा दिवसाचे 20 रुपये खर्च करता. याचाच अर्थ महिन्याचे 600 रुपये खर्च करता. हीच रक्कम म्युचुअल फंडात SIP मार्फत गुंतवण्यास सुरुवात करावी. रोज 20 रुपये असे सलग 40 वर्षं गुंतवले (म्हणजेच 480 महिने) तर तुम्ही 10 कोटींपेक्षा अधिक रकक्म मिळवू शकता. थोडक्यात म्युचुअल फंडातून दरवर्षी किमान 15 टक्के परतावा मिळेल, असं गृहित धरून गुंतवणूक केली तर 40 वर्षात एकूण रक्कम 1 कोटी 88 लाख रुपये होते. तर दरवर्षी 20 टक्के परतावा गृहित धरला, तर 40 वर्षांत 10.21 कोटी रुपयांची रक्कम जमा होऊ शकते. प्रत्येक वर्षी मिळणारा निधी त्यातील लाभासह पुनःपुन्हा गुंतवल्यानंतर ही पातळी गुंतवणूकदार गाठू शकतो.
छोटी छोटी गुंतवणूक दीर्घ काळ करत राहिल्यास त्याचे मोठे फायदे होतात, हे अनेकदा दिसून आलं आहे. तुम्ही तुमच्या चहाचे पैसे गुंतवत राहिलात, तर तुमचं आरोग्यही उत्तम राहिल शिवाय कोट्यधीश होण्याच्या दिशेनं तुम्ही एक पाऊल टाकलेलं असेल.